'न्यूयॉर्क टाईम्स'च्या कुत्सित व्यंगचित्राला राजीव बॅनर्जींनी दाखवला आरसा!
25-Aug-2023
Total Views |
मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चांद्रयान ३ मोहीम फत्ते करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरविणारा पहिला देश म्हणून बहुमान मिळविला. सबंध जगभरातून इस्त्रोच्या अतुलनीय कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाले. त्यातच आता लिंक्डइन या वाणिज्य आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठित वेब पोर्टलवर एका पोस्टने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पिरामल इंटरप्रायझेसचे ग्रुप हेड राजीव बॅनर्जी यांनी इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहीमेच्या यशावर एका व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
राजीव बॅनर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जवळपास एक दशकापूर्वी, भारताच्या अंतराळ महत्त्वाकांक्षा दर्शविणारे एक व्यंगचित्र वर्णद्वेषी ओव्हरटोनमुळे ट्रोल झाले होते. तसेच, याबाबत आंतरराष्ट्रीय प्रकाशनाने माफीदेखील मागितली होती. परंतु, इस्त्रोच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंगचा उत्सव साजरा करत असतानाच आता भारताचा 'एलिट स्पेस क्लब' मध्ये समावेश झाला आहे.
तसेच, राजीव बॅनर्जी म्हणाले, इस्त्रोच्या या अतुलनीय कामगिरीमुळे तेव्हाच्या एका व्यंगचित्राला योग्य प्रतिक्रिया देण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत. ते पुढे म्हणतात, धन्यवाद, 'ISRO' भारत चंद्रावर पोहोचला असून ते (NASA) आता आमच्या दारावर ठोठावतील. आम्हाला तुमचा अभिमान आहे.
दरम्यान, हे व्यंगचित्र काढतानाच अनुभव त्यांनी पोस्टमध्ये सांगितला आहे. मुंबईतील नेमक्या टाईम ट्रॅफिकमध्ये वाहनाचा वेग वाढला आणि अचानक ब्रेक लागल्याने रेषा बंद होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी कॅबमध्ये बसून, पेन घट्ट धरून हे व्यंगचित्र काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली, असे त्यांनी नमूद केले आहे.