मुंबई : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरसोबत चित्रपट करणार असल्याची घोषणा निर्माते अमित जानी यांनी केली होती. आणि त्यानंतर वाद सुरु झाला होता. आता या विषयात थेट मनसेने उडी घेतली असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी निर्मात्यांना थेट इशाराच दिला आहे. सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या प्रेम कहानीवर चित्रपट बनवण्याची घोषणा करत या चित्रपटाचे नाव 'कराची टू नोएडा' असे असणार असल्याचे सांगण्यात आले होते. यावर पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी मनोरंजन आम्ही महाराष्ट्रात आणि देशभरातक सहन करणार नाही आमची आधीपासून हीच भूमिका आहे असं मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
इतकंच नव्हे तर अमित जानी उदयपूरमध्ये झालेल्या कन्हैयालाल हत्याकांडवरही चित्रपट बनवत असून या चित्रपटात सीमा हैदरला RAW एजेंटच्या भूमिकेची ऑफर करण्यात आली आहे. याशिवाय भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूच्या लव्ह स्टोरीवर अमित जानी चित्रपट बनवणार असून या चित्रपटाचं नाव 'मेरा अब्दुल ऐसा नहीं है' असं ठेवण्यात आलं आहे.
पुढे अमेय खोपकर म्हणाले की, “२०१६ साली आंदोलन केलं होतं त्यावेळी आम्ही ४८ तासांची मुदत दिली होती त्यानंतर एकाही पाकिस्तानी कलाकारांनी इथे काम केलं नव्हतं. कुठलाही पाकिस्तानी कलाकार चालणार नाही अशी आमची भूमिका आहे आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, असं खोपकर यांनी म्हटले आहे. आपल्या देशावर हल्ले झाले. मागच्या आठवड्यात पुण्यातही काही अतिरेकी पकडण्यात आले आणि असे असताना आपण या पाकिस्तानी कलाकारांना प्रोत्साहन देतोय अशी टीका अमेय खोपकरांनी केली आहे. मनोरंजनाच्या नावाखाली हा थिल्लरपणा चालणार नाही असेही खोपकर म्हणाले.
अमेय खोपकरांनी बॉलिवूडकरांना थेट इशारा देत म्हटले, “ मुंबई हल्ल्यात ज्यांच्या घरचे जवान शहीद झाले त्यांनी टीव्ही चालू केल्यावर या पाकड्यांचं मनोरंजन बघायचं का? मी ठाम इशारा देतो, या बॉलीवूडवाल्यांनी कोणत्याही प्रकारच्या पाकड्यांना घेऊन जर काम केलं तर तुमचे हात पाय तोडूच शिवाय तुमचं काम देखील बंद करु. आमच्या जवानांचा आणि आमच्या देशाचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे. सीमा हैदर हिला घेऊन कोणीतरी बॉलीवूड निर्माता चित्रपट तयार करत आहे. तुम्ही चित्रपट तयार करा पण हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊन दिला जाणार नाही असही खोपकर यांनी सांगितले.