मुंबई : अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी सकाळी नवाब मलिकांच्या कुर्ला येथील निवासस्थानी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीत मलिकांना अजित पवारांच्या गटासोबत येण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, मलिकांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट ऍक्टिव्ह झाले असून त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी दोन्ही गटांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
नवाब मलिक हे मलिक तुरूंगातून बाहेर आले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. सुळे यांनी जवळपास चार तास मलिकांच्या प्रक्रृतीची विचारपूस केली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून नवाब मलिकांचा पाठिंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तर मंगळवार, दि. १५ ऑगस्ट रोजी अजित दादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि इतर सहकाऱ्यांनी सकाळी मलिकांची भेट घेतली. या भेटीत मलिक आणि या नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याची माहिती समोर अली आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांची मलिकांच्या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात असून आता नवाब मलिक काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, राजकीय भूमिकेबाबत तूर्तास तरी नवाब मलिकांनी कोणताही निर्णय घेतलेला नसून सध्या ते आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नवाब मलिक हे सध्या तरी तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.