देशभरातील विशेष निमंत्रितांमध्ये गोव्यातील ‘हर घर जल’ योजनेच्या लाभार्थ्यांची निवड

दिल्लीत रंगणार स्वातंत्र्यदिन सोहळा

    11-Aug-2023
Total Views |

har ghar jal


नवी दिल्ली :
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडणार असून यासाठी देशभरातून अनेक लोक उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षी या कार्यक्रमासाठी हर घर जल योजनेच्या लाभार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
 
यावर्षी दिल्ली येथे हर घर जल योजनेचे गोव्यातून कुडचडे येथील लाभार्थी योगेश पार्सेकर आणि दर्शना पार्सेकर आणि धारबांदोडा तालुक्यातील सावर्डे येथील माया आर्सेकर आणि समीर आर्सेकर यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
 
हर घर जल योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांनी सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी कुडचडे येथील योगेश पार्सेकर यांनी सांगितले की, त्यांचे आईवडील भल्या पहाटे उठून पाणी काढत असत. परंतु, आता ‘हर घर जल’ योजनेच्या माध्यमातून कुटुंबाला घरात पाणी मिळत आहे. तसेच यामुळे त्यांचे श्रम वाचत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
तसेच या सोहळ्यासाठी सरकारच्या ‘जन भागीदारी’ या संकल्पनेनुसार देशभरातील सर्व स्तरातील नागरिकांना विशेष आमंत्रित म्हणून उत्सवात सहभागी करून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये गोवा हे देशातील पहिले ‘हर घर जल’ प्रमाणित राज्य असून गोव्यातील सर्व २.६३ लाख ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.
 
या सोहळ्यासाठी व्हायब्रंट व्हिलेजेसचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छिमार तसेच सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्त्वाच्या सरकारी उपक्रमाचे लाभार्थी आणि यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आले आहे.