कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या कृषी व महसूल विभागास सूचना
18-Aug-2023
Total Views |
मुंबई : राज्यात सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षी सरासरीच्या १२२.८ टक्के पाऊस झाला होता. पुढील काही दिवसात हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याअनुषंगाने कृषी तसेच महसूल व संबंधित विभागांनी नियोजन करावे तसेच चारा, वैरण, पिण्याचे पाणी या अनुषंगाने योग्य ते नियोजन तयार ठेवावे, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कृषी विभागाने बैठकीत माहिती दिल्याप्रमाणे राज्यात १३९.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९१ टक्के पेरणी झाली आहे. १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेले ६ जिल्हे असून, ७५ ते १०० टक्के पाऊस झालेले १३ जिल्हे आणि ५० ते ७५ टक्के पाऊस झालेले १५ जिल्हे आहेत. राज्यात २५ ते ५० टक्के पाऊस झालेले १३ तालुके आहेत.
सध्या राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात ६१.९० टक्के पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ८०.९० टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या ७०.४७ टक्के, अमरावती ६६.५७ टक्के, औरंगाबाद ३१.६५ टक्के, नाशिक ५७.१६ टक्के, पुणे ६८.२३ टक्के आणि कोकण ८७.२५ टक्के अशी पाणी साठ्याची स्थिती आहे. तसेच, सध्या राज्यात ३२९ गावे आणि १२७३ वाड्यांमधून ३५१ टँकर्स सुरु आहेत.