टोमॅटोपासून चांदी!

    17-Aug-2023   
Total Views |
Rahul Gandhi meets vegetable vendor from viral video

नुकतेच राहुल गांधी आणि भाजी विक्रेता रामेश्वर एकत्र जेवले. या सगळ्या मागचे सत्य आणि तथ्य काय आहे? निस्सीम बंधुभाव, निर्मळ आपलेपणा वगैरे भाव या भेटीत होता का? ही घटना कशी घडली? राहुल गांधी सामान्य लोकांना भेटायला आले. समोर दिसलेल्या भाजी विक्रेत्यांवर भारतीय बंधुत्वाच्या भावनेने विश्वास बसला. त्यातूनच मग भाजी विक्रेत्याने घरून आणलेली भाकरी राहुल यांनी ग्रहण केली. अशी घटना घडली का? तर नक्कीच नाही. राहुल गांधीसारख्या नेत्याने जर एखाद्या अनोळखी त्यातही भाजी विक्रेत्यांसोबत जेवायचे, तर सोडाच, थांबून दोन मिनिटे बोलायचे जरी असेल, तर त्यासाठी किती यंत्रणा कामाला लागली असेल. सगळीच कृत्रिमता! या भाजी विक्रेत्यांसोबत म्हणे राहुल यांनी गप्पा मारल्या. काय संवाद साधला? गरिबी असतानाही रामेश्वर देश आणि समाजाच्या विरोधात न जाता सज्जन भारतीय नागरिक म्हणून जगतात, याचे श्रेय कुणाला? ते त्यांच्या कुटुंब आणि मुलाबाळांबद्दल काय स्वप्न पाहतात? किंवा रामेश्वर सामान्य कष्टकरी जनतेचे प्रतिनिधित्व करतात. मग सामान्य जनता म्हणून त्याचे प्रश्न आणि त्यावर काय उपाययोजना आहेत, असे त्यांना वाटते? किंवा रामेश्वर यांची आयुष्यात पूर्ण न झालेली इच्छा काय आहे? असे विचारून त्यांची इच्छा थोडी तरी पूर्ण करण्याची दानत राहुल यांनी दाखवली का? (राहुल आर्थिकदृष्ट्या आणि अधिकारांच्या दृष्ट्या तेवढे सक्षम नक्कीच आहेत.) पण, हाय रे देवा राहुल यांनी रामेश्वर यांच्याबरोबर चर्चा काय केली, तर टोमॅटोचे भाव वाढले. त्यामुळे खूप समस्या निर्माण झाल्या. यावर काही लोक म्हणत आहेत की, भारतीयांच्या स्वयंपाकामध्ये टोमॅटो मुख्य अन्न आहे का? शेतमालाच्या किमतींबद्दल चर्चा करताना मागे शेतमालाला हमीभाव मिळवून देणार्‍या कृषी कायद्याला आपणच विरोध केला, हे राहुल यांना आठवले का? तर काही लोकांना वाटते की, राहुल यांनी या भेटीत रामेश्वर आणि जनतेवर अन्याय केला. कारण, बटाट्यापासून सोनं बनवण्याची युक्ती त्यांना माहिती आहे, तर मग तर टोमॅटोपासून चांदी बनवण्याचा महान शोध ते लावूच शकतात. अजनूही वेळ गेलेली नाही, बटाट्यापासून सोन्यासोबतच टोमॅटोपासून चांदीचा शोध त्यांनी जाहीर करावा.


मुँह मे राम बगल मे छुरी...


नरेंद्र मोदींनी काश्मीरमधील ‘कलम ३७०’ हटवले आणि काश्मीरच्या सौभाग्याचा आलेख पुन्हा रेखाटला. काश्मीरमधील फुटीरतावादाला चांगला आळा बसला. दुसरीकडे भारतमातेशी असलेले काश्मीरचे जन्मापासूनचे नाते आणखीन दृढ झाले. हे सगळे झाल्यामुळे काश्मीरला सापासारखे वेटोळे घालून बसलेल्या काही नेत्यांना प्रचंड त्रास होत आहे. कारण, काश्मिरी जनतेसमोर त्यांचे पितळ उघड पडले. या नेत्यांनी भारत आणि उर्वरित भारतीयांबद्दल काश्मीरमध्ये, जी गरळ ओकले होते, जे विष पेरले होेते, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे काश्मीरवर असलेली त्यांची एकहाती सत्ता खंडित झाली. हे सगळे घडले एका ‘३७० कलम’ हटवल्यामुळेच!यातूनच मग आता पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) नेता मेहबुबा मुफ्तींसारख्या व्यक्तीलाही आता प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण आठवायला लागले. यापूर्वी हिंदू किंवा त्यांच्या श्रद्धा याबद्दल काही बोलणे, तर सोडाच, त्याकडे दुर्लक्षित करण्याचीच मेहबुबा यांची वृत्ती नेहेमी दिसायची. आज अचानक मेहबुबा यांना प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण आठवले. हा मोठा विनोदच म्हणायला हवा. इच्छा पूर्ण होण्यासाठी कट्टर मेहबुबांना प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णांच्या नामाला शरण जावे लागले. कलयुगातही अशा घटना घडत असतातच म्हणा.‘कलम ३७०’ पुन्हा एकदा लागू का करावे, याबद्दल बोलताना मेहबुबा म्हणाल्या की, “ ‘रघुकुल रित सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए’ म्हणून ’कलम ३७०’ पुन्हा लागू केले पाहिजे. तसेच, “सर्वोच्च न्यायालय भगवान कृष्णासारखे जम्मू-काश्मीरला वाचवेल,” असे त्या म्हणाल्या. इतकेच काय? लोकशाही राज्यामध्ये बहुसंख्याकांच्याच इच्छेनुसार निर्णय होऊ नये, अशीही उपरती मेहबुबांना झाली.“सीरियामध्ये लोक अल्ला हू अकबर बोलून हल्ले करतात, तर भारतात जय श्रीराम बोलून हल्ले करतात,” असेही मेहबुबा यांचे म्हणणे. मात्र, इतके सगळे बोलताना ‘रलिव, गलिव, चलिव’ म्हणत मुस्लीमबहुल काश्मीरमध्ये हिंदू पंडितांचे काय झाले? याबद्दल त्यांचा स्मृतिभ्रंश झाला. नूह हरियाणा हिंसेबद्दल तर तोंडाला चिकटपट्टीच! खरे तर मेहबुबासारखे लोक म्हणजे ‘मुँह मे राम बगल मे छुरीच!’




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.