दोन दिवसात अहवाल तयार करून दोषींवर कारवाई करणार : आरोग्यमंत्री सावंत

रुग्णांच्या जीवाशी झालेली हेळसांड अजिबात खपवून घेतली जाणार नाही

    13-Aug-2023
Total Views |
Maharashtra State Health Minister Dr. Tanaji Sawant

पुणे
: ठाणे महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या कळवा येथील रुग्णालयात जी घटना घडली, ती अत्यंत दुर्दैवी आहे. अश्याप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून याप्रकरणात नेमके काय घडलं हा विषय समजून घेऊ, त्यानंतर दोन दिवसात त्याचा अहवाल प्राप्त झाला की, त्यातील दोषींवर मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून कठोर कारवाई केली जाईल, असेही आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत ठाण्यातील सदर रुग्णालय येते. परंतु, मृत्यू हा मृत्यूच असतो. रुग्णाच्या जिवाशी होणारी हेळसांड आम्ही काहीही झालं तरी सहन करणार नाही.

या ठिकाणी काय घडलं त्याची माहिती आम्ही घेत आहोत. या रुग्णालयाच्या अधीक्षकांना याची कल्पना असेल. रुग्णांकडे दुर्लक्ष झालं आहे का? ही बाबही अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या घटना घडणं सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड करणं हे माझ्यासारखा मंत्री मुळीच सहन करणार नाही. ज्यावेळी अहवाल येईल त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने योग्य ती कारवाई केली जाईल.

घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडली की गडचिरोलीला घडली की चंद्रपूरला घडली यामध्ये कुणीही पडू नये. सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. त्यांची जबाबदारी ही शासनाची आहे. आम्ही शासन म्हणून जबाबदारी घेतली आहे. या घटनेच्या मुळाशी आम्ही जात आहोत. ज्या कुणामुळे घडलं असेल त्यावर कारवाई केली जाणारच असं तानाजी सावंत यांनी जाहीर केलं.