ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यूच्या तांडवाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला येत्या २५ ऑगस्ट पर्यत अहवाल सादर करण्याबाबत सूचना सरकारने केल्या आहेत. राज्याचे सहसचिव अशोक अत्राम यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या अद्यादेशात वरील सूचना नमूद करण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आठवड्याभरात २३ जणांचा मृत्यू झाला होता.तर सोमवारी ४ रुग्ण दगावले. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले असल्याचा आरोप रुग्णाचे नातेवाईक आणि राजकीय मंडळींकडून करण्यात आला होता. त्यानंतर शासनाच्या वतीने नऊ जणांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत आरोग्य सेवा आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त,आरोघ सेवा संचालन मुंबई विभागाचे संचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य सेवा सहसंचालक, सहाय्यक संचालक, भीषक तज्ञ आणि उपसंचालक या ९ जणांचा समावेश करण्यात आला आहे.
या अध्यादेशात समितीने घडलेल्या घटनेचा घटनाक्रम निश्चित करावा,रुग्णालयात १० तासांत १८ रुग्ण दगावल्याने रुग्णालयातील आयसीयु मधील आणि जनरल वॉर्ड मधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी या घटनेत काय कार्यवाही केली याचा आढावा घ्यावा, रुग्णालयातील घडलेल्या घटनेची कारणमीमांसा करणे आणि आवश्यकतेनुसार संबंधित यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करावी, रुग्णालयातील सर्व यंत्रणेची वस्तुस्थिती तपासावी, तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा भविष्यात घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत.