तालिबान्यांचा निषेध!

    02-Aug-2023   
Total Views |
Afghan Singer Hasiba Noori Killed In Attack By Unknown Gunmen In Pakistan

हसिबा नुरी ही अफगाणिस्तानातील प्रथितयश आणि लोकप्रिय गायिका. पारंपरिक अफगाणी संगीताचा आधुनिकतेशी मेळ साधत ती गायची. जगभरात तिचे चाहते होते. तिचे संगीत अल्बम विशेष गाजले. अंगभर कपडे परिधान करत अत्यंत संयत अविर्भाव करत ती गीत गायची. तिच्या संगीत अल्बममध्ये कधी-कधी पुरूषही असायचे. पण, ते तिच्यापासून चार हात लांब राहूनच अभिनय करायचे. अभिनय करायचे म्हणजे काय? तर तिच्याकडे पाहत चालणे, प्रेमाचा कटाक्ष टाकणे, इतपतच पुरूष सहकार्‍यांचा अभिनय तिच्या अल्बममध्ये सहसा असे. २०२१ साली अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आली आणि सगळ्याच अभिजात कलांवर संकट कोसळले. एका वर्षापूर्वी जीव वाचवण्यासाठी आणि कला जोपासण्यासाठी हसिबा पाकिस्तानमध्ये आली.

दुसरीकडे शांतीचा संदेश देणार्‍या तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या फोडणार्‍या, मुलींना माध्यमिक शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍या आणि मुली-महिलांचे जीवन नरक बनवणार्‍या तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये कलाकारांनाही वेठीस धरले. ते कलाकारांना शोधून-शोधून त्यांची हत्या करू लागले. फवाद अंद्राबी नावाचा एक लोककलाकार होता. २०२१ साली तालिबान्यांनी फवादला त्याच्या राहत्या घरातून खेचत फरफटत नेले आणि त्याच्या मस्तकात गोळी झाडून त्याची क्रूर हत्या केली. त्याचा गुन्हा काय होता तर? तो गायक होता. तालिबान्यांच्या मते, ‘इस्लाममध्ये संगीत आणि वाद्य वाजवणे हराम आहे. तो संगीत आणि वाद्य वगैरे वाजवून इस्लामविरोधात वर्तन करत होता.’ ‘शरिया’च्या विरोधात ‘अस्मानी किताब’च्या विरोधात वागणारा हा धर्मविरोधी आहे, त्यामुळे त्याने मरणेच योग्य त्याला मारणेच त्याहून योग्य, असे तालिबान्यांना वाटले. फवादच्या हत्येने अफगाणिस्तानच्या उरल्यासुरल्या कलाविश्वात दुःखाचे आणि त्याहून भीतीचे वातावरण पसरले. अनेक कलाकारांनी त्यांच्या कलेला रामराम ठोकला आणि ते मन मारून जगू लागले, तर जे अफगाणिस्तानातून पळून जाऊ शकत होते, ते इतर देशात पळून गेले आणि शरणार्थीचे जीवन जगू लागले. त्यापैकीच एक हसिबा नुरी.

हसिबा नुरी पाकिस्तानमध्ये पळून आली. मात्र, तिच्या नशिबातले दुर्देव चुकले नाही. हसिबाचा पाकिस्तानमध्ये खून करण्यात आला. तिच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्या. फवाद आणि हसिबा यांचा मृत्यू अफगाणिस्तानच्या इतिहासामध्ये अत्यंत लज्जास्पद आणि मानवतेला काळिमा फासणारा आहे, हे नक्कीच! महिलांना शिक्षण, नोकरी आणि एकंदर सगळ्याच जगण्यांवर अमानुष बंदी घालणार्‍या तालिबान्यांनी नंतर-नंतर तर अफगाण नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्यातही बंधने लादण्यास सुरुवात केली. जसे महिलांनी कुठे, कसे फिरायचे याबाबतची बंधने, अंगभर आणि केस झाकणारा रंगरहित, त्यातही काळा पोषाख म्हणजे सैलसर बुरखा घालणे; महिलांना अनिवार्य होतेच. यातून केवळ महिलांचे डोळे दिसतील, इतकीच काय ती सूट. पुढे महिलांच्या सौंदर्य प्रसाधन ते ब्युटी पार्लरवरही बंदी घालण्यात आली. का? तर यामुळे म्हणे, ‘कौम बरबाद होते.’ याहीपुढे जाऊन तालिबान्यांनी दि. १९ जुलै रोजी आणि काल-परवाही लाखो रूपये किमतीची संगीत वाद्ये जाळून टाकली. काही खासगी संस्था संगीत शिकवायच्या. त्यामधली वाद्ये जाळून त्याचे व्हिडिओ तालिबान्यांनी प्रसारित केले. खूप मोठी शूरता-वीरताच केली जणू. माणसाच्या रक्ताला चटावलेल्या आणि धर्माच्या नावावर अधर्म आणि अमानुषतेचा नंगा नाच करणार्‍या तालिबान्यांचे कुणीही समर्थन करणार नाही. जग त्यांची निंदाच करत आहे.

काही शतकांपूर्वी भारतात इस्लामी आक्रांता आले, त्यांनीही नालंदा विश्वविद्यालय असेच जाळले होते. काही महिन्यांपूर्वी फ्रान्समध्ये अशीच वास्तू जाळली होती. रानटी युगातून, हे बाहेर येणार की नाही? अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यावर आपल्या बापाचं राज्यचं आलं, असे वाटून आनंदित होणारे भारतातही दिसले होते. भारतात आकंठ स्वातंत्र्य उपभोगत, तालिबानी राज्याची भलावण करणार्‍यांचे आता तालिबान्यांबद्दल काय मत आहे? तूर्तास हसिबा नुरी यांचा खून आणि अफगाणिस्तानच्या कलाविश्वाच्या विनाशाबद्दल तालिबान्यांचा निषेध!

९५९४९६९६३८


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.