‘लव्ह जिहाद’ आणि लडाखमधील बौद्धशक्ती

    26-Aug-2023   
Total Views |
Article On Buddhist Culture In Ladakh

लडाखमध्ये ५१ टक्के बौद्ध समाज, तर ४९ टक्के मुस्लीम समाज. खरं तर १५व्या शतकापासूनच लडाख हा काश्मीरसारखा मुस्लीमबहुल व्हावा, यासाठी जंगजंग पछाडले गेले. मात्र, लडाख बौद्ध धर्माचे शक्तीकेंद्रच राहिला. लडाखमध्ये भाजपने नुकतेच लडाख प्रदेश उपाध्यक्ष नजीर अहमद यांना पदावरून निष्कासित केले. का? याचा मागोवा घेताना लडाखच्या बौद्ध धर्मसंस्कृतीची ताकद जाणवते. या लेखात त्या शक्तीचा सारांश मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

लडाखमध्ये भाजप प्रदेश उपाध्यक्ष नजीर अहमद यांचा मुलगा मंजूर अहमद याने लडाखच्याच एका बौद्ध महिलेसोबत निकाह केला. त्यानंतर मंजूर आणि ती बौद्ध महिला कुठे आहे, हे कुणालाही माहिती नाही. या विवाहाचे पडसादही लडाखमध्ये उमटले. स्थानिक बौद्ध समाजाच्या म्हणण्यानुसार, बौद्ध महिलेसोबत ’लव्ह जिहाद’ झाला असून, धर्मांतरासाठीच तिचा वापर केला. आमची मुलगी कुठे आहे? हा बौद्ध समाजाने उपस्थित केलेला प्रश्न रास्तच होता. कारण, श्रद्धा वालकर, साक्षी आणि इतर अनेक ‘लव्ह जिहाद’च्या घटना समाजाने पाहिल्या आहेत. स्थानिक भाजप पक्षाने नजीर अहमद यांना त्यांचा मुलगा मंजूर आणि त्याच्या सोबतची बौद्ध महिला कुठे आहे, याबद्दल विचारणा केली. यावर नजीर यांचे म्हणणे की, “मुलगा आणि ती महिला कुठे आहे माहिती नाही. २०११ सालीच त्या महिलेचा आणि मुलाचा निकाह झाला.

आता त्यांनी कायदेशीररित्या विवाह केला. पण, मुलाच्या निकाहला माझा आणि कुटुंबाचा तेव्हाही विरोध होता आणि आताही विरोधच आहे.” मात्र, लडाख प्रदेश भाजपने नजीर यांची उपाध्यक्षपदावरून उचलबांगडी केलीच. याचे कारण सांगताना लडाख प्रदेश भाजपचे म्हणणे की, ’ती महिला नजीर यांच्या मुलासोबत आहे. ती कुठे आहे? याबद्दल माहिती देण्यासाठी नजीर यांना भरपूर वेळ दिला. मात्र, नजीर यांनी टाळाटाळ केली.” आता नजीर सगळीकडे सांगत आहेत की, ’‘मी भाजपचा लडाख प्रदेशचा उपाध्यक्ष होतो. लडाखमध्ये भाजपचे संघटन मूळ पकडत असतानापासून मी भाजपमध्ये आहे. राज्य भाजपने मला पदातून निष्कासित केले. माझ्या मुलाने बौद्ध धर्मीय महिलेशी निकाह केला यात माझी चूक काय?”

नजीर अहमद यांना पदावरून निष्कासित करणे, हे चूक की बरोबर, याचा विचार करताना महाराष्ट्रभर घडत असलेल्या ’लव्ह जिहाद’च्या घटना आठवल्या. नजीर अहमद जसे सांगत आहेत की, माझा मुलगा आणि त्याच्यासोबतची महिला कुठे आहे, ते मला माहिती नाही किंवा माझा त्यांच्या निकाहाला विरोध आहे वगैरे ही सगळी विधानं ‘लव्ह जिहाद’ करत मुलींवर अत्याचार करणार्‍या गुन्हेगारांचे पालक करत असतात. ‘लव्ह जिहाद’ची घटना घडली, मुलीवर अत्याचार झाले, म्हणून कायदेशीर कारवाई झाली की, गुन्हेगाराचे पालक एकच पालुपद लावतात की, ’आम्हाला काय माहिती आमचा मुलगा बाहेर काय करतो? आम्हाला जर माहिती असते की, तो हिंदू मुलीसोबत आहे, तर आम्ही त्याला नक्कीच तसे करू दिले नसते. आमच्या मुलाचे आणि हिंदू मुलीचे प्रेमप्रकरण आम्ही कधीच स्वीकारणार नाही.’ मात्र, त्याचवेळी हे पालक आपला मुलगा कसा निष्पाप आहे, हे सिद्ध करण्यासाठी चांगल्यातला चांगला वकील उभा करतात. पीडिता जर तिच्या सुदैवाने जीवंत असेल, तर ती त्यांच्या मुलासोबतच कशी राहील आणि ती मुस्लीम धर्म सोडणार नाही, यासाठी हे पालक आकाश पाताळ एक करतात. मुलगा जर मुलीला घेऊन पळून गेला असेल, तर ते त्या मुलाच्या संपर्कात असतातच असतात. 

कायदेशीर कागदपत्र हातात पडत नाही तोपर्यंत मुलाचे पालक आम्हाला काहीच माहिती नाही, असा भोळा आव आणतात. मग एकदा का मुलीचे धर्मांतरण झाले, निकाह झाला आणि त्यानंतर काही दिवस त्यांच्या मुलाने त्या मुलीशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले की, मग हेच पालक पोलीस स्थानकात दाखल होतात. ’मेरे लडके ने कुछ किया नही. मंगता हैं तो लडकी को पुछो’ म्हणत ते त्या मुलीला पोलीस स्थानकात उभे करतात.(मात्र मुलगा फरार असतो) परतीचे सगळे दोर कापलेल्या त्या मुलीला आता माघारी फिरणे शक्य नसते. तसेच, त्या मुलाने अतिहुशारीने मुलीला त्याची मानसिकपेक्षा शारीरिक सवय लावलेली असते. त्यामुळे ती पोलीस स्थानकात जबानी देते-’‘मी स्वतःच त्याच्यासोबत गेले. मी माझ्या मर्जीने निकाह केला आणि मला माझ्या शोहरकडेच जायचे आहे.” ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडल्या त्यामध्ये अपवाद वगळता संबंधित घटनेतील मुलाचे पालक असेच वागले होते, नव्हे अशा ‘लव्ह जिहाद’च्या घटनेमध्ये गुन्हेगारांच्या पालकांची भूमिका पडद्यामागची आणि महत्त्वाची होती.

अगदी श्रद्धा वालकर प्रकरण आठवा. आफताब पूनावालाने त्याच्यावर प्रेम करणार्‍या विश्वास ठेवलेल्या श्रद्धाचे ३६ तुकडे केले. श्रद्धाच्या वडिलांनी श्रद्धाला आफताबपासून दूर राहा, अशी विनवणी केली होती. मात्र, आफताबच्या घरातल्यांनी श्रद्धा आणि आफताबचे नाते स्वीकारले होते. नशेच्या अधीन होऊन एका मुलीचे ३६ तुकडे करण्याचे संस्कार आफताबला त्यांनी दिले नसतील. पण, त्याची मानसिकता काय एका दिवसात घडली? ती तशी घडू नये, यासाठी आफताबच्या पालकांची काहीच जबाबदारी नव्हती का? तसेच, २० वेळा चाकू हल्ला होऊन निर्घृण खून झालेल्या साक्षीचा खुनी साहील? साहील हा विक्षिप्त आणि अत्यंत खुनशी होता. त्याच्या या स्वभावामुळे त्याच्या घरातल्यांना दोनवेळा घर बदलावे लागले होते, तर असा हा साहील. आपला मुलगा सणकी आहे. त्याच्या हातून काहीही घडू शकते, याची जाणीव त्याच्या आईबाबांना नसेल काय? आफताब आणि साहील आणि त्यांच्यासारखे क्रूर कृत्य करणारे रागाच्या भरात कृत्य करतात, असे जरी म्हटले तरीसुद्धा त्या क्रूरतेचे संस्कार कुठून तरी होत असतील ना? पालक म्हणून अशा गुन्हेगारांच्या घरातल्यांची काहीच जबाबदारी नसते का?

या पार्श्वभूमीवर लडाखमधील घटनेमध्येही बौद्ध धर्मीय महिलेशी निकाह करणार्‍या मंजूरच्या पालकांची भूमिका पादरदर्शी असूच शकत नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. नजीर लडाखचे नेता होते. लडाखमधली सामाजिक परिस्थिती त्यांना माहिती होती. २०१५ साली डॉक्टर असलेल्या बौद्ध मुलीने धर्मांतरण करून मुस्लीम व्यक्तीशी निकाह केला. त्यावेळी लडाखमध्ये अक्षरशः दंगलग्रस्त वातावरण होते. या घटनेवरून दोन समाजात भयंकर तेढ माजली. इतकी की इथल्या बहुसंख्य बौद्ध समाजाने मुस्लीम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकला. या बहिष्कारामुळे मुस्लीम समाजाची आर्थिक कोंडी झाली. बौद्ध समाजाने बहिष्कार मागे घ्यावा. म्हणून मुस्लीम समाजाने प्रयत्न केले. शेवटी बौद्ध समाजाने आर्थिक बहिष्कार मागे घेतला.

नजीर अहमद या सगळ्या घटनांचे साक्षी होते. त्यामुळे लडाखमध्ये बौद्ध समाजाच्या मुलीने धर्मांतरण केले, निकाह केला. त्याचे काय पडसाद दोन्ही समाजावर उमटू शकतात, याचे गांभीर्य नजीर यांना असणारच. मात्र, तरीही त्यांच्या मुलाने २०११ सालापासून बौद्ध मुलीशी निकाह केला, असे ते आता २०२३ साली सांगत आहेत. याचे कारण काय? बरं, निकाह केल्यानंतर १२ वर्षांनी त्या दोघांनी पुन्हा कायदेशीररित्या विवाह करून अज्ञात ठिकाणी जाण्याचे कारण काय? आपला मुलगा गेले १२ वर्षे काय करतो, हे नजीरसारख्या जुन्याजाणत्या नेत्याला माहिती नसणार, यावर कोण विश्वास ठेवेल? केंद्रात भाजपचे सरकार आहे. भाजपच्या मुस्लीम धर्मीय नेत्याच्या मुलाने बौद्ध समाजाच्या मुलीचे धर्मांतरण केले आणि निकाह केला. त्याबद्दल सहसा कोणी काही म्हणणार नाही. मग या घटनेचा दाखला देत, बौद्ध आणि मुस्लीम समाजांतर्गत रोटीबेटी व्यवहाराचे सामान्यीकरण करण्याचा कट आणि त्याद्वारे मुस्लीमबहुल लडाख करण्याचे षड्यंत्र असावे, असे काही लोकांचे म्हणणे.

असो. तर मुद्दा असा की, लडाखमध्ये ‘बौद्ध विरूद्ध मुस्लीम’ हा संघर्ष तसा जुनाच. त्यातच लडाखमधील बौद्ध संघटनांचे म्हणणे आहे की, ’लडाखमध्ये बौद्ध धर्मीय ५१ टक्के, तर मुस्लीम धर्मीय ४९ टक्के आहेत. त्यामुळे मुस्लिमांना लडाखमध्ये त्यांची संख्या वाढवायची आहे. लडाखमधून बौद्धांना हद्दपार करायचे आहे. पण, आमच्या रक्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही असे होऊ देणार नाही.’ लडाखमधील बौद्धांनी घेतलेली ही भूमिका केवळ तोंडाची वाफ दवडण्यासाठी नाही, तर लडाखचे बौद्ध धर्मीय जगभरातल्या मुस्लिमांइतकेच संघटित आहेत. बौद्ध धर्माच्या चालीरिती जपण्यासाठी, धर्मसंवर्धनासाठी ते खरोखरच प्राणांचीही आहुती देण्यास तत्पर असतात. त्यामुळे इथे बौद्ध धर्मीयांच्या भावना दुखवण्याचे साहस कोणताही राजकीय पक्ष करत नाही.

तत्कालीन लडाखच्या भूभागासंदर्भात देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंनी अपमानास्पद टिप्पणी केली होती की, इथे गवतही उगवत नाही, काय करायचे या भूभागाचे? त्याच परिसरामध्ये बोधिसत्व अवलोकितेश्वर (तथागत गौतम बुद्ध)यांच्याशी संबंधित ‘ॐ मणिपद्मे हुम्’ हा मंत्र जपत बौद्ध धर्म आणि समाज समर्थ, शक्तिशाली झाला. हे पाहिले की वाटते, आपल्या देशाच्या इतर समाजात अशी एकी कधी निर्माण होईल? अन्यायाविरोधात शीर तळ हातावरून घेऊन अत्याचार्‍याविरोधात झुंजण्याची वृत्ती पुन्हा कधी जागृत होईल? लडाखमध्ये ’लव्ह जिहाद’ सदृश्य घटना घडली आणि इथल्या बौद्ध समाजाने ’लव्ह जिहाद’ करणार्‍यांना आस्मान दाखवले, गुडघ्यावर आणले. लडाख भाजपचेही अभिनंदन की, त्यांनी तर्कशुद्धरित्या कारवाई केली. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या घटना सातत्याने घडतात. त्यावेळी समाज एकसंघ होतो. पण, काही काळाने पुन्हा थंडच होतो. लडाखच्या बौद्ध धर्मीयांचे ते धर्मसंस्कृतीप्रेम महाराष्ट्रातल्या हिंदूंमध्येही आहे. फक्त तो धर्म, ती संस्कृती पुन्हा नव्याने जागवली पाहिजे, जगली पाहिजे!

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.