संघर्षाचे आसमंत जिंकणारे हेमंत

    18-Aug-2023   
Total Views |
Article On Hemant Tukaram Apsunde
 
इयत्ता पाचवीत असताना मृत्यूवर मात करणार्‍या आणि शासकीय यंत्रणेत उच्चपदावर कार्यरत असूनही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या हेमंत तुकाराम अपसुंदे यांच्याविषयी...

नाशिकमध्ये जन्मलेले हेमंत तुकाराम अपसुंदे यांचे बालपण अनेक संघर्षांनी भरलेले होते. सेंट फिलोमिनाज् हायस्कूलमध्ये त्यांचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस’मध्ये वडील नोकरीला असले, तरीही त्यावेळी पगार अगदी नाममात्र होता. त्यावेळी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शुल्क भरमसाठ होते, जे सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. वडील इयत्ता नववी उत्तीर्ण, तर आई अशिक्षित होती. वडिलांना इंग्रजी बोलता येत नसल्याने आपला मुलगा तरी इंग्रजी शिकेल, यासाठी त्यांनी हेमंत यांना इंग्रजी माध्यमातून शिकविण्याचा निर्णय घेतला. ओव्हरटाईम, सुट्टी न घेता वडिलांनी हेमंत यांना शिकवले. मराठीची पार्श्वभूमी असल्याने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण हेमंत यांना अवघड गेले. भाड्याच्या घरातून अपसुंदे कुटुंब नंतर प्रेसच्या क्वार्टर्समध्ये राहण्यास गेले.

बाजूला असलेल्या स्मशानभूमीतच हेमंत मित्रांसोबत खेळत असे. पुढे इयत्ता पाचवीत तर आजारी पडल्याने त्यांना सहा महिने रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. अगदी मरणाच्या दारातून ते परत आले. एकप्रकारे हा त्यांचा पुनर्जन्मच होता. इयत्ता पाचवीत ते अनुत्तीर्ण झाले. मात्र, तरीही जिद्द न सोडता शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रयत्नांमुळे ते उत्तम गुणांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले. सुनील भाटिया यांनी त्यांना विशेष मार्गदर्शन केले. शाळेच्या क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, अ‍ॅथलेटिक्सच्या संघातही त्यांचा सहभाग होता. पुढे बिटको महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला. मार्गदर्शनाअभावी इयत्ता बारावी ते जेमतेम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढे इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे त्यांना मॅकेनिकल डिप्लोमासाठी प्रवेश मिळाला.

राहण्या-खाण्यासह अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. पुढे नोकरीच्या शोधात त्यांनी मार्केटिंगची नोकरी केली. पुढे ‘वासन अ‍ॅण्ड सन्स्’, अंबड येथे टुल रूमध्ये त्यांनी दीड वर्षं आणि त्यानंतर सिन्नर येथील जिंदल कंपनीत पाच ते सहा वर्षं नोकरी केली. ‘एल अ‍ॅण्ड टी’मध्ये एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर निवड मंडळाची परीक्षा दिल्यानंतर ते २००० साली सेवा अभियंता म्हणून आरोग्य विभागात रूजू झाले. सरकारी नोकरी मिळाल्याने साहजिकच कुटुंबीयदेखील आनंदी होते. हेमंत यांना सुरुवातीला नाशिकऐवजी यवतमाळ जिल्ह्यात पोस्टिंग मिळाली. तिथे तीन वर्षे काम केल्यानंतर ठाण्यात एक वर्ष, नाशिकमध्ये सात वर्षं, जळगावला पाच वर्षं काम केले. त्यानंतर २०१५ साली त्यांची नाशिकला बदली झाली आणि त्याचबरोबर सेवा व्यवस्थापकपदी (वर्ग-२) बढती मिळाली. उपकरणे तथा मुख्यतः आरोग्य विभागातील वाहने, रूग्णवाहिका यांची दुरुस्ती आणि व्यवस्थापन बघण्याचे काम याअंतर्गत येते. पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बदली झाली.

परंतु, नाशिक जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडेच देण्यात आला. दरम्यान, शासकीय यंत्रणेत काम करत असताना स्वतःला वेळ देता येत नव्हता. वजन वाढले होते. अशावेळी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचे त्यांनी ठरवले. त्यांच्याच कॉलनीत राहणारे जयशंकर अय्यर सायकलिंग करायचे. ते पाहून हेमंत यांनीही त्यांच्यासोबत सायकलिंग करण्यास सुरुवात केली. २०१६ त्यांनी ‘स्कॉट कंपनी’ची ‘हायब्रिड’ सायकल विकत घेतली. शेगाव, पंढरपूर, मुंबई अशा अनेक सायकल रॅली त्यांनी पूर्ण केल्या. जवळपास दहा ‘बीआरएम’ स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या. सायकलिंगसाठी पाय मजबूत असणे गरजेचे असते. त्यासाठी त्यांनी धावण्याचा सराव सुरू केला. सुरुवातीला नाशिकरोड मॅरेथॉनसाठी हेमंत यांनी सर्व मित्रांचे प्रवेश शुल्क स्वतः भरले आणि सर्वांनी त्यात सहभागही घेतला. आतापर्यंत त्यांनी २० हून अधिक हाफ मॅरेथॉन, तर चारहून अधिक फूल मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. ‘टाटा अल्ट्रा लोणावळा स्पर्धा’ त्यांनी तीनवेळा पूर्ण केली. २०२२ साली दक्षिण ऑफ्रिकेतील जगप्रसिद्ध ‘कॉमरेड्स स्पर्धा’ही पूर्ण करत भारताची मान परदेशात अभिमानाने उंचावली. जैसलमेर ते लुंगीवाला पॉईंटपर्यंतची १०० किमी स्पर्धाही त्यांनी पूर्ण केली.

हेमंत यांना सुनील भाटीया, शेखर बोरगावकर, पवार सर, वाय. एस. राव, विलास वाकचौरे, अनिल पाटील, जगदीश पवार, चेतन अग्निहोत्री, जसपालसिंग विर्दी, मिलिंद धोपावकर, उमेश बूब, दिगंबर लांडे, पंकज भदाणे यांचे सहकार्य लाभले. हेमंत त्यांच्या दर वाढदिवसाला जिल्हा रूग्णालयात रक्तदान करत असतात. खासगी रक्तपेढ्यांबरोबरच जिल्हा रूग्णालयात जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्याचे आवाहन ते करतात. कारण, जिल्हा रूग्णालयात रक्ताची गरज सर्वाधिक असते.
 
“क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती; परंतु ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे ती इच्छा सायकलिंग आणि धावण्यातून पूर्ण होते, ज्यातून मला आनंद आणि समाधान मिळते. व्यायाम, सायकलिंग आणि धावण्याचे व्यसन लागले असल्याचे लोक मला म्हणतात. मनात जिद्द आणि ध्यास असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही,” असे हेमंत सांगतात. अनंत अडचणींवर मात करत यशाची यशोशिखरे पार करणार्‍या हेमंत तुकाराम अपसुंदे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा...
 
७०५८५८९७६७

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.