मुंबई : चित्रपट हे मनोरंजनाचे सगळ्यात मोठे माध्यम आहे. आणि याच माध्यमाला करोना काळात मोठा फटका बसला होता. टाळेबंदी सरकराने उठवली असली तरीही सगळ्यात शेवटी चित्रपट आणि नाट्यगृहे सुरु करण्यात आली होती.. परंतु, आता हे चित्र बदललं असून पुन्हा एकदा प्रेक्षकांची तुफान गर्दी चित्रपटगृहात पाहायला मिळत आहे. अशावेळी एकाच दिवशी अनेक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे एखाद्या चित्रपटाला आर्थिक फटका लागणार असेही वाटते. पण ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांनी सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.
सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर', अक्षय कुमारचा 'ओएमजी २', सनी देओलचा 'गदर २' आणि चिरंजीवीचा 'भोला शंकर', हे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. एकाच दिवशी हे सर्व चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे सर्व चित्रपटांना नुकसान होण्याचा मोठा होता. मात्र, या सर्व चित्रपटांच्या कमाईने चाहत्यांसह चित्रपट विश्लेषकांनाही आश्चर्याचा धक्का देत या चार चित्रपटांनी मिळून चित्रपटसृष्टीचा इतिहास बदलला आहे.
सनी देओल, अक्षय कुमार, रजनीकांत आणि चिरंजीवी यांच्या चित्रपटांनी अवघ्या तीन दिवसांत मोठी कामगिरी केली आहे. यापूर्वीही अनेकदा मोठे चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसामुळे चित्रपटांचे क्लॅश झाले होते. पण, या चार चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत तब्बल ३९० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांत, म्हणजेच ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान देशभरातील २ कोटी १० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जात हे चित्रपट पाहिले. ‘गदर २’ ने पहिल्या तीन दिवसात १३४.८८ कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘ ओएमजी २ ’ने दिवसांत सुमारे ४३.११ कोटी रुपयांचा, जेलरने १२७ कोटींचा आणि भोला शंकरने २६ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे एकाच दिवशी अनेक सुपरहिट चित्रपट जरी प्रदर्शित झाले तरी प्रेक्षक सर्व चित्रपटांचा आनंद घेतात ये यावरुन स्पष्ट होते.