फैजाननं सफेद कपड्यात गुंडाळून ठेवला होता पिंजरा! १२५ पोपटांचा गेला जीव

पोलीसांत गुन्हा दाखल, अन्य दोघांचा तपास सुरू, चार कासवांचीही केली सुटका

    17-Aug-2023
Total Views |
UP smuggling


मुंबई :
सध्या पशुपक्ष्यांची तस्करी करणाऱ्यांची संख्या वाढली असून उत्तर प्रदेशातून अशीच एक घटना पुढे आली आहे. पशुपक्ष्यांची तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातून अटक केली आहे. बुधवारी १६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे.
 
गाझियाबादमधील कौशंबी पोलिस ठाण्याच्या हद्दितील ही घटना असून फैजान उर्फ फिरोज असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) या संस्थेचे अधिकारी गौरव गुप्ता यांना रामपूरहून दिल्लीत काही पक्ष्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कौशंबी परिसरातही काही पोपट विकले जाणार असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
 
ही माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार एक व्यक्ती कौशंबी मेट्रो स्थानकाजवळ पिंजऱ्यासह ऑटोतून खाली उतरला. तो पिंजरा कापडाने झाकलेला होता. त्यानंतर गौरव गुप्ता यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे उपस्थित पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
 
आरोपीकडे असलेल्या पिंजऱ्यात २०० पोपट असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी पडताळणी केली असता त्यात १३५ पोपट आढळून आले. यापैकी १२५ पोपट मृत अवस्थेत होते. अधिक तपासानंतर फैजानकडे ४ कासवेही आढळली असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
 
दिल्लीतील जाफ्राबादच्या तौफिक आणि शकीलने हे पोपट रामपूरहून आणले असल्याचे फैजानने सांगितले. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, रामपुरवरुन पोपट आणत असताना त्यांना बसच्या स्टेपनीजवळ भरून ठेवण्यात आले होते. याठिकाणी गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तौफिक आणि शकील यांच्याविरुध्द गुन्हा नोंदवला असून त्यांचा शोध सुरु आहे.