मुंबई : चंदेरी दुनियेसाठी महत्वपुर्ण असणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची २४ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. ज्यात मराठी चित्रपट आणि दिग्दर्शकांनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. यात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाने राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्कार पटकावला. त्यामुळे विवेक अग्निहोत्रींच्या आनंदाला पारावार उरला नसताना, दुसरीकडे मात्र, चित्रपटाचे मुख्य अभिनेते अनुपम खेर यांना अभिनयासाठी पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर यांनी खंत व्यक्त केली आहे. अनुपम खेर म्हणाले की, “अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असता तर बरे झाले असते”. तर, विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार दहशतवादाला बळी पडलेल्यांना समर्पित केला आहे.
'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अनुपम खेर यांनी ट्विट करत पोस्ट शेअर केली. यात त्यांनी लिहिले की, 'द काश्मीर फाइल्स'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटाला नॅशनल इंटिग्रेशनवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणूनही मिळालेली ओळख पाहून मी आनंदी आहे. मला माझ्या अभिनयासाठीही पुरस्कार मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता. पण सर्व इच्छा पूर्ण झाल्या तर पुढे काम करण्याची मजा आणि उत्साह कसा असेल. जाऊ द्या! पुढच्या वेळेस.'
काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
“मी अमेरिकेत आहे. पहाटे फोन वाजला तेव्हा 'द काश्मीर फाइल्स'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची बातमी मिळाली. 'द कश्मीर फाइल्स' हा केवळ माझा चित्रपट नसून मी फक्त एक माध्यम आहे, हे मी नेहमीच सांगितले आहे. काश्मीरमधील सर्व दहशतवादी घटनांचे बळी... काश्मिरी हिंदू, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम, दलित, गुज्जर... हा चित्रपट त्यांचा आवाज आहे. त्यांच्या वेदनेचा आवाज आहे, जो संपूर्ण जगापर्यंत पोहोचला आहे. रात्रंदिवस मेहनत करून आम्ही ते जगभर नेले. आणि आज राष्ट्रीय पुरस्कारामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मी हा पुरस्कार दहशतवादाला बळी पडलेल्या सर्वांना समर्पित करतो”.
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा!
◾️सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा- सरदार उधम
◾️सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा-एकदा काय झालं
◾️सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफी-आरआरआर- तेलुगू
◾️सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स- आरआरआर-तेलुगू
◾️सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- पुष्पा १
◾️सर्वोत्कृष्ट एडिटर- गंगूबाई काठियावाडी- संजय लिला भन्साली
◾️सर्वोत्कृष्ट संवाद लेखक- गंगूबाई काठियावाडी
◾️सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द कश्मीर फाइल्स)
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट ( गंगूबाई काठियावाडी) आणि क्रिती सेनन (मीमी)
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेता- पुष्पा- अल्लू अर्जून
◾️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- निखिल महाजन ( गोदावरी )
◾️सर्वोत्कृष्ट चित्रपट- 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट'