‘अखंड भारत संकल्प दिना’निमित्त व्याख्यानाचे आयोजन

    15-Aug-2023
Total Views |
Akhand Bharat Sankalp Din

मुंबई : रा. स्व. संघ नेताजी सुभाषचंद्र बोस नगर माधव संस्कार केंद्र यांच्यामार्फत ‘अखंड भारत संकल्प दिना’निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. गेली 20 वर्षे ही परंपरा सुरू आहे. सोमवार, दि. 14 ऑगस्ट रोजी अंधेरी येथील यंदाच्या कार्यक्रमात वक्ते म्हणून पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सहार भागचे भाग संघचालक श्री रवीजी नथानी उपस्थित होते.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण स्वराज्य या गोष्टीचा विसर पडला, म्हणून फाळणीसारखी जखम हृदयावर स्वतःच्या हाताने कोरावी लागली. महाराजांना आदर्श मानून त्यांच्यासारख्या युद्धनीतीचा वापर, अधर्माचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाने केलेली रणनीतीच भारताला पुन्हा एकदा अखंड बनवू शकते,” असे प्रतिपादन पांडुरंग बलकवडे यांनी केले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा तरुणांनी एकत्र येऊन संपूर्ण स्वराज्य म्हणजे पुन्हा अखंड भारत करण्यासाठी प्रयत्न करावे, असा संकल्प करावा,” असेही ते यावेळी म्हणाले.
 
केंद्राचे कार्यकर्ते प्रसाद मोर्जे यांनी या कार्यक्रमाबद्दल सांगितले की, “केंद्र नेहेमीच सामाजिक जागृतीपर उपक्रम राबवत असते. अनेक वर्षे सातत्याने सेवा उपक्रमही सुरू आहे. 1947च्या स्वातंत्र्यासोबत झालेली देशाची फाळणी, हे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला लागलेले गालबोटच आहे. खरा इतिहास लोकांसमोर यावा, फाळणी झाली म्हणजे नेमके काय झाले, मूठभर मीठ उचलून स्वातंत्र्य मिळालेलं नाही, तर रक्ताचे पाट वाहावे लागले. त्यानंतर हे स्वातंत्र्य मिळवता आले. हा खरा इतिहास नवीन पिढीला समजावा, याच हेतूने दरवर्षी आम्ही व्याख्यांनाचे आयोजन करतो.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर नागवेकर, दीप राणे, वैभव कदम, देवेश मसुरेकर, योगेश कोकाटे, अक्षय जैतापकर यांनी खूप परिश्रम केले.