घराणेशाही, भ्रष्टाचार आणि लांगुलचालनाविरोधात लढा देण्याची वेळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    15-Aug-2023
Total Views |
PM Narendra Modi Addressed To The Indian Peoples

नवी दिल्ली :
एकविसावे शतक हे भारताचे असून संपूर्ण जग आपल्याकडे विश्वमित्र या भावनेने पाहत आहे. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी घराणेशाही, भ्रष्टाचार आणि लांगुलचालनाविरोधात लढा देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७६ व्या स्वातंत्र्यदिनी देशास संबोधित करताना केले.

भ्रष्टाचार, घराणेशाही आणि लांगुलचालन या तीन वाईट गोष्टींविरुद्ध लढण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. या अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्या देशातील लोकांच्या आशा-आकांक्षांना अडथळे निर्माण करतात. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आपल्याला पुढे न्यावी लागेल. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीने देशास जखडले आहे. घराणेशाही हा काही राजकीय पक्षांचा जीवनमंत्र आहे. त्यातूनही देशास बाहेर काढायचे आहे. लांगुलचालन हा विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे. लांगुलचालनामुळे सामाजिक न्यायाची हानी झाली आहे. आपल्या भावी पिढ्यांना असे जीवन जगण्यास भाग पाडणे हा गुन्हा आहे. असा देश आमच्या भावी पिढीला द्यायचा आहे, जेणेकरून त्यांना छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

भारताच्या चेतनेबद्दल, भारताच्या क्षमतेबद्दल जगात एक नवीन आकर्षण, एक नवीन विश्वास निर्माण झाला आहे. भारताकडे संपूर्ण देश आज विश्वमित्र या भावनेने पाहत आहे. देशातील माता-भगिनींच्या शक्तीमुळे आज देशाची प्रगती झाली आहे.शेतकरी बंधू-भगिनींच्या मेहनतीमुळेच देश आज कृषी क्षेत्रात पुढे जात आहे. लोकसंख्या, लोकशाही आणि विविधता या त्रिमूर्तीमध्ये देशाची स्वप्ने साकार करण्याचे सामर्थ्य आहे. देशात संधींची कमतरता नाही. देशात अनंत संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. आपण जे काही करू, जे काही पाऊल उचलू, जो काही निर्णय घेऊ, तो पुढची एक हजार वर्षे आपली दिशा ठरवणार आहे, ते भारताचे भाग्य लिहिणार असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

पुढील वर्षीदेखील लाल किल्ल्यावरून देशास संबोधित करणार असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, २०१४ साली मी परिवर्तनाचे वचन घेऊन आलो होतो. देशातील १४० कोटी जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म या आश्वासनाचे विश्वासात रुपांतर झाले आहे. या वचनाचे मी विश्वासात रूपांतर केले आहे. या वचनाचे विश्वासात रूपांतर करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी देशासाठी कठोर परिश्रम केले आणि ते अभिमानाने केले. ते म्हणाले की, केवळ आणि फक्त राष्ट्रालाच महत्त्व दिले आहे. २०१९ मधील कामगिरीच्या जोरावर तुम्ही सर्वांनी मला पुन्हा संधी दिली आहे. आगामी पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. २०४७ साली देशास विकसित बनविण्यासाठी येणारी पाच वर्षे हा सर्वात मोठा सुवर्ण क्षण आहे. पुढच्या वेळी १५ ऑगस्टला या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाची उपलब्धी, क्षमता, प्रगती आणि त्यातले यश अधिक आत्मविश्वासाने तुमच्यासमोर मांडेन, असेही पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.

मणिपूरमध्ये शांतता निर्माण होण्यास प्रारंभ

मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला असून आमच्या माता – भगिनींनादेखील त्रास सहन करावा लागला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात शांतता प्रस्थापित बोत असल्याचे वृत्त येत आहे. मणिपूरच्या लोकांनी शांततेस दिलेले प्राधान्य हे सुखावह असून त्याद्वारेच तोडगा निघणे शक्य आहे. संपूर्ण देश मणिपूरसोबत आहे. राज्य आणि केंद्र सरकार मिळून त्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि यापुढेही करत राहतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

१५ हजार कोटींची विश्वकर्मा योजना

देशात पारंपरिक कौशल्यांद्वारे उपजीविका करणाऱ्या सोनार, सुतार, गवंडी, केश कर्तनकार आणि अशा सर्व लोकांसाठी पुढील महिन्यात विश्वकर्मा योजना लागू केली जाणार आहे. त्यासाठी १३ ते १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामुळे प्रामुख्याने ओबीसी समुदायाचा आर्थिक विकास साध्य होईल, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.