लैंगिक शिक्षणाचा संवेदनशील विषय खेळीमेळीने हाताळणारा ‘ओएमजी २’

    18-Aug-2023
Total Views |
  
omg 2 movie
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
आपण कितीही पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत असलो तरीही लैंगिक विषयांवर आधाऱित कोणत्याही बाबी उघडपणे आपल्या पालकांसोबत बोलण्याचे धाडस मुलांचे होत नाही. कदाचित हाच संवाद पालक आणि मुलांमध्ये किंवा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये होत नसल्याकारणाने लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार किंवा किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिकतेसंबंधी चुकीचे समज घर करु लागतात. समाजामध्ये आजही उघडपणे जो विषय बोलला जात नाही किंवा ज्याबद्दल कुणाशीच थेट संवाद साधला जात नाही अशा लैंगिक शिक्षणावर ‘ओएमजी २’ या चित्रपटात फार उत्कृष्टरित्या मांडले आहे. अमित राय दिग्दर्शित ‘ओएमजी २’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतम यांनी उत्तमरित्या या संवेदनशील विषयाला आपल्या अभिनयाच्या अंगाने गवसणी घालत पालकांना आणि शिक्षकांना लैगिक शिक्षणाबद्दल सद्यस्थितीला लहान मुला-मुलींना उचित माहिती देणे गरजेचे आहे याबद्दल भाष्य केले आहे.
 
अर्थात ‘ओएमजी २’ चित्रपटाचे कथानक सगळ्यांना माहितच आहे. पण त्यापलिकडे या चित्रपटाच्या दोन बाजू आहेत. त्यातील पहिली बाजू म्हणजे पालक आणि पाल्य यांच्यात नष्ट होत चाललेला संवाद. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की आपले पहिले गुरु हे आपले आई-वडिल असतात. पण ज्यावेळी त्याच गुरुंना त्यांचा पाल्य एखादी अडचण किंवा त्यांना विचारात पाडणारा प्रश्न विचारतो त्यावेळी बऱ्याचदा त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे पालक टाळतात. उदाहरणार्थ, लैंगिकतेबद्दल लहान मुलांना फार चुकीच्या पद्धतीची माहिती ही विविध माध्यमांतून मिळते. सध्याचा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा असल्यामुळे कोणतीही गोष्ट इंटरनेटवर सहजपणे मिळून जाते. करोना काळापासून शिक्षण शिकवण्याची पद्धत ऑफलाईन वरुन ऑनलाईन झाली. त्यामुळे २४ तास शाळकरी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन आले. पालकांनाही आपलं मुल मोबाईलवरुन काहीतरी शिकत आहे असंच वाटलं, पण त्यांनी नेमकी तो इंटरनेवर कोणत्या विषयाचे शिक्षण घेत आहे हे कधीच डोकावून पाहिले नाही. आणि हाच धागा ‘ओएमजी २’ चित्रपटाने पकडत आपल्या मुलांचे मित्र होत त्यांच्याशी कसा संवाद साधला पाहिजे हे दाखवले.
 
चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलायचं झालं तर, ही कथा घडते महाकालनगरीत. शिवभक्त कांती शरण मुद्गल (पंकज त्रिपाठी) आपल्या कुटुंबासह सुखासमाधानाचे जीवन जगत असतो. शंकराच्या मंदिराबाहेर त्याचे पूजा साहित्याचे दुकान असते. सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक त्याच्या आयुष्यात वादळ येते. त्याचा मुलगा विवेक (आरुष वर्मा) शाळेतील त्याच्या मित्रांच्या लैंगिक विषयावरील टोमण्यांना कंटाळून चुकीच्या मार्गाचा अवलंब करतो आणि अपुऱ्या लैंगिक शिक्षणामुळे तो शाळेतच गैरप्रकार करुन बसतो. आणि त्यानंतर शाळा त्याच्यावर कठोर कारवाई करते, त्याचा फटका विवेकला इतका बसतो की तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. परिस्थितीने खचलेला कांती महादेवाची आराधना करतो, तेव्हा महादेवाचा दूत (अक्षय कुमार) त्याला मार्ग दाखवण्यासाठी प्रगट होतो, असे कथानक आहे. यानंतर सुरु होते एका बापाची खरी लढाई. आपला मुलगा समाजात पुन्हा एकदा तर सन्मानाने मान वर करुन जगला पाहिजे यासाठी कांती न्यायालयाचे दार ठोठावतो आणि स्वत:सह शाळा, मेडिकल, डॉक्टर आणि एक तेल विकणारा इसम यांच्यावर मांनहानीचा खटला चालवतो. असे एकूणच या चित्रपटाचे कथानक आहे.
 
प्रत्येक बाबीचे शिक्षण किती गरजेच आहे हे या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ओएमजी’ या २०१२ साली आलेल्या चित्रपटाचे कथानक पार निराळे होते. त्या चित्रपटातही देव-देवतांचा उल्लेख होता, मात्र, चित्रपटाचे प्रमुख पात्र अर्थात अभिनेते परेश रावल हे नास्तिक होते आणि त्यामुळे या चित्रपटाने देवांचा अपमान केल्याचे बोल चित्रपटाला लागले. परंतु ‘ओएमजी २’ या चित्रपटात पंकज त्रिपाठी हे आस्तिक असून त्यांनी आपल्या मुलाला लैंगिक शिक्षण म्हणजे काय आणि समाजाला हा विषय शिक्षणात्या अनुषंगाने किती महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी पुराणातील ग्रंथ ते आधुनिक साहित्य यांचा आधार घेत कुठेही धर्माचा अनादर होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली.
 
चित्रपटाची दुसरी महत्वाची बाजू म्हणजे, या चित्रपटाचे कथानक ज्या विषयावर आधारित आहे आणि ज्यांच्यामुळे ही गोष्ट घडते त्यांनाच हा चित्रपट न दाखवणे जरा खटकतेच. कारण, २१ व्या शतकातील किशोरवयीन, शाळकरी मुला-मुलींना लैंगिक शिक्षणाचे महत्व फार गरजेचे आहे. त्याचे कारण असे की, समवयीन मुलांकडून जे शिकतो किंवा जी माहिती प्राप्त होते ती योग्य की अयोग्य याची खात्री करुन घेण्यासाठी नक्कीच आपल्याला गुरुची गरज असते. तसेच, प्रत्येक विद्यार्थांच्या जीवनात शाळा आणि शिक्षक किती महत्वाची भूमिका बजावतात हे देखील या चित्रपटातून योग्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे जर का शाळकरी मुलांनी हा चित्रपट पाहिला तर जर का त्यांच्या हातून या चुका घडत असतील तर त्या सुधारण्यास नक्कीच मदत होईल आणि मुलं उघडपणे लैंगिक शिक्षणाबद्दल किंवा त्या विषयासंबंधित असणाऱ्या अडचणींबद्दल पालक, शिक्षकांशी बोलतील.
 
दरम्यान, ‘ओएमजी’ चित्रपटाचा आणि परेश रावल यांचा वेगळा चाहता वर्ग असल्यामुळे ‘ओएमजी २’ या चित्रपटात पंकज त्रिपाठी योग्य वाटतील का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, चित्रपटाच्या कथानकासाठी पंकज त्रिपाठी योग्य कसे आहेत हे त्यांनी त्यांच्या सढळ अभिनयातून सिद्ध केले आहे. संपुर्ण चित्रपट हा कधी हसवतो तरी कधी पटकन विचारांना चालना देतो. पण चित्रपटाचे खरे कथानक तर मध्यांतरानंतरच सुरु होते. तसेच, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला २७ कट करण्यास सांगितले होते त्यामुळे अनेक ठिकाणी चित्रपट पाहताना विषयाचे सातत्य कुठेतरी तुटल्यासारखे वाटते. मात्र, लैंगिक शिक्षणाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यास दिग्दर्शकांना तसे पाहायला गेले तर यश आले आहे असेच दिसून येते.
 
चित्रपट – ओएमजी २
कलाकार - अक्षय कुमार,पंकज त्रिपाठी,यामी गौतम,पवन मल्होत्रा,बृजेंद्र काला,अरुण गोविल,गोविंद नामदेव
दिग्दर्शक: अमित राय