गोरक्षक, समाजसुधारक नगीना अन्वर खान. वय वर्षे ४१, खानदानी काश्मिरी सौंदर्य, सात्विक साधेपणा, पाच मुलांची आई, गृहिणी. आज तीन-चार वर्षांनी भेटलो होतो. महिला सक्षमीकरणाचे काम करणारी नगीनाभाभी एकदम गोरक्षणापर्यंत कशी पोहोचली? मी तिच्याशी बोलता-बोलता तिची मुलाखतच घेऊन टाकली. त्याचेच केलेले हे शब्दचित्रण...
’‘मेरे बीस बछडे देखते देखते गुजर गये...मर गये... मै कुछ ना कर सकी...”
बारामुल्लाची नगीनाभाभी हमसून-हमसून रडत होती आणि मला सांगत होती. स्वतःच्या गोशाळेमधील प्रेमाने पोटच्या पोरांप्रमाणे वाढवलेल्या २० वासरांचा डायरियामुळे दोन दिवसांत मृत्यू झाला; ते सांगताना तिला पोटच्या पोरांना गमावल्यासारखे दुःख होत होते. मलाही माझे अश्रू आवरता आले नाहीत. बारामुल्लासारख्या ठिकाणी रा. स्व. संघ विचारांनी प्रेरित झालेली नगीना खान आणि तिचे कुटुंब गोशाळा चालवतात. ४० गायी आणि त्यांना झालेली वासरे यांची जबाबदारी तिने गेल्या चार वर्षांपासून स्वतःच्या जीवावर पेलली होती. आता फक्त १९ राहिल्या आहेत.
नगीना अन्वर खान अशी माणसे भेटली की, आपले खुजेपण अधोरेखित होते. आपण इतक्या अनुकूल परिस्थितीमध्ये मनासारख्या गोष्टी करत असतो. आपल्या कामाची वाहवासुद्धा होत असते. तिला जे भावले, तिला जे पटले आणि या राष्ट्रासाठी जे आवश्यक आहे, असे वाटते तेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ती जिद्दीने करते आहे. तशी तर नगीनाभाभींची माझी ओळख अलीकडचीच. श्रीनगरमध्ये २०१४ साली पूर आला होता, तेव्हा पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन मी श्रीनगरला पोहोचले. पूर्ण श्रीनगर पाण्याखाली होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस दि. १७ सप्टेंबर. त्याचे निमित्त साधून एक ट्रकभर सामान आणि डॉक्टरांचे पथक घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यासाठी मी तिथे पोहोचले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जे बचावकार्य चालू होते, त्यांच्यामार्फत मला एक नंबर मिळाला. त्या व्यक्तीचे नाव होते मोहम्मद अन्वर खान, पीक्स ऑटो. त्यांची काश्मीरमध्ये मारुतीची सर्व्हिस सेंटर्स होती. माझी राहण्याची व्यवस्था; पण त्यांच्याकडेच होती. मी जेव्हा त्यांच्याकडे पोहोचले, तेव्हा नगीनाभाभी हातात झाडू घेऊन ग्राऊंड फ्लोअरवरचा चिखल काढत होत्या. त्यानंतर आमची जीवाभावाची मैत्री झाली, ती आजतागायत. आज मी त्यांच्या मुलीच्या लग्नाला निकाहसाठी म्हणून तिच्या घरी आले होते आणि ती मनातले दुःख माझ्या समोर हलके करत होती. गोरक्षक, समाजसुधारक नगीना अन्वर खान, वय वर्षे ४१, खानदानी काश्मिरी सौंदर्य, सात्विक साधेपणा, पाच मुलांची आई, गृहिणी. आज तीन-चार वर्षांनी भेटलो होतो. महिला सक्षमीकरणाचे काम करणारी नगीनाभाभी एकदम गोरक्षणापर्यंत कशी पोहोचली?मी तिच्याशी बोलता-बोलता तिची मुलाखतच घेऊन टाकली.
तुम्हाला हे गोरक्षणाचे कुठून सूचले? नगीनाभाभी म्हणाल्या, “मॅडम, (ती मला मॅडम म्हणते, मी तिला अनेकदा सांगितलं की, भाभी, ये आप मुझे मॅडम मत बुलाया करो मेधा भाभी या सिर्फ मेधा बोलेंगे तो अच्छा रहेगा. पण, ती ऐकत नाही) हे सगळे तुमच्यामुळे, आपल्याच प्रेरणेने झालेले आहे. आपण भेटण्याच्या आधी माझ्या मनात समाजसेवा करण्याची काहीच माहिती नव्हती. पण, अडल्यानडल्यांना मदत करण्याची उर्मी तर माझ्या लहानपणापासूनच होती आणि जेवढे जमेल तेवढे मी करतच असे. आमच्या शेजारीच यतीमखाना होता, म्हणजे अनाथाश्रम आहे. याच्या यतीमखान्यातल्या, अनाथाश्रमातल्या सर्व मुलांना मी माझ्या घरी जेवायला बोलवत असे. काही प्रसंगी, वेळेला त्यांच्याकडे मी जेवणही नेऊन देत असे. त्यांच्या शाळेची फी असेल किंवा कपडे लागत असतील, त्यांना गरज असेल, त्याप्रमाणे मी त्यांना देण्याचा प्रयत्न करत असे. जर का मला जमले नाही, तर मी इतर कोणाच्या तरी माध्यमातून ते देण्याचा प्रयत्न असे.
जेव्हा इथे पूर आला, त्या वेळेला ती सर्व मुले माझ्या घरीच माझ्या मुलांबरोबर तीन दिवस राहिली होती आणि होडी मिळाल्यावर, सर्वप्रथम त्या मुलांना सुरक्षित जागी पोहोचवले; नंतरच आम्ही इथून सुटलो. त्यामुळे मला आणि माझ्या मुलांना त्याचप्रमाणे माझ्या पतीलासुद्धा समाजसेवेची खूपच आवड होती आणि आम्ही ती आमची सामाजिक बांधिलकी म्हणूनच करत होतो. त्यातच आम्हाला भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख झाली. जर का समाजामध्ये, आपल्या काश्मीर खोर्यातील या लोकांची परिस्थिती सुधारायची असेल, उन्नती करायची असेल, तर शांतता प्रस्थापित करणे गरजेचे आहे, हे तेव्हा जाणवलं. त्याच वेळेला ती शांतता अटलबिहारी वाजपेयी यांच्या वेळी मिळाली. नंतर मोदीजी देतील, याच विचाराने आम्ही प्रेरित झालो होतो आणि त्या विचारानेच आम्ही काम करत होतो. याच्या मधूनच आम्हाला एक प्रेरणा मिळाली की, आपण भाजपचे काम करायचे. “मॅडम, मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला भेटला तो तर माझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली क्षण होता. कारण, मला त्यामुळे एक हौसला मिळाला.
मला असे वाटायला लागले की, माझे आयुष्य विस्तारले आहे. माझे क्षितिज विस्तारले आहे. त्यापूर्वी मी फक्त-मी स्वतः, पती आणि माझी मुले यापर्यंतच माझे आयुष्य मर्यादित होते; इथे आईच्या पोटात असल्यापासूनच आमची इतिकर्तव्यता हीच असते की, जन्माला येणे, मुलांना जन्माला घालणे, त्यांना मोठे करणे आणि मरून जाणे. परंतु, तुम्ही भेटल्यानंतर मला असे जाणवले की, याच्या पलीकडे आपल्याला करण्यासारखे खूप आहे आणि तुम्ही मला ही प्रेरणा दिली, आत्मविश्वास दिला. मला शिकवले की, नगीना ठरवले तर तुम्ही काहीही करू शकता. तुमच्यामध्ये करण्याची क्षमता आहे. मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी जर का पहिली स्त्री कोणी असेल, तर ती तुम्ही होतात मॅडम!” नगीनाभाभींच्या डोळ्यांमधल्या अश्रूला खळ नव्हती. मी म्हणाले की, “तसं काही नसतं बरं का! परंतु, प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या तरी एका घटनेचा ‘ट्रिगर’ मिळाला पाहिजे आणि तो ‘पॉईंट’ देवाच्या कृपेने तुमच्यासाठी मी होते. नंतर त्यांच्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली. त्यांनी खूप-खूप म्हणजे खूपच समाजसेवा केली.
भारतीय जनता पक्षाच्या काळात असो किंवा पक्षाचा असो किंवा संघ विचारांच्या माध्यमातून असो, प्रत्येक वेळेला त्या अन्वरभाईंच्या पाठीमागे ठामपणे उभ्या राहिल्या आणि त्यामुळेच आज काश्मीर खोर्यामध्ये अन्वरभाईंना तोड नाही. तेच खोर्यामध्ये भारतीय जनता पक्षाची पायाभरणी करणार्यांपैकी-अशोक कौल, रमेश अरोरा यांच्या बरोबरचे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत. ते आता राष्ट्रीय कार्यकारिणीवर पण आहेत. सर्वस्व पणाला लावून स्वखर्चाने त्यांनी पक्ष वाढवला. त्यांच्या पाठीमागे नगीनाभाभी भारीभक्कम पहाडासारख्या हिमालयासारख्या उभ्या आहेत आणि म्हणूनच, हे शक्य झालं आहे. त्यांच्यावर ती झालेल्या हल्ल्याची कहाणी मी तुम्हाला यावर या आधी सांगितली होतीच; पण केवळ एक हल्ला नाही, तर अनेक वेळेला त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. व्यावसायिक आयुष्यामध्ये पण त्यांना भरपूर तोटे सहन करावे लागले. परंतु, तरीही त्यांची राष्ट्रनिष्ठा ढळली नाही आणि विचारांवरील विश्वास किंवा श्रद्धा ही तेवढीच राहिली. त्याचं कारण नगीनाभाभींची संपूर्ण साथ.
तरीही नगीनाभाभींसारख्या स्त्रीने गोरक्षणाचे कार्य करावे, ही तर माझ्या विचारांच्या किंवा कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती आणि त्याच्यामध्ये त्यांना आलेले अनुभव हे तर अक्षरशः अंगावर शहारे आणणारे असे होते. काश्मीरमध्ये कोणत्याही जनावराला हे उपयुक्त वस्तू म्हणूनच मानले जाते. दूध देण्याचं बंद केलं की, तिला कापलं जातं, मग ती गाय-म्हैस असो की बकरी असो. आयुष्य आपल्याला आवडत असो वा नसो असेच आहे. कितीही प्रेम केलेला बकरा असला तरी तो सुदृढ झाला की, ईदच्या कुर्बानीसाठी नेले जाते, ही परंपरा आहे. हा तिथला संस्कार असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही.प्रत्येकाचे संस्कार लहानपणापासून चालत आलेल्या सवयी आणि त्यांच्या अनुभवांवर ठरत असतात. त्याप्रमाणे तेथील सर्व जनतेला तेच वाटत आलेले आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा विरोध करुन काही काम करायचे असेल, तर प्रवाहाच्या विरोधात पोहण्यासाठी लागणारे बळ हे स्वतःच्या खुद्दारीतून किंवा स्वतःच्या आत्मविश्वासातूनच निर्माण होते. त्याच्यासाठी एक प्रकारची जिद्द, पडेल ते सहन करण्याची ताकद ही असावीच लागते, जी मला नगीनाभाभीमध्ये नेहमीच जाणवत आलेली आहे आणि या गोरक्षणाच्या कामातून तर अधिकच लक्षात आली आहे.
त्यांना मी विचारले, “गोरक्षणच का?” त्या म्हणाल्या, “कारण की मला असे वाटले की, आपण जनावरांना कापतो, हे काही बरोबर नाही. ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, त्यांचा उपयोग संपला की कापून पैसे करायचे? परंतु, त्या विचारांमुळे मी अनेक वेळेला द्विधा मनस्थितीमधून जात राहिले. जगायला आवश्यक असेल तर ते जनावर आपल्याला खायला हरकत नाही. परंतु, अशा प्रकारे उपकारकर्त्याचा गैरफायदा घेणे किंवा त्याच्या मुकेपणाचा गैरफायदा घेतो, हे मला कुठेतरी खटकत होते आणि मग ज्या गायी भाकड आहेत, बैल म्हातारे आहेत, म्हशी भाकड आहेत, त्यांना आपल्याकडे काय स्थान आहे? आमच्या इथली परिस्थिती अशी होती की, कोणीही, आई-बाप जरी म्हातारा झाला तरी त्यालासुद्धा हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत नसे. गेल्या तीन-चार वर्षांत आता ती परिस्थिती थोडी बदलली आहे. थोडीफार का होईना, पण बदलते आहे. आता म्हातार्या लोकांना हॉस्पिटलमध्ये नेले, तर त्याचे उपचाराचे पैसे सरकार खर्च करते. त्यामुळे त्यांना जीवनदान मिळू शकते. जिथे म्हातार्या व्यक्तींचा आदर होत नसेल, तर म्हातार्या जनावरांची काय कथा? आणि म्हणून मलाही अशी कुठून तरी प्रेरणा झाली की, मला या गाई गोठ्यात पाहिजेत आणि तिथून मी माझ्या गाई वाचवण्याचा किंवा गोठा वाढवण्यासाठीचा प्रयत्न करत राहिले. एक गोशाळा निर्माण केली. ती गोशाळा निर्माण करताना पण मला अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सल्ले दिले, टोमणे मारले. माझ्यावर टीका केली. नावे ठेवली.
परंतु, मला एक गोष्ट नक्कीच माहिती होती की, मला ज्या अर्थी माझे मन सांगते, त्याअर्थी तो माझ्या अल्लाचा मला आलेला आदेश आहे आणि त्याच प्रमाणे मी वागू शकते आणि त्याचप्रमाणे मी वागणार आहे. त्यामुळेच मी ती गोशाळा निर्माण केली. आजमितीस गेलाबाजार दर महिन्याला ५० हजार ते एक लाख रुपये खर्च मला या गोशाळेसाठी करावा लागतो. कोणाचीही मदत मिळत नाही. मात्र, माझे पती मला मधून-मधून मदत करतात. पण, अल्लाने त्याचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे. कारण की, माझा एक दुसरा एक बिझनेस चालू केला होता. तुम्ही भेटण्याआधी बिझनेस करावा, असे मला कधी वाटले नव्हते. पण, तुमच्याशी बोलल्यानंतर मी माझा समाजसेवेचा खर्च निघावा म्हणून माझा छोटासा बिझनेस चालू केला. त्यातही अनेक वेळेला मला नुकसान सहन करावे लागले. पण, तरीपण मी जिद्दीने तो व्यवसाय चालू ठेवला आणि नंतर तो चांगला चालू लागला. कोरोना काळात ग्रहण लागले; पण आता बरा चालू आहे. त्या व्यवसायात मला जे पैसे मिळतात, ते सर्व पैसे मी गोशाळेमध्ये वापरते.
एकदा एका व्यक्तीकडून मी गाभण गाय विकत घेतली. कारण, ती गाय तो कापण्यासाठी घेऊन जात होता. माझ्याकडे ती गाय आणल्यावर मला कळले की, त्या गाईला कोणता तरी असाध्य रोग झाला आहे. म्हणून तो गाय कापायला नेत होता. मी त्या व्यक्तीला विचारले की, “तू मला का फसवलस? मला माझे पैसे परत दे. तुझी गाय घेऊन जा.” माझ्या दबावामुळे तो माझे पैसे द्यायला तयार झाला. मात्र, त्याने लगेचच त्या कसायाला बोलावले आणि माझ्यासमोरच त्या गाईला कापण्यासाठी सुरा चालवायला सांगितलं. मी आडवी आले आणि म्हणाले, “तू हे काय करतो आहेस?” तो म्हणाला की, “माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला आता या गाईचा काही उपयोग नाही. त्यामुळे तुम्हाला जर का मला पैसे द्यावे लागणार असतील, तर या गाईला कापल्याशिवाय मी तुम्हाला पैसे कसे देणार?” मी हतबद्ध झाले आणि त्या कसायाला आणि त्या व्यक्तीला तिथून हाकलून लावले. अर्थातच आठवड्याभरात ती गाय मृत्युमुखी पडली.
अशीच एकदा एक गाय बाळंत होत होती. तो बछडा खूपच मोठा आणि वजनदार होता. ती अडली होती. आम्ही सरकारी डॉक्टरला बोलावले. परंतु, त्या वेळेला त्यांची ड्यूटी संपल्यामुळे ते यायला तयार झाले नाहीत. आम्ही हातापाया पडून त्यांना आणले. परंतु, तोवर बछडा गुदमरून त्या गाईच्या पोटातच दगावला. नंतर काही दिवसांतच ती गायही मेली. केवळ सरकारी अधिकारी आपल्या वेळेतच काम करतात आणि इथे आवश्यक (पान ५ वरुन) ती सुविधा नाही, त्याचा फटका आम्हाला बसतो. असे अनेक प्रसंग आहेत की, ज्यांना तोंड देता-देता माझ्या नाकी नऊ येतात. तरीसुद्धा त्या प्रसंगामुळे माझ्यामध्ये अधिकच जिद्द तयार होत आहे.”
नुसते ऐकूनच मला मळमळू लागले होते, त्यांची काय अवस्था झाली असेल? त्या पुढे म्हणाल्या की, “दुसरे म्हणजे, मला त्यातून मिळणारे आणखी एक समाधान असे आहे की, माझ्या व्यवसायांमध्ये जे आठ मुलाजिम आणि या गोशाळेमध्ये दोन असा मिळून दहा माणसांचा संसार या माझ्या अल्पशा का होईना; पण प्रयत्नांनी चालतो आहे. आधी त्यांच्या दरवाजाला पायर्यासुद्धा नव्हत्या. आता दुमजली घरे आहेत आणि त्यालाच मी अल्लाची सेवा समजते. मी पाच वेळा नमाज कदाचित पढू शकत नाही; परंतु या दहा जणांचे घर चालवणे, त्यांच्या मुलांची शिक्षण करणे, त्यांना आवश्यक असलेली दवादारू करणे, हे माझ्या दृष्टीने अल्लाची केलेली माझी प्रार्थना आहे आणि हाच माझा नमाज आहे. नगीनाभाभी ठामपणे बोलत होत्या. त्यांचा ठामपणा पाहून वाटले की अरे आपणसुद्धा कधी-कधी हरतो.” कधीतरी निराश होतो. पण, अशा व्यक्तींकडे बघितल्यानंतर असे वाटते की, आपण ठाम राहिले पाहिजे, केवळ आपल्याला पाहून जर का कोणी इतके मोठे होऊ शकत असेल, तर ते त्याचेच कर्तृत्व आहे. माझे श्रेय नाही. हे मला निश्चितपणे वाटते. पण, तरीसुद्धा कुठेतरी एक ठिणगी, कुठेतरी एक स्पार्क माझ्या माध्यमातून देवाने त्यांच्यापर्यंत पोहोचला, तर त्याच्या आपण स्वतःला आपण स्वतः त्याच्यासाठी विश्वासार्ह राहिले पाहिजे. त्याच्यासाठी आपण जबाबदारीपूर्वक प्रामाणिक राहिले पाहिजे.
नगीनाभाभी पुढे सांगत होत्या की, “माझे २० बछडे, त्यांना मी मुलांसारखे मानले. बछड्यांचा मृत्यू डायरीयामुळे झाला. त्या दोन दिवसांमध्ये मी सरकारी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी औषधे सांगितली. ती औषधे मी सरकारी दवाखान्यातून घेतली आणि तरी त्या बछड्यांचा मृत्यू ओढवला. औषध देऊनही काही उपयोग झाला नाही. ते दोन दिवस आमच्या घरामध्ये पूर्ण मातमचे वातावरण होते. कोणी जेवले नाही, कोणी स्वयंपाक केला नाही. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला त्याचा धक्का बसला की, असे होऊच कसे शकते? मी त्याचाही पाठपुरावा केला आणि माझ्या असे लक्षात आले की, जी औषधे दिली होती. ती सरकारच्या दवाखान्यातून मी आणली होती. त्या औषधांमध्ये फक्त पाणी होते. औषधातसुद्धा एवढा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि हे मला कळले नाही. मी त्या पशुवैद्यकीय अधिकार्याला विचारले की, जर का हे सगळं असं होतं, तर तुम्ही आम्हाला हे का सांगितले नाही? तर तो म्हणाला की, “तुम्ही भाजपची माणसं आहात. तुम्हाला हे माहीत नाही? तुम्ही बाहेरून औषधे घेतली असतीत, तर ते बछडे नक्कीच वाचले असते.” आणि त्यानंतर मला जो पश्चात्ताप झाला, त्या झालेल्या दुःखाचे वर्णन मी शब्दांमध्ये करू शकत नाही.
कारण, त्यावेळेस झालेल्या बछड्यांच्या मृत्यूला मी स्वतःला जबाबदार धरते. आजही ते दुःख कायमस्वरूपी माझ्या हृदयामध्ये जखम म्हणून वाहते आहे.” या बारामुल्लाच्या गोरक्षक नगीनाभाभींची कहाणी मी आपल्यासमोर सादर करीत आहे. तुम्हाला शक्य असेल तर त्यांना मदत करा. पैशांची मदत केली तरी चालेल. पण, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता निर्माण होईल, त्यांच्यामध्ये तेवढी जिद्द आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार आहे. मदत आहे. त्यामुळे त्या पुढच्या परिस्थितीत गोरक्षणाचे काम थांबवणार नाहीत, याची मला शाश्वती आहे. जमले तर फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करा, मग तो येशू असेल, अल्ला असेल, भगवान असेल किंवा गुरू असेल! कोणाहीकडे करा आणि तुमच्या दैवताला सांगा की, या बाईला बळ दे. या बाईला बळ दे आणि तिला त्या गाईंना, त्यांच्या बछड्यांना जगवण्याची ताकद दे!
sobmaha२०२३@gmail.com
अधिक माहितीसाठी संपर्क - नगीनाभाभी - ९५९६७७७१६०/९१४९७५१३५५
मेधा किरीट