टसर रेशीम आणि शाश्वत रोजगार

    14-Aug-2023   
Total Views |


tasar reshim



सह्याद्रीची पर्वतरांग म्हणजे जैवविविधतेची खाणच. याच पर्वतरांगेमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या ऐनाच्या झाडांचे मोल समजून टसर रेशीम शेतीचा प्रकल्प सुरू करणाऱ्या डॉ. योगेश फोंडे यांची ही विशेष मुलाखत...



१) टसर रेशीम म्हणजे नेमकं काय आणि त्याच्या उत्पादनातून रोजगार निर्मिती करावी असं तुम्हाला का वाटलं?
’टसर’ म्हणजेच ‘जंगली’ या अर्थाने ’टसर’ रेशीम हा शब्दप्रयोग केला जातो. पतंग किंवा ’मॉथ’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या अळीपासून रेशमी धाग्याची निर्मिती केली जाते आणि यालाच ’टसर रेशीम’ असं म्हंटलं जातं. 2009 मध्ये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात ’टसर रेशीम’ हा माझ्या ‘पीएच.डी’चा विषय होता. ‘झुऑलॉजी’ म्हणजेच प्राणिशास्त्र विभागामध्ये यावर आम्ही शिक्षण घेत होतो. टसर रेशीमवर तिथे प्रयोग चालू होता, त्यात खाद्य वगैरै आणून अळ्यांचं संगोपन केलं जात होतं आणि त्यातून कोष निर्मिती करण्याचं काम सुरू होतं. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणात ऐनाची झाडे आहेत.
त्यामुळे ‘पीएच.डी’चा विषयच पुढे घेऊन काम करायचं ठरवलं आणि 2010 मध्ये ही कल्पना मूळ धरू लागली. पश्चिम घाट म्हणजेच गोव्यापासून केरळपर्यंत सर्वत्र ऐनाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. 2014 मध्ये डीग्री मिळाल्यानंतर टसर रेशीमचा हा प्रकल्प घेऊन ग्राऊंड लेव्हलला जाऊन आपण काम करायचं असं मी ठरवलेलं होतं आणि जानेवारी 2015 पासून मी काम सुरू केलं. भंडारा, गडचिरोलीमध्ये आदिवासी भाग असून तिथे हे काम पिढ्यान्पिढ्या केलं जातं.
२) या प्रयोगात ऐनाचीच झाडे इतकी महत्त्वाची का आहेत?
टसर रेशीमसाठी ऐन हे एक महत्त्वाचं आणि पोषक असं झाडं आहे. ऐनाच्या झाडावर सर्वांत मोठ्या प्रमाणात कोष उत्पादन होते. याचा ’वन्य सिल्क’ म्हणून ट्रेडमार्क केलेला आहे. काटेरी बोर, अर्जुन, बदाम अशा काही झाडांवर ही याचं उत्पादन करता येऊ शकते. मात्र, ऐनाच्या झाडांवर त्यांची उत्पादकता सर्वाधिक असते.
tasar reshim
३) रेशीम उत्पादनाची प्रक्रिया नेमकी कशी असते?
पतंगांच्या म्हणजेच मॉथच्या नर आणि मादी अशा एका जोडीचे मिलन (ारींळपस) घडवून आणलं जातं आणि त्यामध्ये मग मादी अंडी घालते. एका वेळेला साधारण 150 ते 200 अंडी मादी घालते. ही अंडी गोळा करुन ती स्वच्छ धुतली जातात आणि एका मडक्यामध्ये उबवण्यासाठी ठेवली जातात. अंडी उबण्यासाठी साधारण 10-12 दिवसांचा काळ घेते आणि त्यानंतर अळ्यांची पिल्ले बाहेर पडायला सुरुवात होते. याची पिके साधारण तीनवेळा घेतली जातात - जून, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, डिसेंबर. जून, जुलैच्या पहिल्या हंगामात आलेली पिल्ले शेतकर्‍यांना दिली जातात, यांचा काळ एक महिन्यांपर्यंत असतो. पुढच्या दीड महिन्यांत आलेल्या अळ्या दिल्या जातात.
निर्मिती केंद्रामध्ये त्यांची निर्मिती केली जाते आणि पुन्हा तिसरे पीक येईपर्यंत त्याचे वाटप शेतकर्‍यांना केला जाते. एका ट्रेमध्ये पसरवून अंड्यांची उबवण केली जाते. अंड्यातून पिल्ले बाहेर पडल्यानंतर त्यांना ट्रेमध्ये कोवळा हिरवा पाला दिला जातो. या कोवळ्या पानावर त्या चढल्या की त्यांना अलगद झाडावर सोडून देण्यात येते आणि त्या झाडाची पाने खायला हळूहळू सुरू करतात. 15-20 दिवस याच झाडांवर त्याचं संगोपन केलं जातं. टसर अळीच्या एकूण पाच अवस्था असतात. तिसरी अवस्था पूर्ण केल्यानंतर या अळ्या बर्‍यापैकी मोठ्या होतात, आणि त्या फांद्यांद्वारे सोडल्या जातात. वातावरणानुसार त्या आपली पाचवी अवस्था पूर्ण करतात.
पाचवी अवस्था पूर्ण झाल्यानंतर अळी पानं खाणं बंद करते आणि आपलं घर बांधायला सुरुवात करते. तिच्या शरीरात असलेल्या चिकट द्रवरुप पदार्थापासून ती स्वतःभोवती धागा विणायला सुरुवात करते. ही प्रक्रिया दोन दिवसांपर्यंत सुरू असते. दोन दिवसांनंतर एक परिपक्व रेशीम कोष तयार होतो. त्या कोशामध्ये जवळजवळ 500 ते 600 मीटर इतक्या मोठ्या अंतराचा धागा असतो. हे कोष तयार झाल्यानंतर पुन्हा दोन दिवसांसाठी ते तसेच ठेवण्यात येतात आणि पाचव्या सहाव्या दिवशी ती फांदी कापून ते कोष काढून घेतले जातात.
कोशातून पतंग बाहेर पडण्याचा कालावधी जूनमध्ये असतो. म्हणजेच डिसेंबरमध्ये अंड्यातून बाहेर आलेली अळी जून महिन्यापर्यंत प्युपा अवस्थेत असते. नंतर योग्य कोषनिर्मिती झाल्यानंतर हे कोष काढून घेतले जातात आणि त्यावर पुढील प्रक्रिया केली जाते. यामध्ये ते कोष गरम पाण्यात शिजवले जातात म्हणजे आत असणारा प्युपा आपोआपच मरुन जातो आणि कोष ही मऊ होतो. हे झाल्यानंतर चरखा किंवा तत्सम मशीनच्या सहाय्याने कोशाच्या आतील रेशीम धागा गुंडाळून घेतला जाते.
silk moth
४) रेशीम उत्पादनातून रोजगार निर्मिती करण्याचे टप्पे काय होते?
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, छत्तीसगढ मध्ये हा प्रकल्प सुरू होता. प्रत्यक्ष प्रकल्प सुरू करण्यापूर्वी स्थानिक लोकांना हा प्रकल्प दाखवणे गरजेचे होते, म्हणून शेतकर्‍यांना दाखविण्यासाठी तिकडे घेऊन गेलो होतो.
2017 पासून मी याचा चांगला पाठपुरावा करणं चालू केलं होतं. मात्र, तोपर्यंत वन विभागाला या प्रकल्पाचं तितकंसं महत्त्व कळून आलं नव्हतं. त्यामुळे काही खासगी कंपन्यांकडे ही मी गेलो पण प्राथमिक स्तरावर असल्यामुळे यामध्ये गुंतवणूक करायला कोणीही तयार नव्हते. 2020-2021 मध्ये टाळेबंदीमुळे पुन्हा या कामात अडथळा निर्माण झाला. पण 2022 मध्ये मात्र, जिल्हा नियोजन समिती, प्रशासन, वन विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटायला सुरुवात केली आणि तत्काळ काम चालू केलं. त्यांना त्या संकल्पना आवडल्या आणि त्यातून काम सुरू झालं.
त्यातून कोल्हापुरातील ऐनवाडी या गावाची प्राथमिक निवड केली. यात 70-80 झाडांवर आपण दहा हजारांहून अधिक कोशांची निर्मिती केली. यातूनच वन्यप्राण्यांपासून काहीही नुकसान नाही आणि उत्पन्नाचा स्रोत म्हणून ही एक चांगली पर्यायी पीकव्यवस्था होऊ शकते हे सिद्ध करुन दाखवलं.
त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एक गाव निवडून त्यामध्ये हा जंगल रेशीमचा प्रयोग राबवायचा आणि तो यशस्वी केल्यानंतर त्या गावाला ’जंगल रेशीमचे गाव’ म्हणून घोषित करण्यात येत होतं. तिथेच माहिती, प्रशिक्षण, प्रक्रिया, खरेदी विक्री केली जाईल या दृष्टीने प्रयत्न करणे सुरू होते.
silk moth
५) वनविभागाचा या कामाला चांगला पाठिंबा मिळाला, त्याबद्दल काय सांगाल?
टसर रेशीमची संकल्पना आणि प्रकल्प स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांना सांगितल्यानंतर त्यांना ही संकल्पना आवडली. तत्कालीन उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ला, मुख्य वनसंरक्षक डॉ. व्हि. क्लेमेंट बेन आणि आत्ताचे उपवनसंरक्षक डी. गुरूप्रसाद, मुख्य वनसंरक्षक आर.एन. रामानुजन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी धैर्यशील माने या सर्वांचा या प्रकल्पाला भक्कम पाठिंबा मिळाला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच या प्रकल्पाला मूर्त रूप येऊ शकले आहे.
६) यामुळे स्थानिकांच्या जीवनात काय बदल झाले? रोजगाराच्या संधी किती प्रमाणात उपलब्ध झाल्या?
आत्ता हा प्रकल्प प्रायोगिक स्तरावर असला तरी त्याचे अनेक फायदे आपल्याला 2025 पर्यंत निश्चितपणे दिसणार आहेत. या भागात सगळीकडे रोजगाराची समस्या मोठी आहे. भातशेती आणि नाचणी शेती हिच पिके घेतली जायची. त्यात ही शेती ही स्वतः खाण्यापुरती म्हणूनच केली जात होती, त्यामुळे यात उद्योग किंवा व्यवसाय असा होत नव्हता. रोजगारासाठी शहरी भागात येथील तरुणांचे सातत्याने स्थलांतर होत असते. ते कमी करण्यासाठी या उद्योगाचा मोठा परिणाम झाला आणि त्यातून चांगल्या अर्थार्जनाची ही सोय आहे. यामुळे येथील जीवनात अनेक बदल झाले आहेत.
तसेच, यातून बर्‍याच मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचे रक्षण होण्यास ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे होणार आहे. जंगल रेशीममुळे वन्यप्राणी आणि स्थानिक लोक यांच्यातले संबंध चांगले होण्यास मदत होणार आहे. या झाडाला कुठल्याही प्रकारची कीड किंवा वाळवी लागत नाही, त्यामुळे या झाडाला कोणतेही धोके नसतात. एका उदाहरणामध्ये एकाच घरातली चौथी पिढी आज ऐनाच्या झाडावर उत्पादन घेत आहे. 2026 मध्ये या प्रकल्पाचा रिपोर्ट युनेस्कोला पाठवण्यात येणार आहे. ’वर्ल्ड हेरिटेज साईट’ म्हणून घोषित होऊन त्याच्या संवर्धनाचं काम व्हायला हवं, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
दरवर्षी आपण चीनमधून साधारण एक हजार कोटी रुपायांचं कच्च रेशीम आयात करतो. हेच रेशीम आपण स्वतः बनवू लागलो, तर ते प्रमाण कमी होईल. तिथे खर्च होणारा पैसा स्थानिकांना दिला, तर त्याचा फायदा होऊ शकतो. राज्य आणि देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रयोगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.