नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशातील १३.५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. त्याचवेळी जनतेचे सरासरी उत्पन्नदेखील वाढले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मध्य प्रदेशातील रोजगार मेळाव्यास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अमृत काळाच्या पहिल्या वर्षात मिळालेल्या दोन सकारात्मक घटना म्हणजे देशातील गरिबीमध्ये झालेली घट आणि देशाच्या समृद्धीमध्ये झालेली वाढ. पहिली बाब म्हणजे नीती आयोगाच्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे की केवळ ५ वर्षात १३ .५ कोटी भारतीय दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत. दुसरी बाब म्हणजे यावर्षी दाखल झालेल्या प्राप्तिकर विवरणपत्रातून हे सूचित होत आहे की गेल्या ९ वर्षात जनतेच्या सरासरी उत्पन्नात वाढ झाली आहे. प्राप्तिकर आकडेवारीनुसार २०१४ मध्ये जनतेचे सरासरी उत्पन्न ४ लाख रुपये होते, ते २०२३ मध्ये १३ लाख रुपये झाले आहे.देशातील अल्प उत्पन्न गटातून उच्च उत्पन्न गटामध्ये स्थानांतरित होणाऱ्या लोकांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. या आकडेवारीतून रोजगारांच्या संधीत वाढ झाल्याची हमी मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार क्षेत्रात दूरगामी धोरणे तयार करून आणि निर्णय घेऊन काम केले जात आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून आपण केलेल्या भाषणात पीएम विश्वकर्मा योजनेच्या घोषणेचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, ही योजना याच दूरदृष्टीचे प्रतिबिंब आहे. एकविसाव्या शतकातील गरजांनुसार विश्वकर्मांच्या पारंपरिक कौशल्यांना जुळवून घेण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले. यावर सुमारे १३ हजार कोटी रुपये खर्च होणार असून १८ विविध प्रकारच्या कौशल्यांशी निगडित असलेल्यांना याचा फायदा होणार असल्याचीही माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.