नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या आय.एन.डी.आय. आघाडीविरोधात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगात जाण्याचे निर्देश याचिकाकर्त्यास दिली आहे. विरोधी पक्षांच्या आय.एन.डी.आय. या आघाडीच्या नावाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. असा मुद्दा निवडणूक आयोगाकडे मांडण्यात यावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर थेट सुनावणी करू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने राजकीय नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केला असता न्यायालय राजकीय पक्षांची नैतिकता ऐकू शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. रोहित खेरीवाल नामक वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा आघाडीला स्वतःला इंडिया म्हणवण्याची परवानगी देऊ नये, असे या याचिकेत म्हटले होते.