नमाज अदा करताना मशिद कोसळली; ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी!

    12-Aug-2023
Total Views |
Seven worshippers killed in northern Nigeria mosque collapse


नवी दिल्ली
: आफ्रिकन देश नायजेरियामध्ये नमाज अदा करताना मशिदीचे छत कोसळल्याने ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली तेव्हा शेकडो लोक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जमले होते. दरम्यान डझनभर लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

झारिया एमिरेट कौन्सिलचे प्रवक्ते अब्दुल्लाही क्वारबाई यांनी सांगितले की, दि. ११ ऑगस्ट रोजी देशाच्या उत्तरेकडील कडुना राज्यातील झारिया शहरात शेकडो नमाजी दुपारच्या नमाज पठणासाठी जमले होते. दरम्यान, शहरातील मध्यवर्ती मशिदीचा काही भाग कोसळला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
 
अब्दुल्लाही म्हणाले, “सुरुवातीला चार मृतदेह सापडले. बचाव पथकाने कोसळलेल्या मशिदीचा शोध सुरू केला तेव्हा आणखी तीन मृतदेह सापडले. राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने २३ जणांना रुग्णालयात पाठवले. १८३० मध्ये ही मशीद बांधण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कडुना राज्याचे राज्यपाल उबा सानी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
घटनास्थळी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये मशिदीचे छत मोठ्या प्रमाणात कोसळल्याचे दिसून आले आहे. या पश्चिम आफ्रिकन देशात गेल्या वर्षी डझनहून अधिक इमारती कोसळल्या होत्या. इमारतींच्या पडझडीचे कारण निकृष्ट बांधकाम साहित्याचा वापर आणि देखभालीतील दुर्लक्ष असल्याचे सांगितले जात आहे.