'हिंदूंवर हल्ले करणाऱ्या कट्टरपंथीयांवर आर्थिक-सामाजिक बहिष्कार टाका' - हिंदू महापंचायतची मागणी

    14-Aug-2023
Total Views |
hindu mahapanchyat 
 
चंडीगड : ३१ जुलै रोजी हरियाणातील नूह येथे कट्टरपंथी जमावाने हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर हल्ला केला होता. या हल्लात ६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या यात्रेतही व्यत्यय आला. ही यात्रा पुन्हा करण्यासाठी हिंदू संघटनांनी रविवारी (१३ ऑगस्ट २०२३) पलवलमधील पोंडरी येथे महापंचायत घेतली.
 
यामध्ये ब्रिज मंडळाची जलाभिषेक यात्रा पुन्हा एकदा २८ ऑगस्टपासून सुरू करण्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापंचायतीमध्ये सुरक्षेसाठी शस्त्र परवान्यासह मुस्लिमांवर आर्थिक-सामाजिक बहिष्कार टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदूंच्या महापंचायतीमध्ये नूह हिंसाचारानंतरची परिस्थिती आणि सुरक्षा उपायांवरील चर्चेदरम्यान, हरियाणा गौ रक्षक दलाचे आचार्य आझाद शास्त्री यांनी हिंदू तरुणांनी शस्त्र हाती घेतले पाहिजे असेही विधान केले. आचार्य आझाद शास्त्री म्हणाले की, “आम्ही मेवातमध्ये १०० शस्त्रास्त्रांचा परवाना त्वरित मिळण्याची खात्री करुन घेतली पाहिजे.
 
आचार्य आझाद शास्त्री पुढे बोलताना म्हणाले की, "आपण बंदुका नव्हे तर रायफल घेतला पाहिजे, कारण रायफल लांब अंतरापर्यंत गोळीबार करू शकतात. करा किंवा मरा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदू-मुस्लिम या आधारावर या देशाची फाळणी झाली. गांधींमुळेच हे मुस्लीम मेवातमध्येच राहिले."
 
तसेच हिंदू तरुणांनी एफआयआरला घाबरू नये असेही त्यांनी सांगितले. महापंचायतीला आलेल्या तरुणांना संबोधित करताना आचार्य आझाद शास्त्री म्हणाले की, "माझ्याविरुद्धही एफआयआर आहेत, पण आम्ही एफआयआरला घाबरत नाहीत." एफआयआरला घाबरून न जाता आपल्याविरुद्ध दुसरी एफआयआर दाखल करण्याचे आव्हान वकील कुलभूषण भारद्वाज यांनी प्रशासनाला दिले. त्यांनी तरुणांना २८ ऑगस्ट रोजी दुसरी ब्रिज मंडळ जलाभिषेक यात्रा काढण्याचे आवाहन केले.
 
महापंचायतीत बोलताना अधिवक्ता कुलभूषण भारद्वाज यांनी स्पष्टपणे सांगितले की, नूहमध्ये हिंदूंवर ज्याप्रकारे हिंसाचार झाला होता, तो यापूर्वीही घडला आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की हिंदूंना घाबरण्याची गरज नाही. त्यांनी मुस्लिमांवर संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकण्याची मागणी केली.
 
या महापंचायतीत सर्वानुमते ५१ जणांची समिती स्थापन करण्यात आली. महापंचायतीत झालेल्या चर्चेच्या आधारे हिंदू संघटनांनी २८ ऑगस्ट रोजी ब्रिज मंडळ यात्रा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी, हिंदू संघटनांनी राज्य सरकारसमोर अनेक मागण्या मांडल्या ज्यात रोहिंग्या आणि बांगलादेशींना नूहमधून बाहेर काढावे आणि काँग्रेस आमदार मम्मन खान यांना तात्काळ अटक करावी. या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
 
१) नूह हिंसाचाराची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) करावी.
 
२) हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये आणि सरकारी नोकरी आणि जखमींना ५० लाख रुपये आणि मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी.
 
३) नूह हिंसाचाराच्या वेळी मुस्लिमांच्या तोडफोडीमुळे झालेल्या नुकसानीचे विश्लेषण करण्यासाठी सर्वेक्षण केले जावे आणि त्यानुसार नुकसान भरपाई दिली जावी.
 
४) रोहिंग्या आणि बांगलादेशी मुस्लिमांसह बेकायदेशीरपणे राज्यात घुसलेल्यांना तत्काळ हद्दपार करण्यात यावे.
 
५) पोलिसांनी दंगलखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
 
६) फिरोजपूर झिरका येथील काँग्रेस आमदार ममन खान यांना तात्काळ अटक करावी.
 
७) नूहमधील दंगलखोरांची ओळख पटवून त्यांच्या जमिनी व इतर मालमत्ता जप्त करण्यात याव्यात.
 
८) नूह हे गोहत्या मुक्त क्षेत्र म्हणून घोषित करावे.
 
९) नूह हिंसाचारातील लोकांवर दाखल केलेले खोटे खटले मागे घ्यावेत.
 
१०) नूह हिंसाचाराच्या दिवशी रजेवर गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे.
 
११) नूह जिल्हा रद्द करून सोहना जिल्हा करण्यात यावा.
 
१२) नूह येथील दंगलखोरांविरुद्ध दाखल झालेले सर्व खटले गुरुग्राम किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यात वर्ग करून त्यांची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी.