काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांना वादग्रस्त ट्वीट भोवणार
13-Aug-2023
Total Views |
नवी दिल्ली : एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका वड्रा यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या प्रकरणी प्रियांका यांच्यासह माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावर केलेल्या आरोपांवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हा आरोप भाजपवर करण्यात आला आहे. या ट्वीटवरून भाजप कायदेशीर सेलचे कार्यकर्ता निमेश पाठक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकार आणि भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसकडून दिशाभूल करणारे आरोप करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.