लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारकार्यांनी प्रेरित होऊन भारतमातेच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये तन-मन-धन अर्पण करणारे विश्वासराव डावरे. देश आणि धर्मप्रेम त्यांच्या रक्तातच होते. जनतेने मोठ्या आदराने आणि प्रेमाने विश्वासराव डावरे यांना ‘धर्मवीर’ पदवी बहाल केली. त्यांच्या जीवनाचा मागोवा या लेखात घेऊया..
विश्वासराव डावरे म्हणजे क्रांतिकारकांचा वारसा लाभलेले स्वातंत्र्य सेनानी. जॅक्सनच्या वधाच्या गुन्ह्यात त्यांचा संबंध जोडला गेला. सश्रम कारावास झाल्यानंतर, अतोनात छळ सोसूनही त्यांनी इतर क्रांतिकारकांची नावं उघड होऊ दिली नाहीत. विश्वासरावांचा जन्मच काळ्यापाण्याची शिक्षा भोगणार्या वडिलांजवळ अंदमान येथे झाला. त्यांचे चुलत बंधू गोविंदराव म्हणजे महाराष्ट्रातले थोर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा उजवा हात म्हणून गौरविले जात, त्यांना त्यांच्या देशप्रेमासाठी बुधवार चौकात जीवंत जाळले होते. अशा क्रांतिकारी घराण्यात विश्वासराव डावरेंचा जन्म. त्यांनी आपल्या घराण्याचा वारसा अगदी तसाच पुढे चालविला, देशावर तर प्रेम केलेच तसेच आपल्या धर्मावरसुद्धा. समाजात धर्मजागृती व्हावी यासाठी त्यांनी अथांग कार्य केले. धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यात ते अग्रेसर होते. धर्माविरोधी घटनांचा ते यथायोग्य समाचार घेत. त्यामुळेच की काय जनतेने त्यांना ‘धर्मवीर’ ही पदवी बहाल केली होती.
विश्वासरावांचा जन्म १८८८ सालचा. अंदमान येथून परतल्यावर पहिले काही वर्षे त्यांनी नोकरी केली. त्यानंतर मग स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. सगळे घरच क्रांतिकारकांचे होते. त्यामुळे क्रांतिकारी विचारांचा पगडा विश्वासरावांवर नसता तर नवल. विश्वासराव क्रांतिकारी विचारांनी भारावलेले होते. लोकमान्य गंगाधर टिळकांच्या विचारांनी ते प्रेरित झाले. लोकमान्यांचे कट्टर अनुयायी म्हणून त्याची नवी ओळख निर्माण झाली. गणेशोत्सव, स्वदेशी तसेच बहिष्कार चळवळ या सगळ्यात ते कायम सक्रिय असत.
तर असे विश्वासराव पुढे सावरकरांच्या प्रभावळीत सहज सामील झाले. सावरकरांनी जॅक्सन वधाआधी २० पिस्तूलं भारतात पाठवली होती. त्यातले एक पिस्तूल विश्वासरावांकडे मजल-दरमजल करत पोहोचले होते. त्यांचे पिस्तूल बाळगणे हा गुन्हा ठरला आणि त्या गुन्ह्याला जॅक्सन वधाशी जोडले गेले. तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ते ’हाडाचे’ क्रांतिकारक होते. पोलिसांच्या अतोनात शारीरिक, मानसिक छळाला ते बधले नाहीत. कोणाचेही नाव त्यांनी इंग्रजांसमोर उघड होऊ दिले नाही. निश्चय करून एकदा का पाऊल उचलले, तर ते काम तेफत्ते करणारच, कुठल्याही परिस्थिती मागे हटणे त्यांच्या स्वभावातच नव्हते.
नाशिकचा रामरथ सत्याग्रह, मुळशी सत्याग्रह या अनेक सत्याग्रहामध्ये त्यांचे योगदान होते. ते क्रांतिकारी तर होतेच, तसेच ते कट्टर सनातनीसुद्धा होते. आपल्या धर्माविषयी त्यांच्या मनात, वागण्यात सार्थ अभिमान दिसत असते. महाराष्ट्र वर्णाश्रम स्वराज्य संघाचे ते सलग सात वर्ष अध्यक्ष होते. जिथे जिथे धर्मावर घाला घातली जाई, तिथे तिथे ते पूर्ण आवेशाने काम करत, आपले विचार निर्भीडपणे ते मांडत असत. देशाविषयी, देशभरातील नेतृत्वाविषयी, धर्माविषयी त्यांची मते स्पष्टपणे मांडत असे. अशा या कट्टर, देशाभिमानी, धर्मवीर, सनातनी आणि कर्मठ क्रांतिकारकांनी देशात उगवलेला स्वातंत्र्य सूर्य बघून १९५७ साली अखेरचा श्वास घेतला. त्यांचे कार्य आणि विचार ही पुढच्या पिढ्यांच्या प्रेरणास्थानी राहो हीच त्यांना खरी श्रद्धांजली...
सोनाली तेलंग
९८८११३२३९३