फिरस्ता...

    13-Aug-2023   
Total Views |
Article On Chinmay Bhave

महाराष्ट्राच्या किनार्‍यालगतची समृद्ध लोकसंस्कृती पाहून तिचे नव्या माध्यमांतून दस्तऐवजीकरण करू इच्छिणार्‍या आणि त्यासाठी प्रसंगी पदरमोड करून आपली उद्दिष्टपूर्ती करणार्‍या चिन्मय भावेविषयी...
 
फेसाळत्या लाटा, उधाणलेला समुद्र आणि त्याला आवर घालणार्‍या लांबच्या लांब पसरलेल्या वाळूच्या पुळण्या आणि किनारे ओढ लागावे, असेच असतात. या कोकण किनार्‍यावर अनेक मंदिरे, हिंदूंची तसेच इतर धर्मीयांची श्रद्धास्थाने, स्थापत्य कलेचे उत्तमोत्तम नमुने, कातळशिल्पे, शिवकालीन व त्याही पूर्वीचे किल्ले आहेत. महाराष्ट्रातील किल्ले इतर राज्यातील किल्ल्यांच्या तुलनेत पडक्या अवस्थेत आहेत. जो शत्रूशी लढतो, त्याचे काही प्रमाणात नुकसान होतेच. तुलनेत इतर प्रांतातील किल्ले सुस्थितीत आहेत. नयनमनोहर दृष्ये पाहण्यासाठी मोठमोठे राजवाडे आणि स्थापत्य नमुने पाहण्यासाठी आपण गुजरात राजस्थानच्या वार्‍या करतो. पर्यटन क्षेत्र अशानेच विकसित होतात. परंतु, वैभवासोबतच शौर्याच्या कहाण्या उराशी जोजवत असलेल्या महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांचे काय? त्यांचा वारसा जगासमोर यावा, यातूनच चिन्मय भावे यांची दर्या फिरस्ती सुरू झाली.

चिन्मय यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्या क्षेत्रातच नोकरी करताना त्यांना आपली संस्कृती, आपलं कोकण यांविषयी आस्था वाटू लागली आणि त्याचवेळी कोकणचा इतिहास वाचनात आला. कोकणावर निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे.तसेच, या भूमीला हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच कोकणात पर्यटन सुरू झाले, तर पर्यटक कोकणाकडे वळतील. त्यातून स्थानिकांचे अर्थार्जनाचे नवे मार्ग खुले होतीलच. तसेच, कोकणाविषयी, इथल्या वैशिष्ट्यांविषयी जागृतीसुद्धा होईल. चिन्मय यांनी आपल्या ब्लॉगमधून इतिहास व माहितीसोबतच छायाचित्रे व व्हिडिओसुद्धा मोफत उपलब्ध करून दिले आहेत.

गंमत म्हणजे, २००४ पासून चिन्मयची कोकण भटकंती ‘एमएटी’वरून सुरू झाली. मूळचे कोकणस्थ असल्याने चिन्मयला कोकणाविषयी ओढ होतीच. परंतु, बालपण मुंबईतील पार्ल्यात गेल्याने गावाशी फार संबंध आला नाही. कोकणचा इतिहास बर्‍याच इतिहासकारांनी लिहून ठेवलेला आहे. इतिहास शेवटी पुस्तकांच्या पानात खितपत पडतो. सदमान्य माणसांपर्यंत पोहोचवावा, तर सामान्यांचे माध्यम आत्मसात करावे लागते. या न्यायाने दृक्श्राव्य माध्यमातून ही माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यासाठी उत्कृष्ट दर्जाची छायाचित्रे आणि व्हिडिओ असणे, अत्यंत आवश्यक होते. म्हणून त्यांनी ड्रोन कॅमेरा व व्हिडिओ कॅमेरा खरेदी केला. अभ्यास करण्यासाठी अनेक पुस्तके खरेदी केली. त्यासाठी लागणारा निधी ‘क्राऊड फंडिंग’द्वारे गोळा केला. त्यांना एका मैत्रिणीने कॅमेरा भेट दिला, तर आईने व पत्नीनेसुद्धा मदत केली, अशा प्रकारे जवळ-जवळ पाच लाखांपर्यंत मदत त्यांना आजपर्यंत मिळाली आहे.

इन्स्टाग्राम, फेसबुक वापरणार्‍या आजच्या सर्वच वयातील आपल्याला दृक्श्राव्य माध्यम नवं नाही. एखाद्या ठिकाणी गेल्यावर फोटो व्हिडिओ काढून आपण एकमेकांना पाठवत असतो. कुणाच्या वाढदिवसाच्या दिवशी जुन्या छायाचित्रांचे व्हिडिओ बनवून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकत असतो. ‘आयआयटी’ मुंबईत शिकत असताना चिन्मयने एक लघुपट बनवला होता. या माध्यमाशी काही नव्याने संपर्क आला नाही. मूळ जर्मनीतील व सध्या राजस्थानात हॉकी शिकविणार्‍या शिक्षिकेला सोबत घेऊन जर्मनीत व राजस्थानात या लघुपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, छायाचित्रांपेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचता येतं. संस्कृती आणि वारसा याबद्दल आवड असल्याने कोकण संस्कृती दाखवण्यासाठी समुद्रकिनारे आणि त्याभोवतालची संस्कृती असा विषय घेतला. रायगड हा विषय निवडून एक व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओला उत्तम प्रतिसाद मिळाला व त्यानंतर ‘दर्या फिरस्ती’चे चॅनेल ‘मॉनिटाईझ’ही झाले.

एखादी गोष्ट मनापासून करायची असते, तेव्हा आपण तिच्या खोलात शिरून तिचा अभ्यास करतो. चिन्मयने लिखित साहित्य शोधायला सुरुवात केली. कोकणाचा दोन हजार वर्षांचा लिखित इतिहाससुद्धा उपलब्ध आहे, अभ्यास करून त्या-त्या भागात फिरून तेथील संस्कृती जाणून घेतली. त्यांची छायाचित्रे व व्हिडिओ घेतले. या फिरस्तीत ऐतिहासिक वास्तू, कोकण दुर्ग, कोकणातील नद्या, लेणी, लोककथा, ग्रामदैवते, इतर धर्मीयांची श्रद्धास्थाने, जागतिक वारसा स्थळे, सागरी किल्ले, खाडीच्या मुखावरचे किल्ले, या सार्‍यांची छायाचित्रे जमवणे, वेगवेगळ्या वेळच्या समुद्राचा आवाज ध्वनिमुद्रित करणे. त्यातही एक आव्हान होतंच, ओहोटीच्या-भरतीच्या लाटांचा खळखळाट, खडकावर आदळणार्‍या लाटांचा आवाज, उथळ समुद्रातील लाटा या सर्वांचा आवाज वेगळा असतो, त्यासाठी वेगळ्या ध्वनिक्षेपकांची गरज होती. अशा सर्व साधनांची खरेदी करून त्याचा उत्तमरितीने उपयोग त्यांनी आपल्या व्हिडिओ व छायाचित्रांत केलेला आहे.

चिन्मयच्या डोळ्यांसमोर केवळ समुद्र नव्हता. समुद्राच्या कुशीतील गावे, तेथील लोकसंस्कृती आणि माणसांच्या गोष्टी तो शोधत असतो. प्रत्येक गावात जाऊन समुद्र किनार्‍यापासून साधारण पाच किलोमीटरच्या प्रदेशातील मंदिरे, लेणी, पुरातत्व वारसा स्थळे यांचा अभ्यास करत. तसेच, गावकर्‍यांच्या त्या वास्तूंबाबत काय मान्यता आहेत, काय आख्यायिका आहेत, याचा आढावा घेत, त्याचा प्रवास पुढे चालू राहतो.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.