समकालीन संकल्पना चित्रकारितेचे ‘मानकरी’

    15-Aug-2023
Total Views |
Article On Painter Prof. Mahesh Mahadev Mankar
 
समकालीन संकल्पचित्रांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे आणि समाजातील विसंगती, वैचित्र्य यांवर रंगरेषेतून भाष्य करणारे अभिनव चित्रकर्मी प्रा. महेश मानकर यांच्या चित्रकारितेचा ‘रंग’प्रवास...

प्रा. महेश महादेव मानकर यांचा जन्म विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचा. त्यांचे वडील आयुध निर्माण कारखान्यात सरकारी कर्मचारी, तर आर्ई गृहिणी. घरात कुठलाही कलेचा वारसा नसलेल्या महेश यांना बालपणासूनच चित्रकलेची विलक्षण आवड. बालवयातच ते सुरेख वस्तुचित्र, रेखाचित्र काढत. गावातील ’लोकमान्य टिळक शिक्षण संस्थे’तून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. कलेतच करिअर प्रारंभीपासूनच निश्चित होतेच. प्रथम ’आर्ट टीचर डिप्लोमा’व नंतर नावरगाव येथूनच ’जीडी आर्ट’चे शिक्षण प्रथम श्रेणीतून पूर्ण करत त्यांनी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून सुवर्णपदकासह ’एमएमए’(पेटिंग) शिक्षण पूर्ण केले.

विलक्षण कलादेणगी मिळालेल्या महेश यांना ‘अ‍ॅनिमेशन इंडस्ट्री’त नोकरीची संधी चालत आली. त्यामध्ये त्यांनी कलात्मक, सर्जनशील चित्रकारितेचे दर्शन घडवत अनेक कलाकृतींना सजवले. कलेसोबत अध्यापनाची आवड असल्याने ते नागपूर विद्यापीठात ’एमएफए’ (व्यक्तिचित्रण) विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.

स्वतःची कला आणि ’एमएफए’च्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अध्यापन, अशी दोन्ही कामे त्यांनी लीलया सुरू ठेवली. २०१० पासून महेश जलरंगात ’स्पॉट’वर जाऊन निसर्गचित्र काढत. त्यांची चित्रे अत्यंत रसिकप्रिय होत राहिली. २०१९ मध्ये रशियामध्ये पोकरू, सुझडेन या दोन शहरांत ’रशियन अ‍ॅथलिक’तर्फे आयोजित कार्यशाळेत त्यांना सहभागासाठी आमंत्रण मिळाले. त्या शहरांमधील प्राचीन, ऐतिहासिक वारसा स्थळांवर ‘लॅण्डस्केप’ चित्र रंगवण्यासंबंधी ती कार्यशाळा होती. मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करत त्यांनी अप्रतिम चित्रे रंगवली. ”रशियामध्ये विदेशातील अनेक कलाकारांसोबत कामाची संधी मिळाल्याने नवीन शिकायला मिळाले. तसेच तेथील संस्कृती, कला, चित्रकलेतील नवे पैलू शिकायला मिळाले, हा अनुभव माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. विदेशी चित्रशैली आणि भारतीय चित्रकला यांची तुलना करता आली आणि यातून नवीन माहिती, अनुभवाचे दालन खुले झाले.” असे महेश सांगतात.

रशियामधून कलेची ही प्रतिष्ठित कार्यशाळा पूर्ण करून आल्यानंतर महेश यांचे भारतात अधिकच कौतुक झाले. त्यांच्या कामाचा आणि शिकवण्याचा स्वतंत्र बॅ्रण्ड तयार झाला. ’गाढव’ हा प्राणी घेऊन मानकर नंतर समकालीन सामाजिक, राजकीय तसेच समाजमाध्यमांमध्ये सध्याला सुरू असलेल्या ‘मुर्खपणा’वर भाष्य करणारी ५५ चित्रांची ‘सिरीज’ चित्रबद्ध केली. त्यामध्ये सर्वाधिक संकल्पचित्रे राजकारण आणि समाजमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या विचित्र, मूर्खतापूर्ण पद्धतीवर परखड भाष्य करणारी आहेत.

महेश यांची प्रत्येक चित्रे नवीन परखड आणि समकालीन घटना, घडामोडी आणि परिस्थितीवर भाष्य करतात आणि ही ‘कन्सेप्च्युअल आर्ट’ चित्रकारितेमध्ये इतर चित्रकारांपेक्षा वेगळेपणा प्रदान करणारी ठरत आहे. महाविद्यालयात असल्यापासून संकल्पनांवर आधारित सुरेख चित्र काढणार्‍या महेश यांनी ’कोविड’काळातील आपत्तीला इष्टापत्ती मानून विचारांवर, कल्पनांवर आधारित अनेक चित्रे रेखाटली. ’कोविड’ काळात जग थांबलेले होते. परंतु, मिळालेल्या या फावल्या वेळेचा त्यांनी सदुपयोग करत ‘कन्सेप्च्युअल’ विषयाला वेगळे परिमाण, उंची प्रदान केली. त्यांची चित्रकला लॉकडाऊनच्या निवांत काळात अधिकच बहरली.

महेश गेली अनेक वर्षं ‘खजुराहो महोत्सवा’त ’आर्ट मेला’मध्ये सहभाग घेत असून, तेथे दहा जणांच्या चमूसह त्यांनी अनेक चित्रे रेखाटली आहेत. ”विदर्भात बहुतांश चित्रकार समकालीन, संकल्पनांवर आधारित चित्रकारितेचे काम करत असतात,“ असे महेश सांगतात. त्यामुळे महेश यांचीही समकालीन ’कम्पोझिन’ कलाकृतींचे चित्रकार म्हणून अल्पावधीच वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आज ते नागपूर विद्यापीठात ‘एमएफए’साठी अध्यापन करत आहेत. त्यांच्या अनेक चित्रांची विदेशातही विक्री झाली आहे. ”माझी चित्रे किती डॉलरला खरेदी केली गेली किंवा हिंदुस्थानाबाहेरील किती देशांमधून चित्रांना मागणी आली, अशा या व्यावहारिक खेळात मी कधीच गुंतून राहत नाही. माझ्यासाठी चित्रांचा व्यावसायिक दृष्टिकोन कधीच नव्हता किंवा मी विक्री व्हावी, म्हणून कधीच कलानिर्मिती केली नाही. मात्र, कलेतून अध्यात्मानुभूती देणारा स्वानंद मिळत राहावा आणि तेच माझ्यासाठी यशाचे परिमाण आहे,” असे महेश सांगतात.
 
विदर्भात चित्रकारितेचे सध्याचे वातावरण कसे आहे, असे विचारताच महेश सांगतात की, “विदर्भात आर्टगॅलरी, आर्ट डीलर, कलाप्रेमी यांची संख्या मुंबई-पुणे-नाशिक आणि एकूणच उर्वरित महाराष्ट्रापेक्षा विलक्षण कमी असल्याने येथे कलाविषयक जागृती, कलासाक्षरतेसाठी मोठे काम व्हायला हवे. त्यासाठी नवोदित तसेच प्रस्थापित आर्टिस्टने गॅलरीपर्यंत त्यांची कामे पोहोचवावीत. नव्या चित्रकारांनी अनुभवी चित्रकारांशी संवाद साधून अधिकाधिक गॅलरी, चित्रप्रदर्शने पाहावी, प्रस्थापित कलाकरांच्या स्टुडिओला भेट देत सुसंवाद वाढीस लागावा.”महेश मानकर याचे पुढील वर्षी ’मूर्खपणा’ या विषयावरील समकालीन (कम्पोझिशन) चित्रकृतींचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट दालनात भरणार आहे. त्यासाठी त्यांची जय्यत तयारी सुरू आहे. समकालीन संकल्पना चित्रांतून विश्वात नाव होईल, अशी चित्रकृती आपल्या हातून घडावी, असे महेश मानकर यांचे स्वप्न. त्यासाठी त्यांना दै. ’मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.!

निल कुलकर्णी