फालतू ‘मोहब्बतचे दुकान’

    10-Aug-2023   
Total Views |
rahul gandhi

 
खरेच नरेंद्र मोदी आणि केंद्रातल्या भाजप सरकारने हिंदूंसाठी, त्यांच्या श्रद्धेसाठी आणि देव-धर्मासाठी ‘अच्छे दिन’ आणलेच म्हणायचे. कारण, प्रभू श्रीरामचंद्राच्या विरोधात बोलणारे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी काल-परवा संसदेमधील त्यांच्या भाषणात राम-रावण, मेघनाथ-कुंभकर्ण वगैरे म्हणून रामायणातले दाखले देत होते. भूतकाळात गेले की जाणवेल की, काँग्रेस नेत्यांनी नेहमीच रामाचा जन्म खरेच झाला होता का? रामायण घडलेच नव्हते, असे म्हणत प्रभू श्रीरामचंद्र आणि रामायणाची पदोपदी अवहेलना केली होती. अर्थात, तेव्हाही सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांच्या इशार्‍याशिवाय किंवा त्यांच्या समर्थनाशिवाय काँगे्रेसी नेते ‘ब्र’ उच्चारत नाहीत, हे जगजाहीर. याचाच अर्थ काँग्रेसी काळ बदलला. भाजप सत्तेवर आला, नरेंद्र मोदी देशाचे नव्हे, तर जगाचे लोकप्रिय नेते झाले. जनतेचा कौल आणि त्यापाठची प्रभू श्रीरामाची शक्ती, हिंदूंची श्रद्धा पाहून मग काँग्रेसीही बदलले.हा बदल इतका की, आता राहुल गांधी ’भारतमाता’ वगैरे शब्द वापरायला लागले. पण, ’भारतमाता’ शब्द वापरला कशासाठी, तर मणिपूरमध्ये हिंसा झाली, त्यात काही लोक मेले, ते मेले म्हणजे भारतमाता मेली, असे त्यांचे म्हणणे. पण, हिंसा काय केवळ मणिपूरमध्ये झाली? नूहमध्ये काय झाले? तिथल्या हिंसेबद्दल राहुल यांना काही वाटते का? राजस्थानमध्ये १४ वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार झाला आणि तिला भट्टीत जाळून मारण्यात आले. लिहितानाही प्रचंड दुःख होते, वाईट वाटते; पण याबद्दल राहुल यांची पाटी कोरीच. दुसरे असे की, लाखो भारतीय कामासाठी संपूर्ण देश फिरतात. ते गरीब-गरजू लोकच नव्हे, तर सुस्थापित स्थिर समाजही कोणत्याही स्तरावर आपली संस्कृती सभ्यता सोडत नाही. या पार्श्वभूमीवर ‘भारत जोडो’ यात्रा केली, असे म्हणणारे राहुल गांधी यांची संस्मरणीय कारकिर्द काय? तर संसदेमध्ये डोळे मिचकावणे आणि संसमदेमध्ये महिलांना पाहून ‘फ्लाईंग किस’ करणे? किंवा परदेशात जाऊन भारताची निंदानालस्ती करणे? राहुल यांची ही कोणती समाजसंस्कृती आहे, देव जाणे. तसेच, ते सदासर्वकाळ ‘मोहब्बत की दुकान’ बिकान म्हणतात. ते म्हणजे असे हे फालतू चाळे आहेत का? असे जर असेल, तर त्यांचे हे दुकान त्यांनाच लखलाभ!


‘कौल’चे ‘अब्दुल्ला’ होता...


“दम असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा,” इती फारूक अब्दुल्ला. फारूक यांना खात्री आहे का की, भारताविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तान जिंकला की, भारतात राहून फटाके फोडणारे देशद्रोही लोक भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानसाठी गृहयुद्ध करतील? फारूक यांच्या मते, पाकिस्तान मोठा सुपर पॉवर देश आहे. त्यामुळे भारतामध्ये पाकिस्तानशी युद्ध करण्याचा दम नाही. छे! अन्नाच्या घासाघासाला तरसणार्‍या पाकिस्तानची अशी कपोकल्पित थोरवी गाताना फारूक यांना थोडीही लाज वाटली नाही. राजकीय-सामाजिक- आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेला पाकिस्तान अंतर्गत कलह आणि धर्मांध दहशतवादामुळे पाकिस्तानची लक्तरे झाली. आता तर तिथे सरकारही नाही. मात्र, हे सगळे नाकारून पाकिस्तान मोठा शूर देश आहे, अशा आवेशात दम असेल, तर पाकिस्तानशी लढा सांगणारे फारूख मूर्ख तरी असावेत किंवा काही न कळण्या पलीकडच्या गंभीर आजाराने त्रस्त असावेत.असो. फारूख मुख्यमंत्री असताना काश्मीरमध्ये किती हत्या झाल्या आणि काश्मीरमध्ये दहशतवाद किती फोफावला? किती धर्मांधांनी नफरत पसरली? याबद्दल ते चकार शब्द काढत नाहीत. मात्र, आता ते केंद्रात सत्तेत नाहीत. त्यामुळे मणिपूर आणि काश्मीरसाठी मोहब्बत द्या, असे ते म्हणत आहेत.पाकिस्तानशी दोस्ती करावी की, मोहब्बत करावी की, युद्ध करावं, हे सांगताना असे वाटते की, फारूख अब्दुल्लांना पाकिस्तानवरच खूपच विश्वास दिसतो. फारूख नेहमीच पाकिस्तानचे दूत असल्याच्या आविर्भावात वागत असतात. हे सगळे पाहून वाटते की, फारूख यांना पाकिस्तानविषयी किती आत्मविश्वास आहे. पण, दुसरीकडे कदाचित कट्टरपंथी आणि त्यांचा तो पाकिस्तान देश फारूख यांना स्वीकारणारही नाही, असेही वाटते. कारण, फारूख यांचे पिता शेख अब्दुल्ला यांनी ‘आतिशे चिनार’ या आत्मचरित्रामध्ये स्वीकार केले की, त्यांचे पणजोबाही हिंदू होते, त्यांचे नाव होते-बालमुकुंद कौल. याचाच अर्थ फारूख यांचे पूर्वज ‘कौल’ नाव त्यागून ‘अब्दुल्ला’ झाले आणि त्यांचे धर्मांतराबरोबरच मतांतरण झाले आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीचा लय झाला. इतका की, कौल नाव लावणारे पूर्वज असणारे फारूख त्यांच्या जन्मभूमीला आवाहन देत म्हणाले की, ‘दम असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा.’



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.