‘वेस्टर्न ट्रॅगोपॅन’चे यशस्वी ब्रीडींग करण्यात भारत अग्रेसर

हिमाचल प्रदेशात या पक्ष्याचे जगातील पहिलेच कॉन्झरवेशन

    02-Aug-2023   
Total Views |

western tragopan


मुंबई (समृद्धी ढमाले): हिमाचल प्रदेशचा राज्य पक्षी असलेला वेस्टर्न ट्रॅगोपॅन या पक्ष्याची संख्या जगभरात ३००० हुन अधिक कमी आहे. आयुसीएनच्या व्हलनर्बेल म्हणजेच असुरक्षित वर्गात येणाऱ्या या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी हिमाचल प्रदेश वनविभागाच्या वन्यजीव शाखेने बंद अधिवासात या पक्ष्यांचे प्रजनन सुरू केले. जगात या पक्ष्यांच्या प्रजातीसाठी पहिल्यांदा राबविण्यात आलेल्या कॉन्झरवेशन प्लॅनमुळे बंद अधिवासातील या पक्ष्यांची संख्या वाढली असुन त्यांचा अधिवास वाचविण्याची काही सकारात्मक चिन्हे या निमित्ताने दिसत आहेत.


जगभरात भारतातील हिमाचल प्रदेश, जम्मु काश्मिर आणि दक्षिण पाकिस्तानच्या काही भागातच आढळुन येत असलेल्या ‘वेसटर्न ट्रॅगोपॅन’ हा पक्ष्यांच्या फिझंट्स या कुळात येतो. फिझंट्सचे ५० हुन अधिक वर्ग आहेत. ट्रॅगोपॅनच्या भारतात ४ आणि चिनमध्ये १ अशा पाच प्रजाती आशिया खंडात आढळतात. साधारण २००२ साली सुरू झालेल्या बंद अधिवासातील प्रजननावेळी ९ पक्ष्यांपासुन सुरूवात करण्यात आली होती. तर, आता त्यांची संख्या वाढुन जवळपास ५० पर्यंत गेली आहे.


काय होता हिमाचल प्रदेशचा ब्रीडींग प्लॅन?
 
नैसर्गिक अधिवासात असलेल्या काही ट्रॅगोपॅन पक्ष्यांना पकडुन त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना योग्य वातावरणात ठेवले जाते. नर आणि मादी यांच्या जोड्यांची निवड करुन त्यांना प्रजननासाठी एकत्र ठेवले जाते. प्रजननानंतर त्यांच्या पिल्लांचं इंटरब्रीडींग (म्हणजेच आंतर प्रजनन) होऊ न देण्यासाठी वेगळं ठेवले जाते. याचमुळे या पक्ष्यांमध्ये योग्य ती जेनेटिक डायवर्सिटी म्हणजेच अनुवांशिक विविधता राखण्यास मदत होते.


नैसर्गिक अधिवासात या पक्ष्यांना सोडणं आव्हानात्मक का असेल?

बंद अधिवासात वाढवलेले पक्षी आणि मुक्त नैसर्गिक अधिवासात वाढलेले पक्षी यांच्या अधिवास सवयींमध्ये मोठा फरक असतो. बंद अधिवासातील ट्रॅगोपॅनला स्वतःचे खाद्य शोधणे किंवा घरटे बनवणे या क्रिया अवगत नसतात. त्यामुळे नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर यांना परिस्थितीशी जुळवुन घेण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे या पक्ष्यांना प्रथम (small enclosure) छोट्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाते, या अधिवासात जुळल्यानंतर काही दिवसांनी या पक्ष्यांना मोठ्या जंगल प्रदेशात सोडले जाते. यामुळे त्यांचे नैसर्गिक अधिवासाच्या अडचणीपासुन होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी किंवा टाळण्यास मदत होते.


संकटग्रस्त किंवा धोक्यात असलेल्या अनेक प्रजातींना वैज्ञानिक व्यवस्थापन आणि संवर्धन प्रजननाची गरज आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांचे यश हे शास्त्रज्ञ आणि स्थानिक लोक यांच्यातील समन्वय आणि सहकार्यावर अवलंबून असते.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.