बंगाली भाषिक संगीतकार अन्वेशाचा मराठमोळा अंदाज

    11-Aug-2023
Total Views |
 
anvesha
 
 
 रसिका शिंदे-पॉल
 
मनोरंजनाला कोणत्याही भाषेचे बंधन आता उरले नाही आहे. म्हणजे विविध भाषिक कलाकार अन्य भाषेतील मनोरंजनसृष्टीत उत्तम काम करताना दिसत आहेत. नुकताच ज्येष्ट नाटककार विजय तेंडूलकर यांच्या 'पाहिजे जातीचे' या नाटकावर आधारित चित्रपट 'पाहिजे जातीचे' प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नड दिग्दर्शक कब्बडी नरेंद्र बाबू यांनी केले होते. इतकेच नाही तर या चित्रपटाला संगीत बंगाली भाषिक संगीतकार अन्वेषा हिने दिले आहे. कन्नडा, बंगाली, हिंदी अशा विविध भाषांमध्ये तिने आपल्या संगीताची जादू दाखवली आहे. याच निमित्ताने अन्वेशाशी साधलेला सुरेल संवाद.
 
घरातूनच अगदी लहानपणापासून संगीताचे बाळकडू अन्वेषाला मिळाले. अगदी लहान वयातच तिने शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. आणि तिच्या घराण्यातील ती दुसऱ्यापिढीची गायिका आहे. एकीकडे गाणे गात तिने स्वत:चे गाणे लिहित त्याला संगीत देण्यासही सुरुवात केली. आणि असा तिचा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. अन्वेषाने अनेक मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. परंतु, ज्यावेळी ‘पाहिजे जातीचे’ चित्रपटासाठी संगीत द्यायचे असे ठरले त्यावेळी सर्व प्रथम मराठी प्रेक्षकांना कोणत्या पद्धतीने संगीत ऐकायला आवडते आणि कोणत्या गाण्यांना ते अधिक पसंती देतात त्याचा अभ्यास केल्याचे अन्वेशाने सांगितले. मराठीत पार्श्वगायक केल्यामुळे मराठी चित्रपटाला संगीत देणे सोप्पे गेल्याचेही अन्वेषाने सांगितले.
 
“ज्या ज्या संगीतकारांसोबत मी काम केले आहे त्या संगीतकारांकडून मला या चित्रपटाच्या संगीतासाठी फार मदत झाली. कारण, त्यांच्यासोबत काम केल्यामुळे मराठी प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून कसे संगीत मी दिले पाहिजे हे समजण्यास मला मदत झाली”, असे अन्वेषाने सांगितले. बंगाली मातृभाषा असूनही अनेक भाषांमध्ये गायन केलेल्या अन्वेषाने देशभरातील प्राद्शिक स्तरावर दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची सधी मिळाल्यामुळे भाषेची अडचण कधी आली नाही, असे सांगितले. अन्वेषाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करताना संगीतकार ए. आर रेहमान, विद्या सागर तर, बंगाल चित्रपटसृष्टीत काम करताना तेथील संगीत क्षेत्रातील दिग्गजांकडून मार्गदर्शन मिळाल्यामुळे विविध भाषांवर प्रभुत्व मिळवण्यास यश मिळाले असल्याचेही अन्वेषाने सांगितले. यावेळी दाक्षिणात्य भाषेचे उदाहरण देताना ती म्हणाली, “जर का मी तमिळ भाषेत प्रेमगीत गात असेल तर मला त्याचे प्रत्येक शब्द जरी समजले नाही तरी त्या गाण्याचे संगीत मला समजते आणि त्यामुळेच तमिळ भाषेत मी सहजपणे ते गाणे गाऊ शकते”. त्यामुळे देशभरातील विविध प्रादेशिक भाषेत पार्श्वगायन करताना संगीत गायकाला फार मदत करते हे अन्वेषाने यावेळी अधोरेखित केले.