जाहिरात, डिझाईन, उपयोजित कला, फोटोग्राफी, संगीत, अध्यापन या क्षेत्रात लिलया कर्तृत्व गाजविणारे प्राचार्य डॉ. मिलिंद ढोबळे यांचा कौतुकास्पद प्रवास...
डॉ. मिलिंद ढोबळे हे नागपूरमधील रामटेकचे. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी, तर आई गृहिणी. आई-वडिलांच्या सुसंस्कारात वाढलेल्या डॉ. मिलिंद यांना बालपणापासूनच शिक्षणाची तसेच कलेची विलक्षण आवड. त्याकाळी करिअरबद्दल त्यांना कुणी मार्गदर्शन न केल्यामुळे प्रवाहपतित होऊन त्यांनी विज्ञान शाखा निवडली. पण, त्यांचे कलासक्त मन विज्ञान रुक्ष करिअरमध्ये रमेना. कारण, कला आणि अभिनवता त्यांच्यात अगदी ठासून भरली होती. विज्ञान हा आपला करिअर प्रांत होणार नाही, हे त्यांनी तेव्हाच ओळखले आणि कलेचे शिक्षण घेण्यासाठी नागपूर विद्यापीठात ‘बीएफए’ उपयोजित कला शिक्षणक्रमास प्रवेश घेतला. संगीत, फोटोग्राफी, जाहिरात, चित्र, नाटक, आविष्कृत कला, संवाद कौशल्य आणि आध्यात्मिक कोशट असलेल्या डॉ. मिलिंद यांनी उपयोजित कलेत विशष प्रावीण्य मिळवत शिक्षण सुरू असताच जाहिरात एजन्सीत कामाची संधी चालून आली. त्या नोकरीने डॉ. मिलिंद यांच्यातील कौशल्याला पैलू पडले.
‘बीएफए’ शिक्षण पूर्ण होताच त्यांनी जाहिरात क्षेत्रात स्वत: व्यवसाय सुरू केला. त्यातील अभिनव, सर्जनशील कामे पाहून नागपूर येथील आर्किटेक्चर कॉलेजमधील प्राध्यापकांनी त्यांना डिझाईन व्हिज्युअल विभागात अध्यापन कराल का, अशी विचारणा केली. अध्यापन हेही पवित्र काम आहे आणि त्यातही रुची आहेच, हे माहीत असलेल्या डॉ. मिलिंद यांना आता नवीन अवकाश गवसणार होते. रामटेक येथे पाच वर्षं त्यांनी अध्यापन केले. इथूनच त्यांच्यातील शिक्षक वर आला. त्यानंतर त्यांनी उपयोजित कलेत मास्टर्स डिग्री मिळवली. पुढे याच विषयात ‘पीएच.डी’ मिळवली. अध्यापन आणि अध्ययन असे दोन्ही सुरू ठेवत त्यांनी ‘पीजीडीएम आर्ट टीचर’ डिप्लोमाही पूर्ण केला.
शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ. मिलिंद यांनी विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात येऊन स्वत:ला सिद्ध करण्याचे ठरवले. पुण्यात डी. वाय पाटील महाविद्यालयाच्या पायभरिणीपासून योगदान दिले. नंतर त्यांनी ‘एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’ला साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. २०१४ मध्ये ‘पीएच.डी’ पूर्ण झाल्यानंतर एमआयटी स्वायत्त विद्यापीठ त्यांना ‘फाईन आर्ट’ विभागाचे प्रमुख म्हणून कामाची संधी चालून आली. त्या संधीचे सोने करत, त्यांनी येथे उपक्रमशीलता कशी जपावी, याचा आदर्श वस्तुपाठ ठेवला. आज ते आदर्श प्राचार्य आणि शिस्तप्रिय डीन, विद्यार्थी प्रिय, आदर्श व्यक्तिमत्व आहेत. हिंदी, मराठी, इंग्रजीवर प्रभुत्व, सुरेख संवाद कौशल्य, कुशल नेतृत्वाचे गुण, प्रगल्भ कला ज्ञान, अध्यात्म ही त्यांची ओळख. विद्यापीठाचे सर्वेसर्वा विश्वनाथ कराड सर, प्र-कुलगुरु अनंत चक्रदेव सर यांचा आपल्यावर खूप प्रभाव असून त्यांच्याकडून खूप शिकायला मिळते, असे डॉ. ढोबळे बोलून दाखवतात. पंकज अष्टनकर, पराग शेळके याही मित्रांचे आपल्या जीवनातील स्थान सांगण्यास ते विसरत नाही. “आपण या जगातून निघून गेलो, तरी लोकांनी आपण चांगले काम केले असे बोलले पाहिजे,” असे ते सांगतात.
कला साक्षरता वाढवण्यासाठी आज काय करण्याची गरज आहे, असे विचारले असता डॉ. ढोबळे सांगतात की, “जीवनातून कला वगळली, तर काहीच बाकी राहत नाही. आपल्या देशात अजिंठा-वेरूळसारखी महान लेणी, चित्र, स्थापत्य जगातील आश्चर्य मानले गेले आहे. जिथे कलेने जन्म घेतला, ती बहरली, त्या जगात आपण कलेचे विश्वगुरू झालो. त्या काळातील समृद्ध कला वारसा जपण्याची जबाबदारी ही सर्वांवर येऊन ठेपली आहे. कलासमृद्ध हिंदुस्थानात आज कलाविषयक जाणीव एकाएकी का उदास झाली, याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे,” असे ते सांगतात.
पालकांना सल्ला देताना डॉ. ढोबळे म्हणतात की, “कलासाक्षरता वाढावी असे वाटत असेल तर पालकांनी आपल्या पाल्यांना कुठली तरी एक कला शिकवावी. त्यात तर प्रवीण करावेच, शिवाय त्याचे महत्त्व पटवून त्यातही उत्तम अर्थार्जन देणारे करिअरही होऊ शकते, हाही विश्वास द्यावा. प्रत्येक विद्यार्थी हा जरी कलावंत होईलच असे नाही. परंतु, आपल्या पाल्यांना कलेची सुरेख अनुभूती पालकांनी देण्यासाठी सदैव कलासक्त वातावरण घरातूनच निर्माण करून द्यावे. तू कलावंत नाहीस, पण कलेचा रसिक तर नक्कीच होऊ शकतो ना, ही मानसिकता आपल्या मुलांमध्ये निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे.”
“माणूस बुद्धिमत्ता, पैसा, कीर्ती, यश, संपती याने कितीही थोर, श्रीमंत झाला तरी जोपर्यंत तो माणूस म्हणून माणसाला वागवत नाही, त्याच्यात प्रेम, सहकार्य भाव, करुणा, मदतीची वृत्ती, सर्वांना घेऊन सोबत जाण्याची प्रवृत्ती तो विकसित करत नाही, तोपर्यंत त्याच्या इतर गुणांना अर्थ उरत नाही. हेच गुण अध्यात्मिक बुद्ध्यांकाने विकसित होतात आणि हा बुद्ध्यांक भगवद्गीता शिकवते,” असे डॉ. ढोबळे सांगतात.
“भारतातील जितके म्हणून कला प्रकार आहेत, त्या सर्वांची जपणूक जगत व्हावी म्हणून काम करत राहावे हे डॉ. मिलिंद दोहबळे यांचे स्वप्न आहे. त्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांना खूप शुभेच्छा.
निल कुलकर्णी
९३२५१२०२८४