कट्टरपंथी इराण आणि बहाई

    16-Aug-2023   
Total Views |
Bahai Members Arrested in Iran for Smuggling Medicine

इराणमध्ये नुकतेच एका कुटुंबातील नऊ जणांना अटक झाली. या नऊ जणांनी औषध तस्करी केली आणि प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, असे इराणी प्रशासनाचे म्हणणे. जागतिक घडामोडींवर लक्ष असणार्‍यांचे म्हणणे आहे की, या नऊ जणांचा गुन्हा मोठा असो वा छोटा, त्यांना सजा मात्र मोठीच होणार. कारण, हे नऊ जण इराणमध्ये प्रतिबंधित असलेल्या पंथातील लोक आहेत. हो, आपण नेहमीच ऐकत असतो की, आज काय सुरक्षिततेसाठी किंवा अन्य कारणांसाठी अमूक वस्तू वापरांना प्रतिबंध केला आहे किंवा वाहतुकीच्या मार्गाला प्रतिबंधित केले आहे. मात्र, इराणमध्ये तर चक्क एका पंथालाच प्रतिबंधित करण्यात आले आहे. औषधांच्या तस्करीसाठी अटक झालेले ते नऊ जण या प्रतिबंधित पंथातील आहेत. कोणता आहे, तो धर्म, तर तो आहे-‘बहाई धर्म.’

इराणमध्ये हिंदू, ख्रिस्ती आणि पारशी धर्मालाही धर्म म्हणून मान्यता आहे. मात्र, बहाई धर्माला धर्म म्हणून किंवा पंथ म्हणूनही मान्यता नाही. हे बहाई पंथाचे लोक अग्रदूत मानले जाते. ईश्वराचा दिव्य संदेश देण्यासाठी येणार्‍या देवदूतांचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ते आले आहेत, असे त्यांचे म्हणणे. त्यांच्या पश्चात १८६३ मध्ये मिर्ज़ा हुसैन अली यांनी लोकांना, मानवता आणि विज्ञान यांनुसार जगण्याचा संदेश देण्यासाठी देवाने आपल्याला इथे पाठवले, असे जाहीर केले. मिर्जा हुसैन अलींना पुढे लोक ‘बहाउल्लाह’ म्हणू लागले. ’बहाउल्लाह’ म्हणजे ईश्वराचा प्रकाश, तर बहाउल्लाह यांनी स्वतःला पैगंबर तर घोषित केलेच, शिवाय जगभरातल्या धर्मामध्ये जे कोणी ईश्वर किंवा दूत आहेत, त्या सर्वांचा अवतार बहाउल्लाह आहेत, असे त्यांचे आणि त्यांच्या अनुयायांचे म्हणणे. यानुसार १८व्या शतकाच्या उत्तरार्धात शिया धर्मीय इराणमध्ये बहाई पंथाची स्थापना केली.

शिया लोकांनी इराणमध्ये मोठ्या प्रमाणात बहाई पंथाला स्वीकारले. इतके की, शियांनंतर बहाईंची लोकसंख्या जास्त आहे. बहाई पंथावर शियांसकट सुन्नी आणि इतर मुस्लीम पंथांनी बहिष्कारच टाकला. कारण, सरळ होते - बहाई पंथाने इस्लामच्या सर्वोच्च मान्यतेलाही इतर धर्मांच्या सोबत गणले होते. तसेच, इस्लामच्या ‘आसमानी किताब’ला किंवा ‘शरिया’च्या पार्श्वभूमीवर बहाउल्लाह यांनी स्वतंत्र प्रार्थना आणि सामाजिक, कौटुंबिक नियमही बनवले आणि बहाई समाज हे सगळे नियम आणि प्रार्थना कट्टरतेने पाळतात. त्यामुळेच बहाई समाज किंवा पंथ हा इस्लामसंबंधित असूच शकत नाही, असे शियापंथीय इराणसकट जगभरातल्या मुस्लिमांना वाटते. असो. इराणमध्ये बहाई पंथाला मान्यताच नसल्याने त्यांच्या श्रद्धेला आणि त्यानुसारच्या पूजा आणि जीवनपद्धतीलाही इराणमध्ये बंदीच आहे. इतकी बंदी की, बहाई व्यक्तींसाठी स्मशानासाठी कायदेशीर जागाही मिळत नाही.

इराणमध्ये जीवनासाठी प्रचंड संघर्ष असूनही बहाई तिथे ठाण मांडून जगत आहेत. जगण्यासाठी पावलापावलांवर मरणच आहे, तरीसुद्धा बहाई इराणमध्ये आजही त्यांच्या श्रद्धा जपत आहेत. तसे पाहिले, तर जगभरात ६० लाखांवरही बहाईंची संख्या नाही. मात्र, बहाई अनुयायांची या पंथाप्रती कट्टरता विचार करण्यासारखी आहे. १९८२ साली दि. १० जूनला इराणमध्ये दहा बहाई महिलांना फाशी देण्यात आली. सगळ्यात मोठ्या महिलेचे वय होते ५७, तर सगळ्यात छोट्या मुलीचे वय होते १७ वर्षे. गुन्हा काय होता, तर या १७ वर्षांच्या मुलीने इराणमध्ये बहाई समाजाच्या लोकांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल लिहिले. इराण प्रशासनाने लागलीच या कुटुंबाला हेर ठरवले. पहिल्यांदा या मुलीच्या वडिलांना घरातून ओढत नेऊन फासावर दिले आणि एक महिन्यानंतर या दहा महिलांना अटक केली.

इराणच्या कट्टर प्रशासनाने या महिलांना सांगितले गेले की, त्यांनी कबूल केले की, त्या बहाई नाहीत, तर त्यांना जीवनदान देण्यात येईल. मात्र, या दहाही जणींनी बहाईच आहोत, म्हणून मरणेसुद्धा पसंद केले. त्याआधी आणि त्यानंतरही इराणमध्ये बहाईंना अत्याचाराला सामोरे जावे लागलेच. अरब देशातील सुन्नी मुस्लीम शिया मुस्लिमांना कमी लेखतात, पाकिस्तानमधले मुस्लीम अहमदियांना तर मुस्लीम मानत नाहीत, तर इराणमध्ये शिया बहाईंना प्रतिबंधित करतात. या पार्श्वभूमीवर इराणने औषधांच्या तस्करी गुन्ह्यासाठी अटक केलेल्या बहाई व्यक्तींना काय सजा होईल? त्यांच्या कथित गुन्ह्यासोबतच त्यांच्या बहाई पंथालाही लक्ष्य केले जाईल का? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
 
९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.