मुंबई : लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर या हास्यवीरांच्या पिढीनंतर नाव येते अभिनेते भरत जाधव यांचे. गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना मालिका, नाटक, चित्रपट अशा विविध माध्यमातून भरत जाधव यांनी ३० वर्ष आपल्या निखळ अभिनयाने हसवले आहे. मात्र, आता भरत जादव यांनी एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच त्यांचे 'अस्तित्व' हे नाटक रंगभूमीवर येणार असून या नाटकातून ते प्रेक्षकांना हसवायला नाही तर डोळ्यांच्या कडा पाणवण्यासाठी येणार आहेत. दरम्यान, 'अस्तित्व' हे नाटक दसऱ्याच्या मुहुर्तावर भेटीस येणार असल्याची माहिती भरत जाधव यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
भरत जाधव यांची मोठी घोषणा
भरत जाधव यांनी पोस्ट करुन लिहीले की, "रसिक प्रेक्षकहो, आपणा सर्वांच्या आशीर्वादाने सही रे सही ला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या लाडक्या भरतने मागील ३० वर्ष आपणा सर्वांना खळखळून हसवल्यानंतर तो आपल्यासमोर पुन्हा येत आहे.
पण यंदा हसवायला नाही तर आपल्याला हळव करायला.. नवं नाटक घेऊन.. कधीही न पाहिलेल्या नव्या भूमिकेत.. भरत जाधव एंटरटेनमेंट अस्तित्व."
केदार-भरत-अंकुश, त्रिकुट पुन्हा येणार भेटीला
प्रत्येक क्षेत्रात आपले जवळचे मित्र असतातच. आणि एखादे तरी त्रिकूट हे नावाजलेले असतेच. असेच मराठीतील नावाजलेले त्रिकूट म्हणजे केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी. आजवर या तिघांनीही एकत्रित अनेक एकांकिका, मालिका आणि नाटकांत काम केले आहे. मात्र, पुन्हा एकदा हे त्रिकुट प्रेक्षकांना दिसेल का या प्रश्नावर लवकरच केदार शिंदे दिग्दर्शित कल्ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे भरत यांनी सांगितले. या चित्रपटात भरत जाधव, अंकुश चौधरी आणि सिद्धार्थ जाधव दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा हे हास्याचे विनोदवीर भन्नाट कलाकृती घेऊन येणार आहेत. तसेच, ह्यालागाड आणि त्यालागाड या गावाची नवी गोष्ट पुन्हा एकदा भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव जत्रा चित्रपटातून घेऊन येणार असल्याचेही भरत यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या नव्या वर्षात विनोदी चित्रपटांची मांदियाळी असणार असे चित्र दिसत आहे.