‘उद्योग रोजगार मित्र’ ठरणार वरदान

उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात मान्यवरांचे प्रतिपादन

    20-Aug-2023
Total Views |
Maha Govt the Industry Awards Ceremony

मुंबई :
महाराष्ट्र शासनाच्यावतीने यंदापासून सुरु करण्यात आलेले ’महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ मान्यवरांच्या हस्ते रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. यावेळी ’उद्योग रोजगार मित्र’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम नवउद्योजकांसाठी वरदान ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य आर्थिक विकास महामंडळाच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘बीकेसी’ संकुलात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योगविभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ वितरण सोहळा झाला. राज्याचा पहिला ‘उद्योग रत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार ‘टाटा समूहा’चे पितामह रतन टाटा यांना त्यांच्या निवासस्थानी देण्यात आला. आजच्या कार्यक्रमात ‘टाटा ट्रस्ट’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना ’उद्योग रत्न’ पुरस्काराचे स्मृतिचिन्ह देण्यात आले.

‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांना ’उद्योग मित्र’ पुरस्कार देण्यात आला. महिला उद्योजिकेला देण्यात येणार ’उद्योगिनी पुरस्कार’ ‘किर्लोस्कर समूहा’च्या संचालिका गौरी किर्लोस्कर यांना देण्यात आला, तर ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर्स’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना ’उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार देण्यात आला.

भावी उद्योजकांना प्रेरणा मिळेल : राज्यपाल

सरकारने या पुरस्कारांचे आयोजन केल्यामुळे भावी उद्योजकांना यातून प्रेरणा मिळेल. आता राज्य सरकार, केंद्र सरकारची जबाबदारी वाढली असून आपल्याला भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी यशस्वी आगेकूच केली पाहिजे.

टाटांमुळे पुरस्काराची उंची वाढली : एकनाथ शिंदे

खर तर हा राज्याचा व उद्योग विभागाचा व महाराष्ट्रातील नागरिकांचादेखील सन्मान आहे. रतन टाटा यांना ‘उद्योग रत्न’ पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची खूप वाढली आहे. टाटा म्हणजे विश्वास ही टाटा समूहाची ओळख असल्याने सर्वसामान्य माणसाला रतन टाटा यांचा कर्तृत्वाचा आदर वाटतो.

महाराष्ट्राची गतिमान भरभराट : अजित पवार

महाराष्ट्राची औद्योगिक क्षेत्रातील कामगिरी आणि भरभराट गतिमान आहे. उद्योग-व्यवसायांना चालना देऊन महाराष्ट्राचा विकास साधायचा आहे. त्यातूनच सर्वसामान्यांचीही प्रगती होणार आहे.

अदर पुनावाला : महाराष्ट्र सरकारचे विशेष कौतुक आपण यापुढेही महाराष्ट्रातच गुंतवणूक करणार असून राज्याच्या प्रगतीसाठी हातभार लावणार.

गौरी किर्लोस्कर : आपण आर्थिक पातळीवर पुढे जात असताना यापुढेही अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

विलास शिंदे :
हा पुरस्कार स्वीकारताना अत्यानंद होत असून शेतकी व्यवसायाला औद्योगिक क्षेत्र पुरस्काराचा दर्जा मिळाल्याबद्दल कृतज्ञ आहे.

उद्योग रोजगार मित्र

महाराष्ट्र शासनाच्या ‘युआर पोर्टल’चे अनावरण या समारंभात करण्यात आले. ‘उद्योग रोजगार मित्र’ या संकल्पनेची मुहूर्तमेढ उद्योग विभागाकडून रोवण्यात आली आहे. माहितीच्या अभावी अनेक स्टार्टअप सुरू करताना अनेक तरुण तरुणींना अडचणी येतात. त्यामुळे एकाच ठिकाणी सगळ्या उद्योजकांचा शंकेचे आणि सर्व स्तरावर सहाय्याचे निदान होण्यासाठी हे संकेतस्थळ वरदान ठरणार आहे. यावर नोंदणी केल्यावर त्या सुरू केलेल्या उद्योगाला काय संसाधनांची आवश्यकता आहे, याची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.