मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची जनआशीर्वाद यात्रा

२ ते २४ सप्टेंबरदरम्यान २३० मतदारसंघांमध्ये जाणार यात्रा

    26-Aug-2023
Total Views |
JanAshirwad Yatra of BJP In Madhya Pradesh Assembly

नवी दिल्ली :
मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते. सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी सज्ज झाले असून भाजपने २ ते २४ सप्टेंबरदरम्यान राज्यात जनआशीर्वाद यात्रा आयोजित केली आहे. राज्यातील सर्वच्या सर्व २३० मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाणार आहे.

जनआशीर्वाद यात्रेची भाजपने पूर्ण तयारी केली आहे. भाजपच्या नियोजनानुसार या यात्रेत ७ रथ सहभागी होणार आहेत. यात्रेत पाच रथांचा समावेश असेल, तर २ रथ आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. राज्यातील प्रमुख पाच ठिकाणांहून जनआशीर्वाद यात्रा निघणार आहे. त्यासाठी पक्ष राज्यातील प्रसिद्ध ठिकाणे म्हणजेच वनवासी वीरांची भूमी, धार्मिक स्थळ, हुतात्म्यांच्या जन्मस्थानांची निवड करण्यात आली आहे. जनआशीर्वाद रथ संपूर्ण राज्यातील २३० मतदारसंघांमध्ये १२ हजार किलोमीटरचे अंतर कापणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी ही यात्रा राजधानी भोपाळमध्ये पोहोचणार आहे.

जनआशीर्वाद यात्रेची कमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपच्या पाच प्रमुख नेत्यांच्या हाती असणार आहे. पाच नेते विविध प्रदेशातील यात्रांची जबाबदारी सांभाळणार आहेत. ही यात्रा राणी दुर्गावतीचे शौर्यस्थान असलेले जबलपूरचे बारेला, श्रीराम वनवासस्थळ चित्रकूट, चंद्रशेखर आझाद यांचे जन्मस्थान भाबरा, तंट्यामामा जन्मस्थान खंडवा, नर्मदा उगमस्था अमरकंटक येथून सुरू होणार आहेत. यात्रेचा समारोप भोपाळ येथे झाल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या कार्यकर्ता महाकुंभास संबोधित करणार आहेत.