स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा पुण्यात दिल्या गेल्या. याच पुण्यातून काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली. त्यामुळे अशा या तालिबानी धर्मांध मानसिकतेला पाठिंबा देणार्यांनी प्रत्यक्षात अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी राजवट म्हणजे काय, हे एकदा प्रत्यक्ष अनुभवले पाहिजे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. यातील दोघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या ‘कलम १५३’ (दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी देणे) आणि ‘१५३ ए’ (विविध गटांमधील शत्रुत्व वाढवणे; तसेच सलोखा राखण्यासाठी प्रतिकूल कृत्ये करणे)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा परिसरात हा प्रकार झाल्याचे उघड झाले. याच कोंढव्यातून दहा जणांना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) चे सदस्य असल्याच्या आणि दहशतवादी कारवायांची योजना आखल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) आणि ‘राष्ट्रीय तपास यंत्रणा’ (एनआयए) यांनी ही कारवाई केली. पुण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या संख्येने ‘पीएफआय’चे सदस्य सापडणे, ही बाब गंभीरच! भारतामध्ये काही तालिबानी समर्थक धर्मांध आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, तालिबानच इस्लामचा जगभरात प्रचार आणि प्रसार करू शकेल. राजकीय विचारसरणी कोणतीही असली, तरी त्यांची मानसिकता ही अशी तालिबानीच. अफगाणिस्तानामध्ये स्थैर्य आणण्याचे सामर्थ्य फक्त तालिबानी संघटनेत आहे, असाही यांचा पोकळ दावा आणि तालिबानी राजवट संपूर्ण जगामध्ये प्रस्थापित होईल, हा विश्वास.
पण, प्रत्यक्षात काय आहे तालिबान? तालिबान ही क्रूर तसेच अत्यंत जुलमी राजवट. त्यांनी मानवी हक्कांचे उल्लंघन आधीही केले आणि आजही तेच करत आहेत. सर्रास फासावर लटकावणे, सामान्यांचा छळ करणे, महिला तसेच मुलींना शिक्षण आणि रोजगाराचे हक्क नाकारणे, हे तर त्यांच्यासाठी नित्याचे. म्हणूनच भारतामध्ये तालिबानी राजवटीला पाठिंबा देणार्यांनी एकदा तेथील भीषण वास्तव काय आहे, ते समजावून घेणे आत्यंतिक गरजेचे. तालिबान ही सुन्नी इस्लामी राजकीय आणि लष्करी संघटना आहे. अमेरिका तसेच ‘नाटो’ सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये, ती तेथे सत्तेवर आली. १९९६ ते २००१ या कालावधीत तिने अफगाणिस्तावर राज्य केले होते. अर्थातच अमेरिकेनेच तिची राजवट उलथून टाकली होती. हा कट्टरवादी गट म्हणून जगभरात ओळखला जातो.
इस्लामी कायद्याच्या कठोर कलमांचे तो पालन करतो. म्हणूनच महिला आणि मुलींवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेले आहेत. त्यांना शाळेत तसेच घराबाहेर काम करण्यास बंदी आहे. संगीत, दूरचित्रवाणी तसेच चित्रपट पाहण्यासही मज्जाव. अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून या संघटनेने अनेक निर्णय घेतले. यात महिला तसेच मुलींवरील निर्बंधांसह पुरुषांनी दाढी वाढवणे आवश्यक, महिलांनी त्यांचे चेहरे आणि शरीर झाकणे सक्तीचे आहे. त्यांनी बँका तसेच वित्तीय संस्थांचे नियंत्रण आपल्या हातात ठेवले आहे. मुलींसाठीच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. महिलांना पुरूष जोडीदाराशिवाय प्रवास करण्यास मनाई आहे. त्यांच्या खेळावरही बंदी घालण्यात आली. याचे उल्लंघन झाले, तर तालिबानी त्यांना जीवंत ठेवत नाहीत. जाहीरपणे फासावर लटकावले जाते. त्यात कोणतीही दयामाया ते दाखवत नाहीत. तालिबानी राजवटीवर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. ‘संयुक्त राष्ट्र संघा’ने अफगाणिस्तानला मानवी हक्कांचा आदर करण्याचे आवाहनही केले.
त्याचवेळी अमेरिकेने तालिबानवर निर्बंधदेखील लादले. पण, तरीही अफगाणींच्या हक्कांचा आदर करण्यास आपण वचनबद्ध आहोत, असा दावा तालिबानी करतात. त्यांच्या कार्यकाळात लाखो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. तसेच, अन्नधान्याच्या कमतरतेने सर्वसामान्य अफगाणी नागरिक त्रस्त आहेत. आज तालिबानकडे अंदाजे ६० ते ८० हजार सैन्य असल्याचे मानले जाते. त्यांचे नेतृत्व मुल्ला मोहम्मद उमर करत असून, तो पाकिस्तानमध्ये लपला असल्याचा तर्क आहे. धनाढ्य व्यक्तींनी दिलेल्या देणग्या, अमली पदार्थांची तस्करी तसेच खंडणीच्या माध्यमातून ते निधी उभा करतात. त्यांच्या कार्यपद्धतीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात आला आहे. तालिबान अफगाणिस्तावर प्रभावीपणे राज्य करेल का, हा प्रश्न अर्थातच गैरलागू ठरला असून, हा देश दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनण्यापासून त्याला रोखले जाऊ शकेल का, हा खरा प्रश्न. भारताच्या अंतर्गत सुरक्षेला तालिबानी विचारसरणीकडून धोका आहे, हे निश्चित. क्रूर तसेच जुलमी शासन म्हणून त्यांची नकोशी ओळख प्रस्थापित झाली आहे.
अशा धर्मांध आणि कट्टर विचासरणीचा देशातील वाढता प्रभाव ही चिंतेतीच गोष्ट. पुण्यासारख्या ‘आयटी हब’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणार्या शहरातील उपनगरात दहशतवादी सापडतात, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानचा जयघोष त्यांना करावा वाटतो, ही मानसिकता देशद्रोहीच! काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात मोहरमच्या निवडणुकीत पाकिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी केली. त्यात सहभागी झालेल्यांविरोधात तेथील सरकारने कडक कारवाई केली आहे. ३३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील १३ जणांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले असल्याचे उघड झाल्याने, ती बांधकामे पाडण्यात आली आहेत, त्याशिवाय लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करून तो वसूल करण्यात येणार आहे. पुण्यातही जे दहशतवादी सापडले आहेत, त्यांच्याविरोधात तसेच ज्या दोन देशद्रोही नागरिकांच्या पाकिस्तानप्रेमाला भरते आले होते, त्यांच्याविरोधातही अशीच कठोर कारवाई करणे, आत्यंतिक गरजेचे. त्यांच्या मालमत्ता ताब्यात तर घेतल्या पाहिजेतच; त्याशिवाय त्यांना नव्या भारतीय कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई झाली, तरच तालिबानी मानसिकतेला काही प्रमाणात अंकुश बसेल; अन्यथा जगभरात तालिबानचा प्रचार आणि प्रसार होईल का, हा वेगळाच मुद्दा आहे. तथापि, त्या प्रयत्नांत देशात काही घातपाती कृत्ये होणार नाहीत ना, याची खबरदारी तपास यंत्रणांनी घेणे, आत्यंतिक गरजेचे.