ठाणे : छायाचित्रण ही दुर्मिळ कला टिकवणे ही काळाची गरज आहे. या कलेकडे व्यावसायिक दृष्टीकोन ठेवुन पाहिल्यास विद्यार्थीवर्गालाही त्याचा नक्कीच फायदा होईल.असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, छायाचित्र स्पर्धेचा निकालही जाहिर करण्यात आला.
ठाणे शहरात राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन यांचे आयोजन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या स्पर्धेत देशभरातून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरुन एकूण ३१९६ प्रवेशिका आल्या. त्यातून सुमारे १४००० छायाचित्रे स्पर्धेत सहभागी झाली. यातील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन तीनहात नाका येथील स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे १८ ते २० ऑगस्ट या कालावधीत भरवण्यात आले आहे.
मंत्री चव्हाण पुढे बोलताना, छायाचित्रण ही दूर्मिळ कला टिकवणे काळाची गरज आहे. पण, छायाचित्रणाचा व्यावसायिक दृष्टया विचार फार कमीजण करतात.तेव्हा, विद्यार्थ्यांनाही छायाचित्रणाचे आकर्षण निर्माण झाल्यास याचा व्यावसायिक दृष्ट्या फायदा होईल.असे सांगितले. तसेच, कॅमेर्यामध्ये तंत्रामध्ये मोठे बदल झाले असले तरी, २० वर्षापूर्वी भाजपमधुन राजकीय जीवनाची सुरुवात करताना त्यावेळेस एका छायाचित्रकाराने काढलेला माझा 'तो' फोटो अद्यापपर्यत वापरत असल्याचे आवर्जुन नमूद केले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते पार पडले.याप्रसंगी,कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड.निरंजन डावखरे,भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, डॉ.राजेश मढवी, कोकण पदवीधर संयोजक सचिन मोरे, वृषाली वाघुले - भोसले, माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते.यावेळी ना. चव्हाण यांनी केबीपी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यासमवेत प्रदर्शनाचा आनंद लुटला. दरम्यान, दुपारी ठाण्याचे आ.संजय केळकर यांनी प्रदर्शनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सोबत ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे होते.