चांद्रयान-३ मोहिम यशस्वी होण्यासाठी चंद्र देवतेला साकडे
वाराणसीतील भाविक करताहेत होम-हवन आणि पुजा
22-Aug-2023
Total Views |
वाराणसी : चांद्रयान-३ मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना ही मोहिम यशस्वी होण्याकरिता आता देशातील जनतेकडून यज्ञ तसेच पुजा-अर्चना करण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी होऊ दे, असे मागणेही मागण्यात येत आहे. आज वाराणसी येथील मंदिरात लोकांकडून ही पुजा करण्यात येत आहे.
वेदांमध्ये नेहमीच चंद्राच्या पुजेचा उल्लेख करण्यात येतो. त्यामुळे आता चंद्रयान-३ मोहिम यशस्वी व्हावी यासाठी येथील चंद्र देवाकडे प्रार्थना करत आहेत. यावेळी "हम नहीं है किसी से कम, दुनियाने देखा भारत का दम," "वेदों से है विज्ञान, जिसका फल है चंद्रयान" अशाप्रकारच्या घोषणाही देण्यात येत आहेत. चंद्रयान-३ मोहिम यशस्वी होऊन भारताने जगात आपली ओळख निर्माण करावी यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात लोक देवाकडे प्रार्थना करत आहेत.
येथील एका भाविकाने याविषयी बोलताना सांगितले की, "चंद्र देवता हा पंचतत्त्वातील एक असून वाराणसीमध्ये प्राचिन काळापासून चंद्राची पुजा करण्यात येते. त्यामुळेच चंद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी मंदीरामध्ये हे हवन व पुजा करत आहोत. तसेच चंद्रावर गेलेल्या चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण व्हावे आणि इस्त्रोच्या वैज्ञानिकांना यश मिळावे, अशी प्रार्थना आम्ही चंद्राला करत आहोत, असेही त्याने सांगितले. दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅण्डिंग करणार आहे.