कृतिशील पर्यावरण संवर्धक

    02-Aug-2023   
Total Views |
Article On Environmental Enrichment Charuchandra Devsthale

स्वतःची शैक्षणिक अभियांत्रिकीची पार्श्वभूमी, व्यवसायवृद्धी आणि पर्यावरण अशी तिघांची सांगड घालणारे कृतिशील पर्यावरण संवर्धक चारुचंद्र देवस्थळे यांचा हा प्रवास...

आपल्या घरातील कचर्‍याचे व्यवस्थापन आपण स्वतःच करून पर्यावरण संवर्धनात मोलाचा हातभार लावू शकतो,’ असा दृढ विश्वास व्यक्त असणार्‍या चारुचंद्र देवस्थळे यांचा जन्म कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील आजर्‍याचा. कोल्हापुरातील जन्म असला, तरी त्यांचे संपूर्ण आयुष्य मुंबईतच गेले. दादरमधील शिशुविहार माध्यमिक विद्यामंदिर येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे आर्थिक प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत, या दृष्टिकोनातून त्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.

मुंबईतील वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजीकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) या नामवंत महाविद्यालयातून त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील ‘थर्मक्स’ या कंपनीमध्ये त्यांनी ‘इरेक्शन अ‍ॅण्ड कमिशनिंग इंजिनिअर’ म्हणून काम केले. पहिल्यापासूनच देवस्थळे यांना रसायनशास्त्राची आवड. ‘थर्मक्स’मधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून १९९८ मध्ये त्यांनी स्वतःचे उत्पादन आणावे, या दृष्टिकोनातून ‘एक्झिमिअस व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी सुरू केली.

’एस्बेस्टोस’ या पदार्थापासून त्या काळी ‘ग्लॅण्डपॅकिंग्स’ मोठ्या प्रमाणात केले जायचे. ’एस्बेस्टोस’मुळे कंपनीतील कामगारांना कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे ’एस्बेस्टोस’ नसलेल्या वस्तू बाजारात आणणे, हा देवस्थळे यांचा उद्देश होता. आता ’एस्बेस्टोस’वर सर्वत्र बंदी आहे. मात्र, ‘नॉन-एस्बेस्टोस’ वस्तूंची निर्मिती करणारे देवस्थळे प्रथम भारतीय होते. ’एस्बेस्टोस’ हा एक खडकाचा प्रकार असल्याने त्यामुळे बर्‍याच ठिकाणी कंपन्यांच्या पाईपलाईनमध्ये होणारी गळती थांबविता येत नव्हती. याला पर्याय म्हणून इंजिनिअरिंगमध्ये वापरल्या जाणार्‍या फायबर्सच्या माध्यमातून त्यांनी यावर उपाय शोधला.

सुरुवातीला अमेरिकेमध्ये याचे प्रशिक्षण घेऊन परतलेले देवस्थळे तिकडूनच कच्चा मालही आयात करत असतं. हे मॉडेल वापरून काही कंपन्यांना त्यांची पाईपलाईन गळती थांबवण्यासाठी उपाय शोधून दिले. काही कालावधीनंतर हे कच्चा माल आयात करणे थांबविले आणि त्या वस्तूंची स्वतःच निर्मिती ही सुरू केली. पण, हे करताना जैवविघटनशील उत्पादनांची निर्मिती करणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. साबणांमध्ये असलेल्या फॉस्फेटमुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते. हे टाळण्यासाठी प्रदूषण न करणारी उत्पादने बाजारात आणण्याच्या दृष्टीने ‘वॉटर बेस्ड डिटर्जंट’ची प्रथम निर्मिती केली. याची योग्य ती चाचणीही करून घेण्यात आली आणि यशस्वी चाचणीनंतर, हे उत्पादन बाजारात विक्रीसाठी आणले.

दुसरे म्हणजे, अशाच मोठमोठ्या कंपन्यांमधील पाईपलाईनमध्ये ‘डिकार्बनायझेशन’ची प्रक्रिया केली जाते. तेल कंपन्यांच्या पाईपमध्ये अडकलेल्या कार्बनला या माध्यमातून काढले जायचे. यामध्ये पाण्याने ही पाईपलाईन स्वच्छ केली जात होती. पण, पाणी आणि तेल हे एकमेकांचे शत्रू आहेत, ते काम करणार नाहीत, हे लक्षात घेऊन देवस्थळे यांनी ‘ऑईल टू ऑईल’ ही सिस्टिम अस्तित्वात आणली. तेलयुक्त काही रसायनांचा वापर करून तयार केलेल्या उत्पादनांचा लाईन स्वच्छ करण्यासाठी वापर केला जाऊ लागला. यात पाईपलाईन आहे, तिथेच स्वच्छ झाल्यामुळे संपूर्ण पाईपलाईन बदलण्याची गरज पडत नाही. तसेच, यामध्ये तेलाचीही बचत होते. या प्रक्रियेमध्ये आजवर तब्बल २७ लाख लीटर तेल वाचवले गेले आहे. अशाप्रकारची रसायने बनवून फॅक्टरी स्वच्छ करणारा हा पहिलाच प्रयोग होता.

पाण्याची समस्या लक्षात घेता, मोठमोठ्या कारखान्यांमधून वाया जाणारे किंवा बाहेर पडणार्‍या पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी वॉटर फिल्टरिंग यंत्रणाही तयार केली. या यंत्रणेमुळे दोन लाख लीटर पाणी बाहेर टाकण्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षाही अधिक कमी होऊन २५-३० हजार लीटर पाणीच बाहेर टाकले जात होते. अशाप्रकारे एक लाख ७५ हजार लीटर पाण्याची बचत केली जाते. हे उदाहरण कमीअधिक प्रमाणात अनेक कंपन्यांमध्ये उपयुक्त ठरले. या सर्व कामात त्यांचे भाऊ देवेंद्र देवस्थळे यांचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य वेळोवेळी मिळत राहिले.

खरा उद्योग तेल बदलण्याचा, मात्र त्यापेक्षा अधिक महत्त्व तेल बचतीला महत्त्व देणारे देवस्थळे यांच्यात व्यावसायिकापेक्षाही एक पर्यावरणवादी अधिक प्रबळपणे जागा आहे, असेच म्हणायला हवे. याच कामाविषयी त्यांची पाच पेटंट्स प्रस्तावित आहेत. गेली २२ वर्षं कोणत्याच प्रकारचा कचरा घराबाहेर जाऊ न दिलेल्या या ‘इकोफ्रेंडली’ कुटुंबाने स्वतःच्या घरातल्या कचर्‍याचे स्वतःच व्यवस्थापन करुन एक आदर्श प्रस्थापित केला आहे. आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करून त्याच्या व्यवस्थापनासाठी अनेक छोटे-छोटे प्रयत्न आजही देवस्थळे कुटुंबीय करतात. कचर्‍यापासून विविध वस्तू बनवण्याचेही त्यांनी अनेक प्रयोग केले.

छोट्या-छोट्या उपक्रमांमधून पर्यावरण संवर्धनाचे नुसते धडेच नाही, तर दैनंदिन जीवनात प्रत्यक्षात त्याचे आचरण करणार्‍या देवस्थळेंसारख्या अनेक निसर्ग संवर्धकांची आज आपल्याला नितांत गरज आहे. ‘स्मॉल स्टेप्स मेक बिग डिफरन्सेस’ या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचा एवढा विचार करणार्‍या या कृतिशील संवर्धकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.