मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे बुधवार दि. २ ऑगस्ट रोजी निधन झाले. कर्जत येथे त्यांनी उभारलेल्या एन.डी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ अगदी अलिकडचा ‘पानिपत’ अशा अनेक चित्रपटांचे त्यांनी कलादिग्दर्शन केले होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट आणि रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलेल्या नितीन देसाईंनी दादासाहेब फाळके चित्रपटनगरीतून काम करण्यास सुरुवात केली. नितीश रॉय या प्रसिध्द कलादिग्दर्शकाच्या हाताखाली त्यांनी पहिल्यांदा १९८७ साली ‘तमस’ या गोविंद निहलानी दिग्दर्शित मालिकेसाठी कलादिग्दर्शन केले होते.
तसेच, ‘चाणक्य’ या गाजलेल्या ऐतिहासिक मालिकेसाठी सुरूवातीला सहाय्यक म्हणून आणि नंतरचे काही भाग त्यांनी स्वतंत्रपणे कलादिग्दर्शन केले. मालिका, चित्रपट अशी सुरूवात करणाऱ्या नितीन देसाईंना हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कलादिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा नावलौकिक मिळाले ते विधू विनोद चोप्रा निर्मित ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ चित्रपटातून. त्यानंतर ‘परिंदा’, ‘मिशन काश्मीर’, ‘एकलव्य’पासून ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ’खामोशी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘मंगल पांडे : द रायझिंग’, ’फॅशन’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘जेल’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम केले.
उभारला हिमाचल प्रदेशमधील दलहौसीसारखाच हुबेहूब सेट
खासकरून ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’मधील कलादिग्दर्शनामुळे त्यांचं सर्वात जास्त कौतुक झालं अन् यामुळेच त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी हिमाचल प्रदेशमधील दलहौसीसारखाच हुबेहूब सेट नितीन देसाई यांनी मुंबईच्या चित्रनगरीत उभारला होता.
लालबागच्या राजाचे देखाव्याचे कामही देसाईंनी केले
एकीकडे हिंदीत काम करत असताना दुसरीकडे देसाईंनी ‘लालबागचा राजा’ सारख्या नामांकित गणेश मंडळांच्या देखाव्याचे कामही त्यांनी सुरू ठेवले होते. पुढे काही हॉलिवूड चित्रपटांसाठीही त्यांना कलादिग्दर्शक म्हणून बोलवण्यात आले. त्यांनी ‘सलाम बॉम्बे’, ‘कामसूत्र’, ‘जंगल बुक’, ‘सच लॉंग जर्नी’ अशा काही निवडक आंतरराष्ट्रीय चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले. त्यातही खास लक्षात राहिला तो डॅनी बोएल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा चित्रपट. या चित्रपटासाठी ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा हुबेहुब सेट तयार करुन दिला होता.
लाल किल्ला, ताज महाल ते एन. डी. स्टुडिओ
‘जोधा अकबर’ चित्रपटासाठी नितीन देसाई यांनी लाल किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. ‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील एका गाण्यासाठी ताजमहालची अंतर्गत रचना आवश्यक होती. प्रत्यक्ष वास्तूत चित्रीकरणाची परवानगी न मिळाल्यामुळे त्याची प्रतिकृती उभारली होती. ‘राजा शिवछत्रपती’ या नितीन देसाई यांचीच निर्मिती असलेल्या चित्रपटासाठी आवश्यक असलेले ऐतिहासिक सेट्स, विविध ऐतिहासिक मालिकांसाठी केलेले कलात्मक बांधकाम, ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटासाठी तयार केलेला शीश महल, नक्षीदार खांब, रथ, शस्त्रास्त्रे, पौराणिक-ऐतिहासिक वस्त्रे-प्रावरणे, अलंकार अशा सगळ्या कलात्मक गोष्टींना त्यांनी संग्रहित करत २००५ साली कर्जत येथे ‘एन. डी. स्टुडिओ’ उभा केला. ऐतिहासिक मालिक, चित्रपटांचे कला दिग्दर्शन त्यांनी अधिक केल्यामुळे देसाईंनी त्या प्रतिकृतींना अधिक महत्व दिले होते.
हत्तींबद्दल होतं विशेष प्रेम
नितीन देसाई यांनी हत्तींविषयी बोलताना सांगितले होते की, “पॅरिसमधील एका रेल्वे स्थानकापासून मी संपूर्ण रस्त्यावर एका रात्रीत हत्तींची मांडणी केली होती. जवळपास २४ फुटांचे १२ हत्ती एनडी स्टुडिओमध्ये बनवून मी पॅरिसच्या रस्त्यावर उभे केले होते. इथून ते हत्ती फोल्ड करून माझ्या टीमने पाठवले होते. मी आणि माझी बायको आम्ही दोघांनीही रात्रभर रस्त्यावर उभे राहून त्या हत्तींची व्यवस्थित मांडणी करून घेतली. रात्री ९ पासून सुरु करून सकाळी ६ वाजता सगळी तयारी पूर्ण झाली”, असे देसाईंनी सांगितले होते.