नवी दिल्ली : फाळणी विभिषिका स्मृती दिन हा देशाच्या फाळणीत ज्या भारतीयांनी प्राणांचे बलिदान दिले, त्या भारतीयांचे श्रद्धेने स्मरण करण्याचा एक प्रसंग आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले.
देशाची फाळणी आणि त्यामध्ये आपले प्राण गमवावे लागणाऱ्या भारतीयांचे स्मरण दरवर्षी फाळणी स्मृतीदिनी करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याविषयी ट्विट करून आदरांजली वाहिली. ते म्हणाले, फाळणी स्मृती दिन हा देशाच्या फाळणीत ज्या भारतीयांचे प्राण बलिदान दिले त्या भारतीयांचे श्रद्धेने स्मरण करण्याचा एक प्रसंग आहे. यासोबतच हा दिवस आपल्याला फाळणीचा दंश सहन करणार्यांच्या दु:खाची आणि संघर्षाची आठवण करून देतो. अशा सर्व लोकांना माझे नमन, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनीदेखील देशाच्या फाळणीत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, १९४७ साली धर्माच्या आधारावर झालेली देशाची फाळणी हा इतिहासातील काळा अध्याय आहे. त्यातून निर्माण झालेल्या द्वेषाने लाखो लोक मारले आणि करोडो लोक विस्थापित झाले. देशाला याची मोठी किंमत चुकवावी लागली आणि आजही अनेक लोक या धोक्याचा सामना करत आहेत. आज 'फाळणी विभिषिका स्मृती दिना'निमित्त मी त्या सर्व लोकांना नमन करतो ज्यांनी फाळणीमुळे आपले प्राण गमावले, असे शाह यांनी म्हटले आहे.