धर्मसंस्कृतीच्या नावानं चांगभलं!

    19-Aug-2023   
Total Views |
Article On Indian Culture Of Religion

समाजासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. कुणी म्हणेल साप-साप म्हणत भुई थोपटत आहात; पण ‘लव्ह, ड्रग्ज आणि लॅण्ड जिहाद’चा कली आता भस्मासूर होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी समाजाला या सगळ्यांपासून सुरक्षित ठेवायचे असेल, तर संस्कार, संस्कृती आणि धर्मजागृती आवश्यक आहे . यासंदर्भातला उहापोह करणारा हा लेख...

“मला हिंदू धर्मात घ्या. मला धर्मांतरण करायचे आहे. माझे या हिंदू मुलीवर प्रेम आहे, तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. ती हिंदू आहे म्हणून मलाही हिंदू धर्म स्वीकारायचा आहे.” तो मुस्लीम युवक म्हणू लागला. त्यावेळी त्याच्यासोबतची ती हिंदू मुलगी अतिशय आनंदी मुद्रेने त्याला पाहत होती. ’मेरा अब्दुल वैसा नही हैं’ म्हणणे तिने सत्यात उतरवले होते. तिचा मुस्लीम प्रियकर तिच्यासाठी त्याचा धर्मही सोडायला तयार होता. बिलाल इमानदार त्याने नाव धारण केले आणि तो हिंदू म्हणून स्वतःला भुषवू लागला. पण, काही दिवसांतच म्हणजे दि. १२ ऑगस्ट रोजी या उर्फ बिलालला आणि त्याचा भाऊ आयानला पोलिसांनी अटक केली. आज बिलाल तुरुंगात आहे.

मग असे नेमके काय घडले होते? नाशिकहून पुण्यात शिकायला आलेल्या, त्या श्रीमंत घरातील हिंदू मुलीशी त्याने जवळीक साधली. पद्धत नेहमीचीच! समाजमाध्यमांचा उपयोग करून पहिली संदेशांची देवाणघेवाण झाली. गप्पांनंतर मैत्री झाली. या मुलाइतके आपल्याला कुणीही समजू शकत नाही आणि त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही, असा विश्वास या मुलीच्या मनात निर्माण झाला. निर्माण झाला म्हणजे त्याने तो विश्वास निर्माण करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केला. मुलीने घरी कळवले की, ती मुस्लीम मुलाशी लग्न करणार आहे. घरातले पुरोगामी किंवा तथाकथित निधर्मी असावेत, त्यांनी मुलीला संमती दिली. मग मुलगी पालकांना भेटण्यासाठी घरी गेली. मात्र, घरातूनच ती गायब झाली. हवालदिल झालेल्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्थानकात केली.

दि. १२ ऑगस्ट रोजी पुण्यात ती मुलगी बिलालसोबत सापडली. दोघेही अमली पदार्थाच्या नशेत तर्रर्र... पोलिसांनी चौकशी सत्र सुरू केले, तर त्या मुलावर आधीच गुन्हे दाखल होते, तर या हिंदू मुलीशी ओळख वाढवत, प्रेम वगैरेचे पालुपद सुरू करत तिलाही त्याने अमली पदार्थांचे व्यसन लावले. तिच्याकरवी अमली पदार्थ विकले. तसेच, बिलालचा भाऊ आयान यानेही या मुलीच्या मदतीने एका हिंदू मुलीला असेच जाळ्यात ओढले. या मुलीमुळे अनेक हिंदू मुलींशी यांचा संपर्क होऊ लागला. श्रीमंत घरची सुशिक्षित हिंदू मुलगी म्हणून तिच्यावर कुणालाही संशय आलाच नाही. ती मुलगी बिलालसाठी सोन्याची कोंबडीच ठरली. या सगळ्या जाळ्यात मुलगी पूर्ण फसली. तिने घरातल्यांना तिच्या लग्नसाठी राजी केले, पुढची बोलणी करायला घरी गेली. मात्र, अमली पदार्थांच्या व्यसनाने ती कासावीस झाली. पुन्हा सगळे सोडून ती पुण्यात परतली. घरातल्यांना यातले काही माहिती नव्हते. पण, ती परत आली, तिचे घरचे आता लग्नाला विरोध करू शकतात किंवा त्यांना काही संशय येऊ शकतो, असे बिलालला वाटले. तसेच, आधीच्या गुन्ह्यांचा ससेमिराही चुकवायचा होता. त्यामुळे त्याने धर्मांतराचा कट केला. पण, पोलिसांनी त्याचा व्यवस्थित माग काढला. अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री यांसाठी तो आता तुरुंगात आहे.

पुण्याच्या या घटनेने एक विदारक सत्य समोर आले आहे. ते म्हणजे ’लव्ह जिहाद’चे स्वरूप प्रेमाच्या खोट्या जाळयात अडकवून केवळ शारीरिक शोषण करण्यापुरताच मर्यादित नाही. हिंदू मुलींकडून अवैध धंदे करण्यासाठीच त्यांना ’लव्ह जिहाद’चे बळी केले जाते. जमिनी स्तरावर काम करणार्‍या काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तेव्हा त्यांचे म्हणणे आहे की, ”मुंबईत तर अशा घटना सातत्याने घडतात. शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर थांबून प्रकारे मुलींना जाळ्यात ओढले जाते. ११-१२ वर्षांच्या मुलीही व्यसनाधीन होऊन देहविक्रीच्या दलदलीत फसल्या आहेत. मुलींचे अपहरण करून तिला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यापेक्षा तिला व्यसनाधीन बनवून तिला कुकृत्य करायला भाग पाडले जात आहे.” वास्तव खूप भीषण आहे. ’लव्ह जिहाद’ आणि ’ड्रग्ज जिहाद’ म्हणजे एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत, नव्हे ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या मुलींचा मागोवा घेतला, तर प्रकर्षाने जाणवते की, त्यांना अमली पदार्थांचे व्यसन लावले गेले होते. कारण, व्यसनाधीन व्यक्ती मग मुलगा असो की, मुलगी व्यसनपूर्तीसाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. त्यामुळे समाजविघातक लोक ’लव्ह जिहाद’चा मार्ग मोकळा करण्यासाठी ’ड्रग्ज जिहाद’चा वापर करत आहेत. तसेच, ’ड्रग्ज जिहाद’ सफल व्हावा म्हणून याच हिंदू मुलींचाही बळी देत आहेत.

‘लव्ह आणि ड्रग्ज जिहाद’ला परिपूर्ण करणारा नव्हे, त्यातलाच एक उद्देश म्हणजे ”लॅण्ड जिहाद.’ चांगले घरदार असलेल्या हिंदू मुलींना जाळ्यात ओढले की, तिच्या आईबाबांची संपत्ती आपोआप आपल्याला मिळेल, असा कट रचणारेही आहेत. याचे उत्तम उदाहरण द्यायचे, तर मालाड-मालवणी परिसराचे द्यायला हवे. मालवणी गेट क्र. सात भागात काही दशकांपूर्वी हिंदूबहुल वस्ती होती. जैन- मारवाडी समाजाची वस्तीही लक्षणीय. सगळेच सुस्थापित. या परिसरात दोन दशकांपूर्वी मारवाडी समाजाच्या मुलीला फूस लावली गेली. ती पळून गेली की, तिचे अपहरण झाले काही माहिती नाही. मात्र, अघटित घडले. समाजात इज्जत गेली, या विचाराने लज्जित होत, भयभीत होत तिचे आईबाप, कुटुंब नेसत्या वस्त्रांनिशी मालवणीतले घर सोडून गेले. त्यानंतर त्या घरात काही समाजकंटक दरवाजा तोडून घुसले. अगतिकतेने घर सोडलेल्या त्या कुटुंबाचे सामान या लुटारूंनी विकले. पुढे त्यांनी त्या घरात भाडोत्री घुसवले. त्याच घरावर मजल्यावर मजले चढले.

मात्र, हे सगळे पाहून परिसरातले हिंदू समाजातील लोक तिथून पलायन करू लागले. मुलगी पळाली की, पळवून नेलेल्या त्या अगतिक कुटुंबाला घर सोडावे लागले. त्यांनी घर सोडले. तशी पाळी आपल्यावरही येऊ शकते. घर सोडण्यापेक्षा आपणच ही वस्ती सोडून जाऊ, असे काही दशकांपूर्वी इथल्या हिंदूंना वाटले. दोन दशकांपूर्वीचे हे पलायनसत्र. आता सध्या हिंदुत्ववादी सरकार असल्यामुळे आणि उपनगराचे पालकमंत्री मालवणीतल्या हिंदूंचे कैवार घेणारे मंगलप्रभात लोढा असल्याने, इथे त्यातल्या त्यात शांती आहे. पण, हे सांगण्याचा मुद्दा काय तर? प्रेमाच्या जाळ्यात फसलेल्या मुलीच्या पालकांची हतबलता पाहून त्यावेळी इतर पालकांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि इज्जतीसाठी तिथून पलायन केले होते. आज काय झाले, त्या परिसरात हाताच्या बोटावर हिंदू कुटुंब आहेत. कुठे गेले ते लोक? आणि काय झाले त्यांच्या इथल्या घरांचे? या सगळ्यांचा मागोवा घेतला, तर ’लव्ह आणि लॅण्ड जिहाद’चा संबंध तत्काळ लक्षात येतो.

’लॅण्ड जिहाद’ यथासांग संपूर्ण व्हावा, यासाठी ’ड्रग्ज जिहाद’चा आधारही समाजकंटक घेतात. मुंबई परिसरातील घटना तर डोळ्यात अंजन घालण्यासारखी. त्या परिसरात त्या व्यक्तीचे टोलेजंग घर. पण, काही कारणास्तव आर्थिक परिस्थिती बिकट झाली. त्या हिंदू गृहस्थाला दोन मुली. दहा वर्षांपूर्वी मोठी मुलगी १५ वर्षांची असताना ती गारमेंटमध्ये कामाला जाऊ लागली. गारमेंटच्या मास्टरचे आधीच एका हिंदू महिलेशी लग्न झालेले. मुलाच्या वाढदिवसाला त्याने त्या मुलीला घरी बोलावले. मुलीने नकार देताच, त्याने त्याच्या हिंदू पत्नीकरवी तिला घरी बोलावले. तिने त्या मुलीला सांगितले, ‘मी पण हिंदूच आहे. ये ना घरी.’ मुलगी वाढदिवसाला गेली. त्या रात्री उशीर झाला. म्हणून मास्टर मुलीला घरी सोडायला गेला. मात्र, वाटेतच तिच्याशी दुष्कृत्य केले. तिला धमकावले, ‘आजपासून मी तुझा शोहर. कुठे वाच्यता केलीस, तर सगळ्यांना जे घडले ते सांगेन.’ त्यानंतर सातत्याने त्याने तिचे शोषण केले. नंतर एक दिवस त्याने तिला म्हटले, “तुझी छोटी बहीण मोठी झाली ना? तिला पण आण, नाही तर सगळे तुझ्या घरी सांगेन.” या मुलीने छोट्या बहिणीलाही या नालायकाकडे आणले. तो दोघींचे शोषण करू लागला. ब्लॅकमेल करू लागला. हे सगळे करताना त्याने मुलींच्या पालकांशी चांगले संबंध ठेवले.

त्यांना म्हणाला की, ‘’इतके मोठे घर आहे. घरात तुम्ही दोघे वयस्कर आईबाप आणि या दोन मुलीच. तुमच्या मदतीला मी माझ्या नात्यातला एक चांगला मुलगा देतो. त्याला भाडेकरू म्हणून ठेवा. तो पैसे देईल आणि तुम्हाला मदतही करेल.” आईबाबांनी संमती दिली. भाडेकरू मुलगा दोन्ही मुलींचा ‘भाईजान’ झाला. छोट्या बहिणीवर तो विशेष ममत्व दाखवू लागला. ‘तू माझी लाडकी बहीण आहेस, तुझ्यासाठी काहीही करेन,’ असा विश्वास तिला दिला. आपला भाऊच आहे, असे मानून छोट्या बहिणीने त्याला तिचे आणि तिच्या मोठ्या बहिणीचे मास्टर शोषण करतो, हे सांगितले. खरे तर या मुलाला हे सगळे आधीच माहिती होते. कारण, या दोन्ही मुली दुसर्‍या कोणत्या मुलांच्या संपर्कात जात, तर नाहीत ना? हे पाहण्यासाठी त्या मास्टरने या मुलाला तिथे ठेवले होते. छोट्या बहिणीने या मुलाला मास्टर आणि त्याच्या कुकृत्यांबद्दल सांगितल्यानंतर या मुलाने काय करावे? तर या भाडेकरू मुलाने त्या छोट्या बहिणीलाच धमकावले की, “तुला माझ्याशी संबंध ठेवावे लागतील नाही, तर तू काय सांगितलेस, मी तुझ्या आईबाबांना आणि मास्टरला सांगेन.” त्यानंतर तोही या छोट्या बहिणीवर अत्याचार करू लागला. याच दरम्यान घरातली मोठी मुलगी बेपत्ता झाली. ती त्या विवाहित मास्टरसोबत पळून गेली. मुलगी बेपत्ता झाली म्हणून पालकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर कळले की, मास्टरने दहा वर्षांपूर्वी पाहिले की, सदर पालकांना दोनच मुली आहेत, घर मोठे आहे. मोठे घर मिळवण्यासाठी दोन्ही मुलींशी निकाह करून पद्धतशीरपणे या घरचा जावई व्हायचा, त्याचा बेत होता.

पण, या दोन मुली त्याच्याशी लग्न सहज करणार नव्हत्या. म्हणून त्यांचे शोषण केले. मुलींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याने त्याच्या ओळखीच्या मुलाला भाडोत्री म्हणून ठेवले. पण, त्या मुलाची नियत फिरली. त्याने छोट्या बहिणीला जाळ्यात ओढेल मुलीशी लग्न केल्यावर एवढे मोठे घर मिळेल, असे त्यालाही वाटले. दहा वर्षांपासूनचे घर बळकावण्यासाठीचे असे पद्धतशीर नियोजन. काय म्हणावे? देशातील बहुसंख्य भागात टोमॅटोचे भाव वाढले, आज काय कांदाच महाग झाला, यासाठी रडण्यात मग्न आहे. दुसरीकडे काही समाजकंटक अशा प्रकारे समाजाचा विध्वंस करण्यात मग्न आहेत. बरं हे सगळे इतके शांतिपूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने केले जाते की, शंकेला वावच उरणार नाही. करूणा, दया, विश्वास वगैरेचा भरपूर दिखावा करत हे समाजकंटक हिंदू मुलामुलींना शिकार करतात. आपल्या घरातले आणि आपल्याला समजावणारे सगळेच वाईट आहेत, इतपत या मुलामुलींची बुद्धी भ्रमित केली जाते. खूप जणांचे म्हणणे आहे की, हे कसे शक्य होते? तर ज्यांची मुलंमुली किंवा घरचे आणि जवळचे कुणी, अशा प्रकारे भ्रमित झालेले आहेत, तेच हे दुःख जाणू शकतात आणि याची गंभीरताही समजू शकतात. ते तर दुर्देवाच्या फेर्‍यात अडकले आहेत. पण, उद्याही वेळ कुणावरही येऊ शकते. कदाचित ते जात्यात आहेत आणि आपण सुपात. सर्वनाश होण्याआधी डोळे उघडायलाच हवेत.

पण, दोष काय त्या समाजकंटकांचाच आहे का? आधुनिकता पुरोगामित्वाच्या नावावर आज कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर आहेत. आम्ही खूप साधेभोळे आहोत, मानवतावादी आहोत, हे दाखवण्याच्या नादात समाजात बहुसंख्य लोक मूर्ख आणि अज्ञानी होत चालले आहेत. आपला काळ वेगळा होता, आता काळ बदलला आहे, असे म्हणत पालक आपल्या मुलांना स्वैराचार करण्याची मुभा देतानाचेही दृश्य सामान्य होत चालले आहे. ‘पुरूष व्यसन करतात, मग महिलांनी व्यसन केले, तर काय झाले’ म्हणत, स्त्री-पुरूष समानतेच्या असल्या खोट्या वायफळ मुद्द्यावर व्यसन करण्यात धन्यता मानणार्‍यांची संख्या वाढत आहे.

खरंच समानता आणि आधुनिकतेची व्याख्या हीच आहे का? हेच व्यक्तिस्वातंत्र्याचे परिमाण आहेत का? दुर्देवाने समाजात असेच चित्र दिसत आहे. फसवणारे, शोषण करणारे संघटित आहेत. कायदा आणि त्याच्या पळवाटांचा त्यांना चांगलाच अभ्यास आहे. काय केल्याने काय होते, यावर तार्किक विचार करण्याची त्यांची नियोजित कार्यपद्धती आहे. या सगळ्याच्या समोर आपण कसे टिकू? की हातपाय गाळून होऊन जाऊ दे काय व्हायचे ते. ‘नशिबात असेल तेच होणार,’ असे म्हणत निमूटपणे फसवणूक आणि अत्याचार सहन करायचा? नाही, ज्या शक्तीने ज्या गुरुत्वाने शेकडो वर्षांच्या गुलामी आणि हिंसात्मक दडपशाहीतही हिंदू म्हणून जगण्याची आपल्याला हिंमत दिली. आता वेळ आली आहे, आपल्यातली ती ईश्वरी शक्ती जागवण्याची. ते गुरुत्व समजून घेण्याची. ईश्वर आणि गुरुत्व समजून घेताना अगदी कट्टरपंथी धार्मिक असणे गरजेचे नाही. मात्र, आपला धर्म काय सांगतो, आपले दैवत आणि परंपरा काय आहेत, इतके तरी ज्ञान प्रत्येकाला असायलाच हवे. कारण, हेच देवधर्म माणसाला कुटुंबाशी आणि समाजाशी, संस्कृती आणि संस्काराशी जोडून ठेवतात.

या आयामात जगभरातील मुस्लीम आणि ख्रिस्ती लोकांचा मागोवा घेतला तर जाणवते की, ते त्यांच्या धर्माला अभिप्रेत असलेल्या संस्कारानेच जीवन जगतात. त्यांच्यात रुजवलेल्या धर्म भूमिकेप्रमाणेच ते आजन्म वर्तन करतात. संस्कार आणि तो धर्म शिकण्यासाठी, जपण्यासाठी त्या धर्मसंस्कृतीतले पालक जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. ख्रिस्ती लोक बायबल आणि मुस्लीम लोक कुराण यासंदर्भात त्यांच्या मुलाबाळांना लहानपणापासून जागृत करतात. या परिक्षेपात आपण हिंदू कसे वागतो? हिंदू पालक आपल्या मुलांना काय धर्म संस्कार देतात? याबद्दल थोडा जरी विचार प्रत्येकाने केला, तरी परिस्थिती पालटू शकते. खरे तर ’लव्ह जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’ आणि ’ड्रग्ज जिहाद’ या सगळ्यांना पुरून उरण्यासाठी धर्मसंस्कृतीचाच आधार आहे. ‘धर्मो रक्षति रक्षितः’ धर्मसंस्कृतीच्या नावानं चांगभलं!

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.