मलिकांविरोधात कुठलीही तक्रार मागे घेतली नाही! लढा सुरूच रहाणार : मोहित कंबोज

    19-Aug-2023
Total Views |

Mohit Kamboj


मुंबई :
एका इंग्रजी वृत्तपत्राद्वारे कोविड नियमवाली उल्लंघन केल्याप्रकरणी नवाब मलिकांविरोधातील तक्रार मोहित कंबोज यांनी मागे घेतली, अशी बातमी देण्यात आली होती. नवाब मलिक जामीनावर तुरुंगाबाहेर आल्यानंतर अशाप्रकारची बातमी आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

 
मात्र, अशी कुठलीही तक्रार मागे घेण्यात आली नाही, हे वृत्त धादांत खोटे आहे, अशी माहिती मोहित कंबोज यांनी ट्विट करत दिली आहे. कंबोज म्हणाले, "'टाईम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रात मी नवाब मलिकांविरोधातील खटला मागे घेतल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. कोविड काळात नवाब मलिकांविरोधात मी मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर मलिकांनी शक्तीप्रदर्शन करत कोविड नियमावलींचं उल्लंघन केलं होतं, याविरोधात कनिष्ठ न्यायालयात मी दाद मागितली होती.
 
त्यावेळी न्यायालयाने ही तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला होता. मात्र पुन्हा सत्र न्यायालयाने ही याचिकाही फेटाळली होती. त्यानंतर राज्य सरकारने कोविड काळात घातलेल्या निर्बंधांसंदर्भातील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा ही तक्रार मागे घेण्यात आली होती.
 
मात्र, मानहानीच्या तक्रारीसंदर्भात आजही मी ठाम आहे. त्याच्या तारखा वेळोवेळी पडतात. मलिकांना न्यायालयात हजर व्हावे लागेलच. माझी लढाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. माध्यमांनाही माझी विनंती आहे की, अशाप्रकारच्या कुठल्याही बातम्यांना थारा देऊ नका जेणेकरुन संभ्रम निर्माण केला जातो," असे मोहित कंबोज यांनी म्हटले आहे.