जपानी विद्यार्थ्यांना भावले ठाणे

ठाणे महापालिकेत भेट देऊन आयुक्तांशी साधला हिंदी आणि इंग्रजीत संवाद

    25-Aug-2023
Total Views |
japanese-students-entered-thane-to-study-indian-culture

ठाणे
: 'ठाणे' शहर भावल्याची प्रतिक्रिया जपानी विद्यार्थी व त्यांच्या प्राध्यापकांनी व्यक्त केली. शुक्रवारी ठाणे महापालिकेत भेट देऊन जपानी विद्यार्थ्यानी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी संवाद साधला. यावेळी विद्याप्रसारक मंडळाचे डाँ. महेश बेडेकर उपस्थित होते.
 
क्योटो सांगयों विद्यापीठ, क्योटो जपान सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी विद्याप्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि एन. जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे गेल्या रविवारी आले असुन ३० ऑगस्टपर्यत हे विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणार आहेत.२०१२ पासुन जपानी विद्यार्थी ठाण्यात येत आहेत.जोशी बेडेकर कॉलेजने जपानमधील या विद्यापीठाशी सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत दरवर्षी जपानी विद्यार्थ्यांना काही दिवस ठाण्यात आणण्यात येते तर ठाण्यातील विद्यार्थ्यांना जपान मध्ये पाठवले जाते.

ठाण्यात नुकत्याच आलेल्या या जपानी विद्यार्थ्यांनी काही दिवसातच हिंदी आणि इंग्रजी भाषा अवगत केली असुन इथल्या भाषेत ते चर्चादेखील करतात. एकमेकांच्या देशाविषयी असलेले गैरसमज दूर करून त्या देशाची परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. शुक्रवारी हे विद्यार्थी ठाणे महापालिका भवनात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी संवाद साधला.भारतीय शिक्षण व्यवस्था, येथील संस्कृती याबद्दल विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. महापालिका यंत्रणा तसेच ठाणे शहर याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल दिसून येत होते.आयुक्त बांगर यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.