महापुरुषांचा वारसा जगताना...

    21-Aug-2023   
Total Views |
Article On Jaya Ankush Bansode

जया अंकुश बनसोडे आणि न्याय-हक्काचा लढा हे समीकरण अगदी पक्के. तडफदार नेतृत्वशक्ती असलेल्या जया बनसोडे यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा मागोवा...

काही वर्षांपूर्वी जया बनसोडे यांना सिंगापूर येथे नोकरी लागली. आयुष्यभराची आर्थिक ददातच मिटणार होती. तिथे त्यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधाारित पुस्तक वाचायला घेतले. त्यात अत्यंत हालअपेष्टेचे जीवन जगातानाही परदेशात रात्रंदिवस अभ्यास करणाारे बाबासाहेब माता रमाईला सांगतात की, त्यांना पुन्हा मायदेशी येऊन आपल्या समाजासाठी काम करायचे आहे. हा भावार्थ असणारा संवाद वाचतानाचा तो क्षण जया यांच्या मनात प्रचंड उलथापालथ करून गेला आणि परदेशातली चांगली नोकरी सोडून त्या पुन्हा भारतात परतल्या. पुढे रेल्वेमध्ये काही वर्षे त्यांनी नोकरी केली. नोकरी करत असताना समाजातील गरजू-गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणे सुरूच ठेवलेे. एक वेळ अशी आली की, सामाजिक कार्यासाठी जया यांनी रेल्वेतली स्थैर्यशील नोकरीही सोडली. जया बनसोडे आज महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून गणल्या जातात. धम्माचा प्रसार-प्रचार व्हावा म्हणून त्या कार्य करतात. कुठेही कुणावरही अन्याय अत्याचार झाला की संबंधित जया बनसोडे यांना हक्काने बोलावतात.

जया यशस्वी उद्योजिका आहेत. त्यांची ‘ब्लू राइझिंग इन्फ्रा प्रा. लि’ कंपनी आहे, तर ‘टारगेट सिक्युरिटी’ कंपनीमध्ये त्या भागीदार आहेत. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असू दे की, ‘बार्टी’मार्फत मिळणार्‍या शिष्यवृत्तीचा प्रश्न असू दे की जातीय किंवा इतर कारणाने होणारे अन्याय असू दे, जया बनसोडे या सगळ्या आंदोलनांचे नेतृत्व करताना दिसतात. जया आणि आंदोलन हे एक समीकरणच. पण, या आंदोलनामध्ये कुठेही विंध्वसकता नसते की उगीचच कुणाच्या विरोधातली आगपाखड, वैयक्तिक द्वेष नसतो. त्या समाजात जागृती करतात की, महापुरुष कुण्या एका समाजाचे बांधिल नाहीत, तर ते सगळ्या देशाचे आहेत. नुकतेच मुंबईतील चेंबूरमधील आचार्य महाविद्यालयात ड्रेसकोडला काही लोकांनी विरोध करत बुरख्याचे समर्थन केले. त्यावेळी जया तिथे पोहोचून विरोध करणार्‍यांना म्हणाल्या, ”आज बुरख्याचे समर्थन करतो ठीक आहे. पण, उद्या कुणी विद्यार्थी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्याचाच हट्ट करू लागले तर? त्यामुळे सर्वांना समान असा ड्रेस कोड असलेला कधीही चांगला!” जया यांचा मुद्दा बिनतोड होता.

जया यांच्या जीवनाचा मागोवा घेऊया. बनसोडे कुटुंब मूळचे सातार्‍याच्या सुरली गावचे. कामानिमित्त अंकुश बनसोडे मुंबईत आले. त्यांची पत्नी सत्यभामा. उभयतांना तीन मुले. त्यापैकीच एक जया. मिल बंद पडण्याचा तो काळ. अंकुश यांनी मजुरांच्या हक्काचा लढा उभारला. लढा थांबवण्यासाठी त्यांना अनेक प्रलोभनेही देण्यात आली. पण, अंकुश त्या प्रलोभनांना बळी पडले नाहीत. कामगारांच्या हक्कासाठी ते ठाम राहिले. त्यांच्या विरोधातील लोकांनी त्यांच्या हत्येचा कट रचला. एक दिवशी दोन मित्रांसोबत उभे असताना त्यांच्यावर आणि मित्रांवरही हल्ला झाला. त्यात दुर्दैवाने त्यांचे दोन्ही मित्र वारले आणि अंकुश सहा महिने कोमामध्ये गेले.

दरम्यान, मिल दुसरीकडे गेली. याचा परिणाम संपन्न असलेल्या बनसोडे कुटुंबावर झाला. पदरी असलेल्या तीन मुलांना जगवण्यासाठी सत्यभामाबाई घरकाम करू लागल्या. कालांतराने अंकुश बरे झाले. घरी आल्यानंतर पुन्हा त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले. मात्र, घरावर कोसळलेल्या गरिबीने सर्व प्रकारची दुःखे सोबत आणली होती. त्यामुळे शिक्षणाचा खर्च तरी भागावा, यासाठी जया यांनी चणा पटपटी विकण्याचेही काम केले. पुढे एका स्वयंसेवी संस्थेने जया यांचा शैक्षणिक खर्च उचलला. त्यावेळीही या संस्थेमार्फत इतर अनेक गरीब विद्यार्थ्यांना जया यांनी मदत मिळवून दिली. या काळात अंकुश यांनी जयामधले नेतृत्व गुण, वक्तृत्व कला विकसित व्हावी, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनगाथा अंकुश जया यांना सांगत.

अशातच जया जिथे राहत होत्या, ती वस्ती विकासकामासाठी तोडली गेली. बेघर झालेल्यांना सरकारमार्फत घर मिळावे म्हणून अंकुश यांनी मोठे आंदोलन उभाारले. सगळेजण म्हणत गरिबांचे कोण ऐकणार? तरीही अंकुश सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिले. प्रचंड संघर्ष धावपळीतून शेवटी सगळ्यांना पर्यायी घरही मिळाली. अंकुश यांच्यासाठी विजयाचा क्षण. मात्र, ज्या दिवशी घराची किल्ली मिळणार त्याच्या काही दिवसापूर्वीच अंकुश यांना हृदयविकाराचा झटका आला. मृत्यू येण्याच्या काही क्षणांपूर्वीच ते जया यांना हसत हसत म्हणाले , ”न्यायासाठी हक्कासाठी मनापासून काम केले, तर विजय होतोच.” वडिलांचे तेच वाक्य जया यांना नेहमीच प्रेरणा देते. त्यामुळेच जया समाजकार्यात नेहमीच अग्रेसर आहेत. कोरोना काळातही त्यांनी भरपूर कार्य केले.

कोरोना काळात वस्तीतील काही लोकांवर उपासमारीची पाळी आली. जया यांनी सगळ्यांना सर्वतोपरी मदत केली. सेवा केली. तेव्हा त्यातील काही लोक रडले. कारण, जया लहान असताना त्यांनी जया आणि त्यांच्या भावंडांना गरीब म्हणून प्रचंड छळले, हिणवले होते. मात्र, जया ते सगळे विसरून त्यांची सेवा करत होत्या. या सगळ्याबाबत जया यांचे म्हणणे, ”कटुता किती काळ आठवायची? तथागत गौतम बुद्धांनी पंचशील आणि अष्टांग मार्ग दिला आहे. त्या मार्गावर केवळ मंगल कामनाच आहे. शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर चालत शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी काम करायचे आहे. या मार्गात द्वेष आणि वैर नाही, तर केवळ समाजाचे कल्याण आहे.” शाहू, फुले,आंबेडकरांचा वैचारिक वारसा जगणार्‍या जया बनसोडे आज समाजासाठी आदर्श आहेत.

९५९४९६९६३८
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.