कृतिशून्य स्वच्छंदी मन आणि देवकृपा

    16-Aug-2023   
Total Views |
Artuicle On Spirituality And Devotional Activities

कृतिशून्य, आळशी जीवनात रममाण होणारा, अतृप्त असतो. त्याला समाधान मिळत नाही. अशा माणसाला भगवंत कसा भेटेल? ते शक्य नाही. देव त्याच्यावर कृपा करणे सर्वथा अशक्य, स्वैर मन ताब्यात ठेवून सदाचरणाने सत्संगतीत राहिल्यास भगवंताचा सूक्ष्म अनुभव मिळू शकतो व त्याने चित्त प्रसन्न आणि समाधानी राहते.

भगवंताचे गुणगान करताना, म्हणजेच करताना इत्तर विचार बाजूला सारून लक्ष भगवंताकडे असावे. परद्रव्य आणि दुसर्‍यांच्या बायका यासंबंधांच्या विचारांना मनात थारा देऊ नये. त्यांचा मनापासून त्याग करावा, असे स्वामींनी मागील श्लोक क्र.१०३ मध्ये सांगितले आहे. ते सर्वांच्या हिताचे आहे, दुसर्‍यांचा पैसा आणि बायका याविषयी अभिलाषा बाळगून माणूस आशाळभूतपणे त्यांचाच विचार करीत राहिला, तर परमार्थ काय पण प्रपंचातही काही साध्य होणार नाही. विकारवश मनात देवाविषयी विचार येणे कदापि शक्य होणार नाही. कारण, शुद्ध मनातून भगवंताविषयी विचार प्रगट होतो आणि मन शुद्ध करण्यासाठी माणसाला चारित्र्यवान होऊन भ्रष्ट आचारापासून दूर राहावे लागते. चारित्र्य न्याय, नीतिमत्ता आणि विवेक यांची समर्थांनी जागोजाग प्रशंसा केलेली आहे.

पूर्वीच्या काळी लोक सात्विक आनंद अनुभवण्यासाठी भजन मंडळीत आणि कीर्तन समारंभात जात असत. काही कथाकीर्तनकार जनसमुदायाचा विचार न करता, आपल्या गायन, वक्तृत्व कलेच्या जोरावर श्रोत्यांना आवडेल असे समजून श्री-वर्गाची टिंगलटवाळी करतात अथवा स्त्रियांची रसभरीत वर्णने करतात. हे समर्थकाळात होते असे नव्हे, तर आजही पाहायला मिळते. अर्थातच समर्थांना असले वागणे मान्य नाही म्हणून स्वामी मनाच्या श्लोकांप्रमाणे दासबोधातही कीर्तन करणार्‍या हरिदासांना, श्रोत्यांचे मन कामाकार होणार नाही याची काळजी घ्यायला सांगतात. स्वामीचा दासबोधातील हा उपदेश पाहा-

लावण्य स्त्रियांचे वर्णिता।
विकार बाधिजे तत्त्वता।
धारिष्टापासून श्रोता। चळे तात्काळ॥
लावण्य क्रियांचे ध्यान। कामाकार जालें मन।
कैचें आठवेल ध्यान। ईश्वराचे ॥
अर्थात, या सर्व बोलायच्या गोष्टी नसून त्या आचरणात आणायच्या आहेत. माणसाचे मन अत्यंत चंचल असते. असे हे वायुरूप मन कल्पनांच्या वावटळीत सापडल्यावर त्याला आवरणे कठीण असते, हे स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत. स्वतःविषयी अहंकार, गर्व, ताठा आणि कामविकार यांच्या तृप्ततेच्या कल्पनेत आणि संभ्रमात वावरण्यात माणसाला आनंद असतो, अशा माणसांना बडबड करण्यात आनंद मिळत असतो. पण, नुसत्या बडबडीत स्वारस्य नसते. हे स्वामी सांगत आहेत-

क्रियेवीण नानापरी बोलिजेतें।
परी चीत दुश्चीत तें लाजवीतें।
मना कल्पना धीट सैराट धावे।
तया मानवा देव कैसेनि पावे ॥१०४॥
परमार्थात काय किंवा प्रपंचात काय कोणताही उदात्त विचार कृतीत आणायला म्हणजेच आचरणात आणायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यवहारात हा आपला नित्याचा अनुभव आहे की, काही लोक नुसतेच मोठमोठ्या गप्पा मारीत असतात. पण, त्याप्रमाणे स्वतः प्रत्यक्ष कृती करताना दिसत नाहीत. त्याच्याही पुढे जाऊन ही माणसे आपल्या कल्पनेनुसार प्रत्यक्ष कृती न करता, ’मी हे केले’, ’मीच ते करणारा आहे’ अशा वल्गना करीत असतात.

आपला बडेजाव वाढावा म्हणून बढाया मारीत असतात. आपला विचार किंवा आपली कल्पना प्रत्यक्ष कृतीत न आणता फक्त बढाया मारण्यास काही अर्थ नसतो. माणसाने प्रथम कृती करावी आणि त्यानंतर त्या विषयावर बोलावे. असे झाले तर इतर लोक त्याच्या विचारांना व बोलण्याला मान देतील. नुसत्या कृतिशून्य माणसांच्या गप्पा मारण्यास, त्यांच्या बडबडीला लोक कंटाळतात. त्यांच्या विचारांना, कल्पनांना महत्त्व द्यावेसे लोकांना वाटत नाही. सुरुवातीला अशी माणसे लक्षात येत नाहीत आणि आपण त्यांच्या भूलथापा या थापा नसून खर्‍या असाव्यात असे समजत असतो. अशा माणसांच्या अंगी वक्तृत्वकला असल्याने ते उदाहरणे दृष्टान्त देऊन आपल्या कल्पना लोकांना ऐकवून त्याद्वारा आपले मोठेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. काही लोकांना आकर्षक देहयष्टी लाभलेली असते, तर काहींना गोड बोलण्याची कला अवगत असते, या प्रकारातील अहंकारी माणसे वेगवेगळे विचार, प्रपंचात किंवा परमार्थात, स्वतःच्या आचरणात न आणता फक्त लोकांना ऐकवून आपले महत्त्व वाढवीत असतात - समर्थांना हा ढोंगीपणा मान्य नाही म्हणून स्वामींनी अशा बाजारगप्पा करणार्‍यांना सुनावले आहे की, ‘क्रीयेवाण वाचाळता व्यर्थ आहे.’

हा बढाईखोर, घमेंडखोर, अहंकारी माणूस काही दिवस लोकांना फसवू शकेल, पण हे फार दिवस व सर्व ठिकाणी चालत नाही. अध्यात्मात पारमार्थिक अनुभव अतिसूक्ष्म असल्याने काही दिवस लोकांना फसवता येते. कारण, भगवंताची अनुभूती ही अतींद्रिय असल्याने त्याचा अनुभव कोणालाच नसतो, त्याचा फायदा ही कृतिशून्य माणसे घेतात. भगवंताचा कुठलाही अतींद्रिय अनुभव नसताना कृतीशिवाय ही माणसे नानाप्रकारे बोलत असतात. तथापि त्यांना मनातून जाणवत असते की, चित्त प्रसन्न करणारा भगवंताचा अनुभव मला नाही. त्यामुळे आतल्या आत कुठेतरी त्यांना स्वतःची लाज वाटत असते. तथापि त्यांची कल्पना स्वछंदपणे वावरत असते. मनावर ताबा नसल्याने ती त्यांना थांबवता येत नाही. वस्तुतः कल्पनाशक्ती ही वाईट आहे, असे समर्थांना सांगायचे नाही. या कल्पनाशक्तीने भौतिकशास्त्रात अनेक शोध लावले आहेत.

या कल्पनेने माणसाला अनेक सुखसोयी मिळवून दिल्या आहेत, पक्षी आकाशात कसलाही आधार नसताना पंखांच्या बळावर उडू शकतात. त्यांचा आकार चोचीकडे व शेपटाकडे निमुळता होत जातो. या निरीक्षणांतून माणसाने कल्पना केली की, आपल्यालाही असे आकाशात उडता येईल का? माशाप्रमाणे आपल्याला पाण्यातून प्रवास करता येईल का? भगवंताविषयीसुद्धा प्रथम माणसाला कल्पनेतून पुढे जावे लागते. कल्पनाशक्ती ही माणसाला निसर्गाने दिलेली देणगी आहे. पण, त्याला कृतीची जोड नसेल, तर नुसती शेखमहंमदी कल्पना करण्यात माणसाचे नुकसानच आहे. आळशीपणात केवळ कल्पना करीत मन सैराट धावत असेल, तर मनाच्या शक्तीचा तो अपव्यय आहे. केवळ स्वैरपणे कल्पना करीत राहून कृतिशून्य, आळशी जीवनात रममाण होणारा, अतृप्त असतो. त्याला समाधान मिळत नाही. अशा माणसाला भगवंत कसा भेटेल? ते शक्य नाही. देव त्याच्यावर कृपा करणे सर्वथा अशक्य, स्वैर मन ताब्यात ठेवून सदाचरणाने सत्संगतीत राहिल्यास भगवंताचा सूक्ष्म अनुभव मिळू शकतो व त्याने चित्त प्रसन्न आणि समाधानी राहाते. अशा विवेकी, साक्षेपी, चारित्र्यसंपन्न भक्तावरच देव कृपा करतो.
 
७७३८७७८३२२

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..