'हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हटल्या जाणार्या ईशान्य आफ्रिकन देशांमध्ये दहशतवाद, उपासमार आणि सततच्या दुष्काळाने लाखो लोकांना पलायनास प्रवृत्त केले. अशा स्थलांतरितांच्या मूलभूत मानवाधिकारांची कशाप्रकारे पायमल्ली केली जाते, त्याच्या बातम्या समोर येत असतात. पण, सोमवारी ‘ह्युमन राईट्स वॉच’ या संस्थेने इथिओपियातून सौदीमध्ये प्रवेश करणार्यांवर कशाप्रकारे अत्याचार करण्यात आले, त्याचा एक सविस्तर अहवालच जाहीर केला. या अहवालाने सौदी अरेबियाचा शान-शौकतीच्या पडद्यामागे लपलेला क्रूर आणि निर्दयी चेहरा जगासमोर आणला आहे.
१९३८ मध्ये तेलाच्या खाणी सापडल्यानंतर अरबी वाळवंटात आर्थिक समृद्धी बहरु लागली. जागतिक राजकारणात कवडीचीही किंमत नसलेल्या या अरब देशांना तेलसाठ्यांमुळे एकाएकी महत्त्व प्राप्त झाले. यापैकीच एक आखाती देश म्हणजे सौदी अरेबिया. जगातील दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या सौदी अरेबियामध्ये, इस्लाममधील पवित्र समजली जाणारी मक्का आणि मदिना ही दोन शहरे. त्यामुळे सौदी तथाकथित मुस्लीम उम्माचाही नेता बनला.तेलातून प्राप्त कमाईचा सौदीने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुरेपूर वापर केला. पण, हे काम करण्यासाठी सौदीकडे मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. त्यामुळे दक्षिण आशिया आणि आफ्रिका खंडातून सौदीने स्वस्तात मजूर उभे केले.
आज तीन कोटी लोकसंख्या असलेल्या सौदीमध्ये तब्बल ६० लाख परदेशी कामगार काम करतात. यामध्ये इथिओपियातील सात लाख कामगारांचा समावेश आहे. परंतु, यापैकी साडेचार लाख कामगार हे अवैधरित्या घुसखोरी करून आल्याचा दावा सौदीने केला आहे. एवढेच नाही तर यापैकी एक लाख अवैध घुसखोर कामगारांना सौदीने इथिओपियाला परत पाठविले. त्यासंबंधीचा करारही सौदीने इथोपियाच्या सरकारसोबत केला होता. त्यानंतर या मायदेशी परतलेल्या प्रवाशांच्या मुलाखती घेऊन ‘ह्युमन राईट्स वॉच’ या संस्थेने सौदीचा क्रूर चेहरा जगासमोर आणला आहे. ७३ पानी या अहवालामध्ये सौदीहून परतलेल्या प्रवाशांनी आपली आपबिती आणि व्यथा मांडली आहे.
जगभरात अवैध प्रवाशांची कशाप्रकारे हाताळणी करायची, यासाठी संयुक्त राष्ट्राने काही नियम बनवले आहेत. त्यानुसार अवैध प्रवाशांना ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये ठेवून त्याच्या मायदेशात पाठवता येते. पण, ‘ह्युमन राईट्स वॉच’च्या दाव्यानुसार सौदीच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अवैध प्रवाशांना ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये न ठेवता सरळ त्यांची हत्या केली. या हत्यांचा आकडा एक हजारांपेक्षा जास्त असू शकतो, असा प्राथमिक अंदाज या अहवालात मांडण्यात आला आहे.
तसेच ‘डिटेन्शन सेंटर’मधील प्रवाशांचे कथनही तितकेच भयानक. ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये कैद प्रवाशांना साखळीने बांधून ठेवण्यात आले. गरोदर महिलांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय साहाय्यता उपलब्ध नव्हती. एवढेच नाही तर यावेळी प्रवाशांचे अनेक प्रकारे शोषण करण्यात आल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे. हा अहवाल प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखतींच्या आधारे तयार करण्यात आला असल्यामुळे त्याच्या विश्वासार्हतेवर शंका घेण्याचे कारण नाही. तरीही सौदीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दुसरीकडे सौदीचे भावी राजे आणि विद्यमान पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वात सौदी तेलावरील आपलं अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. खेळाद्वारे जगभरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी सौदीने जगभरातील प्रसिद्ध आणि महागड्या फुटबॉलपटूंना सौदीतील फुटबॉल क्लबकडून खेळण्यासाठी हजारो कोटी रुपये दिले. या खेळाडूंचा वापर सौदी आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळवण्यासाठी करताना दिसतो. पण, हे सौदीचे दुटप्पी धोरण आहे. मोहम्मद बिन सलमान स्वत:च्या देशात जरी इस्लामिक कट्टरवादाला आळा घालण्याचा प्रयत्न करत असले तरी, जगभरात आणि मुख्यत: युरोपमध्ये इस्लामिक कट्टरवादाला खतपाणी घालण्याचे काम करताना ते दिसतात. एका माहितीनुसार सौदीने एकट्या जर्मनीमध्ये २०० मशिदी बांधण्यासाठी अर्थसाह्य केले. मात्र, स्वत:च्या देशात सौदी आणि त्याचे अरब सहकारी आपल्याच निर्दोष बंधूंचे रक्त सांडत आहेत. सौदीच्या तेलावर आपली तहान भागवणार्या युरोप अमेरिकेलाही या प्रवाशांच्या मानवाधिकाराची चिंता नाहीच. त्यामुळे जगात या शरणार्थींना कोणी वाली नाही, हेच खरे!