प्रेरणादायी व्यक्तींच्या नावाचा गावाच्या वेशीवर फलक; केंद्रीय पंचायती राज विभागाचा उपक्रम

    13-Aug-2023
Total Views |
Central Panchayati Raj State Minister Kapil Patil

भिवंडी
: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गावातील स्वातंत्र्यसैनिक, वीर जवानांसह कर्तृत्ववान व्यक्तींच्या नावाचा फलक गावाच्या वेशीवर लावण्याचा उपक्रम केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाकडून राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर `मेरी माटी मेरा देश' उपक्रमातून साडेचार कोटी वृक्षांचे रोपण केले जाईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे दिली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात `मेरी माटी मेरा देश' कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्ययोद्धे व जवानांचा शिलाफलकाचे समर्पण, वीरांना वंदन, पंचप्राण शपथ, वृक्षारोपण, माती यात्रा कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार, जिल्हा परिषदेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ भिवंडी तालुक्यातील कवाड येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, शांताराम भोईर, शांताराम पाटील, पी. के. म्हात्रे, यशवंत सोरे, पंचायत समितीच्या माजी सभापती रविना जाधव, सरपंच मोहिनी गुरव, रामनाथ पाटील, किशोर जाधव आदींची उपस्थिती होती.

या वेळी चीनविरोधातील युद्धातील वीर शहीद सैनिक रावजी कदम, बांगलादेश मुक्तीच्या लढाईतील शहीद शांताराम बाळू मोरे यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. तसेच शहीदांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नवी दिल्लीत उभारण्यात येणाऱ्या अमृत उद्यानासाठी भिवंडीतील मातीचा कलश पाठविण्यात आला. त्याचबरोबर हातात माती घेवून पंचप्राण शपथ ग्रहण करण्यात आली. तसेच देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शूरवीरांना हातात पणती घेवून आदरांजली अर्पण करण्यात आली.
 
देशाच्या सीमेवर प्राण पणाला लावून विपरित परिस्थितीत भारताच्या सैनिकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नेहमी कृतज्ञता व्यक्त केली जाते. ते प्रत्येक दिवाळीत देशाच्या सीमेवर जाऊन जवानांबरोबर दिवाळी साजरी करतात. त्याचबरोबर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक दुर्लक्षित व्यक्तिमत्वे प्रकाशात आणली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपात देशाच्या स्वातंत्र्यात महत्वाचे योगदान असलेल्या स्वातंत्र्यसैनिक व शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जात आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नमूद केले. अनेक गावांना प्रेरणादायक व्यक्तींचा इतिहास आहे. या व्यक्तींपासून सदैव प्रेरणा मिळण्यासाठी गावांच्या वेशीवर कर्तृत्ववान व्यक्तींचा फलक लावण्यात येईल. देशातील सहा लाख ग्रामपंचायतीत प्रत्येकी ७५ झाडांचे रोपण केले जाईल. त्यामुळे देशभरात साडेचार कोटी वृक्षलागवड होऊन पर्यावरण संवर्धनाला मदत होईल, असे कपिल पाटील यांनी सांगितले.