प्रज्ञावंत प्रज्ञानंद...

    26-Aug-2023
Total Views |
Article On Indian Chess Grandmaster R. Pragyananda

‘आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघा’च्या विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत निकाल ‘टायब्रेक’मध्ये लावायचे ठरल्यावर उपविजेतेपद भारताच्या आर. प्रज्ञानंदने पटकावले आणि नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला प्रथम क्रमांक मिळाला. त्यानिमित्ताने आर. प्रज्ञानंदच्या बुद्धीबळातील आजवरच्या प्रवासाचा या लेखात घेतलेला आढावा...

बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी ’चांद्रयान-३’च्या यशस्वी चंद्रावतरणानंतर लागोपाठ दुसरी क्रीडा क्षेत्रातील आनंदवार्ता दि. २४ ऑगस्टच्या गुरुवारी बाकू (अझरबैजान) येथून झळकली. (FIDE) या ‘आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघा’च्या विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपदासाठी खेळल्या जात असलेल्या लढतीत दोनही बुद्धीबळपटू तुल्यबळ निघाले. शेवटी त्यांच्यातल्या लढतीचा निकाल ‘टायब्रेक’मध्ये लावायचे ठरल्यावर उपविजेतेपद भारताच्या आर. प्रज्ञानंदने पटकावले. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला प्रथम क्रमांक, आपल्या आर. प्रज्ञानंदला द्वितीय आणि अमेरिकेच्या फॅबियानो कॅरुआनाला तिसरा क्रमांक मिळाला आणि त्या स्पर्धा संपन्न झाल्या. त्या प्रज्ञावंत व सदाआनंदी असलेल्या आर. प्रज्ञानंदाचे जगभर कौतुक होऊ लागले.

भारतातील क्रीडा क्षेत्राने आणि बुद्धीबळपटूंनी गेल्या काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली आहे. ‘शतरंज’ म्हणजे ‘बुद्धीबळ’ आणि ‘शतरंजी’ म्हणजे ‘बुद्धीबळ खेळणारा.’ भारतात घरोघरी आबालवृद्धांमधे लोकप्रिय असलेला बैठा खेळ म्हणजे ’बुद्धीबळ.’ त्याच्या विश्वचषक स्पर्धेत एका देशाच्या एका खेळाडूनेही उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठणे, हे मोठे असाधारण असे यश असते. भारताच्या अर्जुन एरिगेसी, विश्वनाथन आनंदच्याच अकादमीचा विद्यार्थी असलेला डी. गुकेश, महाराष्ट्राला भूषणास्पद असलेला नाशिकचा विदित गुजराथी आणि चेन्नईचा आर. प्रज्ञानंद, या आपल्या तब्बल चार ग्रँडमास्टरनी हा टप्पा गाठला. भारतीय बुद्धीबळपटूंचे हे यश खचितच ऐतिहासिक आहे.

बुद्धीबळात ‘ग्रँडमास्टर’ ही सर्वोच्च पदवी मानली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर २ हजार, ५०० किंवा त्यापेक्षा अधिक (रेटिंग) मानांकन मिळवल्यास त्यास ’ग्रँडमास्टर’ ही पदवी मिळते. एकदा ‘ग्रँडमास्टर’ ही पदवी मिळाल्यानंतर ती परत घेतली जात नाही. ‘ग्रँडमास्टर’ मिळवल्यानंतर खेळाडूचे रेटिंग २ हजार, ५०० पेक्षा कमी झाले, तरी ही काढून घेतली जात नाही. आयुष्यभर ती अबाधित राहते. भारताचा सर्वात पहिला ‘ग्रँडमास्टर’ विश्वनाथन आनंद हा होय. सद्यःस्थितित ३२ भारतीय खेळाडू ‘ग्रँडमास्टर’ आहेत. परिमार्जन नेगी हा भारताचा सर्वांत कमी वयात ‘ग्रँडमास्टर’ पदवी मिळवणारा बुद्धीबळपटू आहे. त्याने केवळ वयाच्या १३व्या वर्षी ’ग्रँडमास्टर’पद मिळवले.

अशी आपल्या बुद्धीबळाची अन् त्यातही ‘ग्रँडमास्टर’ची परंपरा चालू आहे. आता या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आपल्याला पुढील वर्षी होणार्‍या ‘कॅण्डिडेट्स’ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळत आहे. ‘कॅण्डिडेट्स’ स्पर्धेतून जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत जगज्जेत्याला आव्हान देणारा खेळाडू निश्चित केला जातो. जगभरातून असे आठ बुद्धीबळपटू त्यात असतील.

मॅग्नस कार्लसनला टक्कर देण्याआधीही भारताच्या युवा ‘ग्रँडमास्टर’ आर. प्रज्ञानंदने २०२२ मध्येही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घेण्यात आलेल्या ऑनलाईन जलद बुद्धीबळ स्पर्धेत कार्लसनला पराभूत करण्याचा चमत्कार केलेला आपल्याला आठवत असेलच. आजवर अशी कामगिरी करणारे भारताचे दोनच ‘ग्रँडमास्टर्स’ आहेत-विश्वनाथन आनंद आणि पेंटाल्या हरिकृष्ण. दोघांनाही अर्थातच १६व्या वर्षी जगज्जेत्या बुद्धीबळपटूशी दोन हात करण्याची संधी मिळाली नव्हती. पारंपरिक, जलद वा अतिजलद अशा कोणत्याही प्रकारात जगज्जेत्या कार्सनला हरवण्याची प्रज्ञानंदची ती पहिलीच वेळ होती.

गुरुवार, दि. १० ऑगस्टला आपला १८वा वाढदिवस साजरा करणारा हा बुद्धीबळपटू आपल्या सगळ्यांना प्रिय झाला आहे. प्रज्ञानंदला वरिष्ठ असलेला भारतीय ‘ग्रँडमास्टर’ विदित गुजराथीला त्याने हरवून दाखवले होते. त्यामुळे मोठ्या स्तरावर मोठ्या बुद्धीबळपटूंशी भिडण्याची कला त्याला पुरेशी अवगत आहेच. ‘ग्रँडमास्टर’ आर. बी. रमेश याचे प्रदीर्घ मार्गदर्शन, भारतीय संघाचे प्रशिक्षक एम. श्यामसुंदर असे शिक्षक आणि जगज्जेता विश्वनाथन आनंद याच्या चार युक्तीच्या गोष्टी घोटवून, तो अव्वल स्तरावर खेळण्यासाठी सदैव सज्ज असतो.

पूर्वी घरी भावंडे बरेच खेळ खेळत, आईवडीलही त्यांच्या खेळात सहभाग घेत असत. आताच्या बदलत्या काळात टीव्हीमुळे मुलाबाळांसकट आईवडिलांचेही सगळेच चित्र बदललेले आहे. टीव्हीच्या पगड्याने घरोघरी मुलंमुली आपापल्या पालकांबरोबरच टीव्हीला चिकटून बसलेली असतात. असे जरी असले तरी आज अनेक कुटुंब अशी आहेत की, त्यातील आईवडील आपल्या पाल्यांना टीव्हीच्या आहारी जाऊ न देता विविध खेळांची आवड निर्माण करत असतात. यालाच अनुसरून प्रज्ञानंदच्या वडिलांनी त्याला व त्याच्या बहिणीला बुद्धीबळाचा संच आणून दिला. मग तो आणि त्याची बहीण वैशाली बुद्धीबळाच्या खेळात तहानभूक हरपून जाऊ लागले व ते पाहून त्यांचे आईवडीलही समाधानी झाले. आता प्रज्ञानंद आपले करिअरच बुद्धीबळात करत आपले, आपल्या आईवडिलांचेच नव्हे, तर आपल्या देशाचेही नाव उज्ज्वल करत आहे.

अनेक यशस्वी मुलामुलींना घडवण्यात त्यांच्या आईचे महत्त्व अधिक असल्याचे आपण बघतो. पुराणकाळातील संदर्भ असोत, जिजाऊ मातेचा ऐतिहासिक संदर्भ असो, अशा अनेक माता आपल्याला ज्ञात आहेतच; तशा मातांमध्ये आपण प्रज्ञानंदच्या (नागालक्ष्मी) मातेचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. जेथे-जेथे बुद्धीबळाच्या स्पर्धा होतात, तिथे-तिथे ही माता आपल्या लेकरांच्या सोबत असते. वृत्तांमध्ये आपण पाहिले की, विश्वकरंडक विजेता कार्लसन त्या लढतीच्यावेळी सुरुवातीपासूनच आजारी होता. त्याला अन्नातून विषबाधा झाली होती. वयाने व अनुभवाने मोठ्या असलेल्या कार्लसनला टक्कर देणारा प्रज्ञानंद त्या मानाने लहानच. स्वतःच्या आरोग्याची प्रज्ञानंदने कधीच हेळसांड होऊ दिलेली नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्याची आई नागालक्ष्मी. स्पर्धास्थळी फिजिओ, वैद्यकीय पथक असे सगळे असले तरी आई ती आईच! लहानपणापासूनच प्रज्ञानंदला जेवण वगैरे सर्व बाबतीत त्यांच्या समवेत राहून या मातेने घडवले. गॅरी कास्पारोव्ह सकट सगळ्या बुद्धीबळपटूंना प्रज्ञानंदच्या विजयाचे गुपित माहीत झालं आहे आणि ते म्हणजे नागालक्ष्मींची आपल्या लेकरांच्या पाठी असणारी ताकद. प्रज्ञानंद-वैशाली या भावा-बहिणींना सतत मातृशक्तीची ताकद, आईच्या आशीर्वादाची ऊर्जा मिळत आली आहे.

अनिश्चित खेळाच्या परिस्थितीतही बचाव करण्याचे कौशल्य प्रज्ञानंदकडे आढळते. वाईट परिस्थितीत असतानाही अनुभवी खेळाडूंविरुद्ध अव्वल दर्जाचा बचाव कसा करायचा, प्रतिकूल परिस्थितीत सामना कसा फिरवायचा, असे बरेच काही प्रज्ञानंद आपल्या प्रशिक्षकांकडून रॅपिडली शिकला आहे. वयसुलभ उत्साह आणि धोके पत्करण्यासाठी आवश्यक हिंमत त्याच्या ठायी भरपूर असलेल्या या १८ वर्षीय प्रज्ञानंदकडून भविष्यात भारताला मोठ्या आशा आहेत. तो अवघ्या दहाव्या वर्षी बुद्धीबळ इतिहासातील सर्वांत युवा आंतरराष्ट्रीय मास्टर ठरला होता. १२ वर्षे, १० महिने,१३ दिवस या वयात तो इतिहासातील दुसरा सर्वांत युवा ‘ग्रँडमास्टर’ बनला होता.

प्रज्ञानंदचा विषय सर्वत्र होत असताना मला त्याच्याबद्दल बोलावेसे वाटले म्हणून मी माझे स्नेही राजेंद्र शिदोरे यांच्याशी संपर्क साधला आणि आम्ही या लाडक्या युवकाबद्दल चर्चा केली. संघ परिवारातील ’क्रीडा भारती’च्या पुणे महानगर उपाध्यक्षपदाचे दायित्व सांभाळणारे राजेंद्र शिदोरे, की जे (FIDE) या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ मान्यता प्राप्त आंतरराष्ट्रीय पंचदेखील आहेत, त्यांनी प्रज्ञानंदबद्दल जी माहिती सांगितली ती वाचकांपुढे मांडावी आणि वाचकांनाही प्रज्ञानंद आणखी समजावा, म्हणून ती येथे थोडक्यात मांडत आहे.

राजेंद्र शिदोरे सांगतात की, ’‘आर. वैशाली ही आर. प्रज्ञानंदची बहीण चार वर्षांनी मोठी असून तीदेखील भारतीय संघात आहे. गेली दहा वर्षे मी प्रज्ञानंदला पाहत आहे. मुंबईची ग्रँडमास्टर मॅच, पुणे येथील जागतिक कुमार स्पर्धा, त्याचप्रमाणे नुकत्याच पुण्यामध्ये पीवायसी क्लबमध्ये झालेल्या इंटर पेट्रोलियम इव्हेंट, त्याचे प्रत्येक गेम झाल्यानंतर त्याचे विश्लेषण करण्याची त्याची तयारी असते आणि त्या गेमबाबत तो तासन्तास विचार करतो. नुकत्याच मागील वर्षी झालेल्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्येदेखील त्याची चमकदार कामगिरी झाली. २०२३ला पुण्यामध्ये झालेल्या इंटर पेट्रोलियम स्पर्धेदरम्यान, स्पर्धेच्यावेळी माझी त्याची भेट झाली. तेव्हा विश्नचषकासाठी मी त्याला शुभेच्छा दिल्या. अजून बर्‍याच चर्चा आमच्यात झाल्या.” त्यात त्याच्या आईचे मातृप्रेम कसे असते, हेदेखील शिदोरेंनी उलगडून दाखवले.

विश्वकरंडक स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आता प्रज्ञानंद पुढील वर्षी कॅनडातील टोराँटोत होणार्‍या ’कॅण्डिडेट्स’ म्हणजे आव्हानवीरांच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्या डिंग लिरेन याच्याविरुद्ध खेळण्याची संधी त्याला उपलब्ध झाली आहे. कार्लसनने ’कॅण्डिडेट्स’ स्पर्धेत आता खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट केल्याची बातमी आहे. आता प्रज्ञानंदला आव्हानवीरांच्या स्पर्धेत खेळायचे आहे. बुद्धीबळाच्या विश्वात विश्वचषक जिंकण्यापेक्षाही आव्हानवीरांच्या स्पर्धेत सहभाग मिळवून तेथे खेळणे, हे यश फार मोठे मानले जाते.

विश्वचषक स्पर्धेनंतर समाजमाध्यमांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना प्रज्ञानंद सांगतो की, “अंतिम फेरी गाठू शकणे, याचे समाधान आहेच. ’टायब्रेकर’मध्ये मला जिंकता आले नाही, बुद्धीबळात असे काहीही घडू शकते. मला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यात यश आल्याने आता अधिक लोक बुद्धीबळपटू होण्याचा विचार करतील. सामान्यजन आता भारतीय बुद्धीबळाकडे अधिक लक्ष देतील, बुद्धीबळाचे सामने पाहण्यासाठी ते येऊ लागले आहेत. ही नक्कीच चांगली बाब आहे.”

क्रीडापटू मग तो कोणत्याही क्रीडा प्रकारातला असो, त्याने आपल्या खो-खो, कबड्डी, फुटबॉल, हॉकी अथवा तशा कोणत्याही खेळात यश मिळण्यासाठी एकीकडे जलदगती बुद्धीबळ शिकून तो खेळला पाहिजे. कारण, बुद्धीबळामुळे त्याला मैदानात क्षणार्धात निर्णय घेण्याची सवय लागते. बुद्धीबळ खेळ हा मानसिक विकासासाठी मदत करतोच. पण, व्यक्तिगत विकासासाठी ते एक उत्तम साधन आहे. सगळ्यांची महत्त्वाकांक्षा काही जगज्जेता किंवा ‘ग्रँडमास्टर’ बनण्याची नसते. खूप जणांना वेळ घालवण्यासाठी किंवा मनशांतीसाठीसुद्धा बुद्धीबळ खेळावंसं वाटतं किंवा काही जणांना बुद्धीबळाचा उपयोग आपल्या अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी करायचा असतो. हे बुद्धीबळाचे खरे महत्त्व आहे. जगात कोणीही खेळाडू प्रत्येक डाव जिंकत नाही. अगदी प्रज्ञानंद किंवा कार्लसन का असेना. त्यामुळे आयुष्यात पुढे येणार्‍या संकटांना, अपयशांना कसं तोंड द्यावं, याचं बाळकडूच बुद्धीबळ सामने तुम्हाला देतात. मात्र, त्यासाठी समजंस पालक आणि प्रशिक्षक असणं जरुरी असतं, हा यशस्वीतांचा सल्ला बुद्धीबळपटूंच्याच नाही, तर इतर खेळांतील खेळाडूंच्या पालकांसाठी उपयुक्त ठरणारा असा आहे.

चला तर मग चतुरंगी सेना उभारत आपली प्रज्ञा विकसित करत, त्या प्रज्ञेचा आनंद घेत प्रज्ञानंदसारख्या बुद्धीबळपटूंना शुभेच्छा देत भारताचे नाव क्रीडा क्षेत्रातही वृद्धिंगत करत म्हणू ’भारतमाता की जय!’

श्रीपाद पेंडसे
९४२२०३१७०४
(लेखक पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम माजी खेलकूद आयाम प्रमुख आहेत.)