भारतमातेचे सुपुत्र...

    12-Aug-2023   
Total Views |
Article On Indian Freedom Fighters Contribution Is Greatest

स्वातंत्र्यलढ्याच्या समरांगणात जातपात, धर्म आणि लिंग या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देश एक भारतीय म्हणून लढला. त्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांच्या त्याग आणि बलिदानासाठी शब्दच नाहीत. या स्वातंत्र्य संग्रामामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसहित समाजाचे योगदान ही शब्दातीत! ते ज्ञात- अज्ञात योगदान सारांश रूपात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...

बेहोष होऊनी धावलो ध्येयपथावरती
एकच तारा समोर आणिक
पायतळी अंगार होता
कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यपंक्तीनुसार, स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील सर्व समाजासमोर एकच ध्येय होते, ते म्हणजे देशाचे स्वातंत्र्य. लोकमान्य टिळक, गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल हे ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण’ म्हणत स्वातंत्र्यासाठी कायमच आयुष्याची होळी करणारे वीर सावरकर असू देत की, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे असंख्य देशभक्त, त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यानेच आज आपण स्वातंत्र्याचे अमृत गीत गात आहोत. स्वातंत्र्य समरात भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांसारखे तरूण हसत-हसत फासावर गेले. त्यांची शूरता, त्यांची वीरता आजही जगभरातल्या क्रांतिकारकांची प्रेरणा आहे. 

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिल्यानंतर इंग्रजांच्या या अघोरी क्रूर कृत्याचा निषेध करणे, म्हणजे इंग्रजांचा रोष ओढावून घेणे. स्वातंत्र्यलढ्याशी समरस झालेला एखादा क्रांतिवीरच याविरोधात आवाज उठवू शकत होता. तसा आवाज ‘जनता’ पाक्षिकामध्ये दि. १३ एप्रिल १९३१ रोजी उठवला गेला. ‘जनता’ पाक्षिकामध्ये ‘तीन बळी’ म्हणून संपादकीय लिहिले गेले. त्यात इंग्रजांच्या या क्रूर कृत्याबद्दल लिहिले गेले की, ‘’या घटनेपासून इंग्रज सरकार पूर्णपणे न्यायप्रिय आहे किंवा न्यायपालिकेच्या आदेशांचे पालन करते, असा समज लोकांमध्ये मजबूत होईल आणि लोक त्याला पाठिंबा देतील, तर तो सरकारचा मुर्खपणा आहे. कारण, ब्रिटिश न्यायदेवतेची ख्याती अधिक स्पष्ट आणि पारदर्शक व्हावी, या हेतूने हे बळी देण्यात आले, या गोष्टीवर कोणालाही विश्वास नाही आहे. विलायतेच्या रूढीवादी/ राजकीय पुराणमतवादी/पक्ष आणि जनमताच्या भीतीमुळे हे कृत्य सरकारने केले आहे आणि ही गोष्ट सरकारसह जगालासुद्धा माहीत आहे.” इंग्रजांच्या अन्यायी कृत्याची जाणीव प्रखर शब्दांत व्यक्त करणारे आणि फाशी गेलेल्या शूरवीरांचे समर्थन करणारे हे संपादकीय लिहिले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येक खरा भारतीय स्वातंत्र्य आणि त्यासाठी त्याग करणार्‍यांच्या पाठी खंबीर उभा राहत होता.

भारतातील जाती निर्मुलनाची क्रांतिगाथा घडविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेसुद्धा त्याला अपवाद नव्हतेच. गोलमेज परिषदेमधली त्यांनी मांडलेली भूमिका देशप्रेमाने भारलेलीच होती. देशाला स्वतंत्र राज्यघटना असावी आणि वंचित समाजालाही मतदानाचा अधिकार असावा, अशी मागणी बाबासाहेबांनी केली. मात्र, त्याचवेळी इंग्रजांना ठणकावून विचारले की, “तुम्ही दीडशे वर्षं देशावर राज्य केले, तुमची सत्ता आहे. म्हणून देशातल्या दलित समाजाच्या जीवनात काही बदल झाले का?” इतकेच काय गोलमेज परिषदेमध्ये इंग्रजांना बाबासाहेब म्हणाले होते की, “जसे कोणत्याही संप्रदायाला दुसर्‍या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही, तसेच कुण्या विदेशी सत्तेला दुसर्‍या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही. म्हणून ब्रिटिश सत्तेला हिंदुस्थानात हे कारण पुढे करून की, हिंदुस्थान अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही, हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.” विषमतेविरोधात क्रांती करणार्‍या डॉ. बाबासाहेबांनी इंग्रजांच्या जुलमी पारतंत्र्याबाबत वेळोवेळी आवाज उठवला. मात्र, त्याचवेळी संघटनात्मक स्तरावर समाजालाही स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा दिली.

डॉ. बाबासाहेबांनी १९४० साली ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ची स्थापना केली. या फेडरेशनने स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुढाकार घेत, १९४६-४७ मध्ये देशव्यापी आंदोलन केले. आंदोलनाचा नारा होता- ‘अधिकारासाठी लढायला हवे, जगायचे असेल, तर मरायला हवे.’ हा नारा देत स्वातंत्र्यासाठी देशभरात २५ हजारांपेक्षा जास्त सत्याग्रही तुरुंगात गेले. यामागची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्वात मोठे योगदान कोणते, हे स्मरताना एक घटना विशद करावीच लागेल.

१९४७ आसाममधील सिलहट इथे जनसंख्या होती ५० टक्के हिंदू (यात सर्वच जाती आल्या) आणि ५० टक्के मुस्लीम. जोगेंद्र मंडल आणि बॅरिस्टर जिना यांचे सौख्य होते. जिना यांनी जोगेंद्र मंडल यांनी सिलहटमध्ये पाठवले. हिंदू मागासवर्गीय जोगेंद्र मंडल पाकिस्तानमध्ये सत्ताधाारी होणार, हे चित्र सिलहटच्या मागासवर्गीय समाजासमोर रंगले आणि इथल्या मागासवर्गीय समाजाने भारताऐवजी सिलहट पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी मतदान केले. सिलहट पाकिस्तानमध्ये गेले. त्याकाळीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा एक मोठा वर्ग होताच. बाबासाहेबांच्या नावासाठी आजही समाज अगदी जीवही द्यायला तयार आहे. तेव्हा तर प्रत्यक्ष बाबासाहेब समोर होते. त्यांच्या एका आदेशावर समाजातील मोठ्या गटाने भारत की पाकिस्तान, ही भूमिका ठरवली असती. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तानविरोधी भूमिका घेतली. बाबासाहेबांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’च्या रुपाने पुस्तक लिहून देशातील सर्वच समाजाला पाकिस्तान आणि तिथे वसल्या जाणार्‍या धर्मांध लोकांविरोधात जागृती केली.

या अनुषंगाने मला आठवते, २० वर्षांपूर्वी एका विद्रोही कवी संमेलनामध्ये मला दोन-चार लोक असेही भेटले होते, ज्यांचे मत होते की, ’बाबासाहेब आमचा बाप आहे. पण, जिनाने जसे पाकिस्तान मागितले, तसे आमच्या बापाने ‘दलिस्तान’ का मागितले नाही.’ त्यावेळी अनुभव, अभ्यास या सर्वच बाबतीत पाटी कोरी असल्याने, मी केवळ श्रोत्याची भूमिका घेतली होती. (हे विधान करणारे मूर्ख, विध्वंसक वृत्तीचे काका आणि आजोबा लोक आज देवाघरीही गेले असतील.) ही आठवण सांगण्याचे कारण असे की, बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशाचे विभाजन होताना एकसंघ भारतासाठी किती काळजीपूर्वक भूमिका घेतली होती, हे जाणवते. त्यामुळेच ‘मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय,’ असे ठासून सांगणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक क्रांतीसोबतच देशाच्या स्वातंत्र्यासाठीचे योगदान महत्त्वाचे आहे.

तसे पाहिले तर स्वातंत्र्यलढ्यात सर्व समाज आत्मिक प्रेरणेने उतरला होता. स्वातंत्र्यलढ्यात समाजाचे योगदान विचारात घेता आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मरण करणे अपरिहार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे तोरण लहुजींच्या पूर्वजांच्या हस्तेच बांधले. लहुजींचे वडील पेशव्यांसोबत इंग्रजांविरोधात लढले आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली. तो स्वराज्य, स्वातंत्र्याचा वारसा लहुजी वस्तादांनी आजन्म संवर्धित केला. त्यांच्या तालमीत अनेक थोर देशभक्त तयार झाले. लोकमान्य टिळक, आगरकर ते वासुदेव बळवंत फडकेसुद्धा! तालमीला येणार्‍या शिष्यांच्या मनात अन्याय-अत्याचाराची चीड, पारतंत्र्याची सल निर्माण करणार्‍या लहुजी वस्तादांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अमूल्य आहे.

दुसरीकडे आज भटक्या-विमुक्त समाजाचा दर्जा मिळालेल्या रामोशी समाजाचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग निश्चितच सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासाारखा! समाजातील उमाजी नाईक या वीराने इंग्रजाविरोधात युद्धच पुकारले. खरेच ते राजाच होते. उमाजी यांच्याबद्दल इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२०ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हटले, ’‘उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून, तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून, कोणी सांगावे, हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?”

तर टोस नावाचा इंग्रज अधिकारी म्हणतो, ’‘उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती, तर तो दुसरा शिवाजी झाला असता.” उमाजी म्हणजे जनतेची स्वातंत्र्य प्रेरणा होते. फितुरीमुळे ते इंग्रजांच्या कैदेत अडकले. दि. ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१व्या वर्षी देशासाठी वीर उमाजी नाईक हसत-हसत फासावर गेले. तुमचा राजा, तुमची प्रेरणा आता नाही, हे समाजाला दाखवून समाजात दहशत निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी उमाजी यांचा नश्वर देह कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकवून ठेवला. उमाजी यांच्यासोबत अठरापगड जाती समाजाच्या बांधवांनी इंग्रजांविरोधात युद्ध पुकारले होते. त्यांनाही मृत्यूदंडच मिळाला. जातपात आणि सामाजिक स्तर यापलीकडे जाऊन मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी लढणार्‍या या वीरांचे बलिदान पाहिले की, आपल्याला कोणत्या किमतीमध्ये स्वातंत्र्य मिळाले, याची जाणीव होते.

याच परिक्षेपात समकालीन मागास समाजाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा मागोवा घेताना धन्य वाटते. कारण, जातीपातीत विभागलेला समाज स्वातंत्र्यलढ्यात एकदिलाने लढला होता. उदाहरणार्थ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये कॅप्टन मोहन कुरील यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीय समाजाचे हजारो बांधव आझाद हिंद सेनेत सामील झाले होते. स्वातंत्र्यासाठी लढताना त्यांना वीरगतीच प्राप्त झाली असेल. दुसरे असे की, तत्कालीन इंग्रज सरकारने चांभार रेजिमेंटही सुरू केली होती. स्वातंत्र्याच्या आरपार युद्धात ही संपूर्ण चांभार रेजिमेंट आझाद हिंद फौजेत सामील झाली. हे शौर्य ही देशभक्ती शब्दात कशी व्यक्त करू? भारतीय स्वातंत्र्यलढ्यात चौरीचौरा हत्याकांडाचे पर्वही अविस्मरणीय आहे.

चौरीचोरा येथे इंग्रजांच्या अत्याचाराला कंटाळून हजारो समाजबांधवांनी पोलीस स्थानकाला आग लावली आणि त्यात २३ इंग्रज मेले. या लढ्याचे नेतृत्व केले होते-रमापती चमार यांनी. त्यावेळी इंग्रजांनी २२८ लोकांवर कू्रर कारवाई केली, तर १७२ लोकांना फाशीची सजा सुनावली. हे सगळे रमापती यांच्या सोबतचे समाजबंधू होते. जालीयनवाला बागेचे नेतृत्व करणारे धोबी नत्थू दिवाकर यांच्यासोबत धोबी समाजातील २० जणांना फासावर गेलेे. काल परवाच सातार्‍याचे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक विनय भिसे यांच्याशी बोलणे झाले. त्यांनीही एक माहिती दिली. ती अशी की, सातारा येथे शाहुपुरी परिसरातील गेंडामाळावर १६१ वर्षांपूर्वी इंग्रजांनी पाच जणांना फाशी दिली, सहा जणांना गोळ्या घालून मारले आणि इतर सहा जणांना तोफेच्या तोंडी दिले.

या सगळ्यांचा गुन्हा काय होता? त्यांनी इंग्रजांची गुलामगिरी झुगारून स्वराज्य निर्मितीसाठी प्रयत्न केले होते. विनय भिसे यांनी या वीरांची माहितीही दिली. त्यानुसार इंग्रजांविरोधात स्वातंत्र्यासाठी कारवाया केल्या म्हणून नारायण पावसकर सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी, सीताराम गुप्ते यांना फाशीची शिक्षा झाली. मुनजी मंदिर्गे, सखाराम शेट्ये, बाबा गायकवाड, येशा गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चव्हाण, बाबा कानगी रामोशी, नामा रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे) पर्वती पोटाले (पाटोळे), पाटलू येशू यांना गोळ्या घालण्यात आल्या. हे सगळे कोण होते? हिंदू समाजरचनेतील विभिन्न गटातील हे सगळे.

एकूणच काय तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहता भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्व समाजाने अत्युच्च त्याग केला. बलिदान दिले. हे सगळे वीर कोण्या एका जातीचे नव्हते की, पंथाचे नव्हते, ते होते केवळ भारतमातेचे वीर सुपुत्र! आजही या सुपुत्रांच्या गाथा आपल्याला प्रेरणा देतात. त्यांचे वारसदार म्हणून आपलेही कर्तव्य आहेच की, भारतमातेला लाभलेल्या स्वराज्याचे सुराज्य बनवण्यासाठी जातपात, वंश, प्रांतभेद विसरून भारतीय म्हणून देशासाठी सर्वोत्तम विचार करू आणि कृती करू. वंदे मातरम्!

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.